श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या


रोजगाराच्या संधी वाढवणे, कृत्रिम प्रज्ञा कौशल्य विकसित करण्याबरोबर कामगारांना भविष्यासाठी सुसज्ज करणारा करार

मायक्रोसॉफ्ट आपल्या जागतिक नेटवर्कमधील 15,000 पेक्षा अधिक नियोक्ते आणि भागीदारांना मंत्रालयाच्या एनसीएस प्लॅटफॉर्मवर आणणार

या करारामुळे लोकांना चांगल्या नोकऱ्या मिळणे सोपे होईल आणि भारतीय युवकांना परदेशात काम करण्याच्या जास्त संधी मिळतील

प्रविष्टि तिथि: 10 DEC 2025 6:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2025

कामगार आणि रोजगार मंत्रालयाने मायक्रोसॉफ्टसोबत एक महत्त्वाचा सामंजस्य करार केला आहे. कामगार आणि रोजगार तसेच युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे हा करार झाला. या करारामुळे रोजगाराच्या संधी वाढवणे, कृत्रिम प्रज्ञा (एआय) आधारित कौशल्य प्रशिक्षण वाढवणे आणि भारतातील कामगारांना जागतिक संधींसाठी तयार करणे या दिशेने मोठे पाऊल पडले आहे.

 

मायक्रोसॉफ्टने आपल्या आंतरराष्ट्रीय जाळ्यातले 15,000 हून अधिक काम देणारे  नियोक्ते आणि भागीदारांना मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिस (एनसीएस) व्यासपीठावर आणण्याचे दिलेले वचन हे या भागीदारीचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळे औपचारिक नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढतील, झपाट्याने वाढ होणाऱ्या क्षेत्रांना पाठबळ मिळेल आणि भारताला केवळ देशांतर्गत मागणीसाठीच नव्हे तर जगासाठीही कौशल्यपूर्ण कामगार तयार करता येतील. यामुळे भारतीय व्यावसायिक आणि युवकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधींचे अधिकाधिक मार्ग सापडतील.

करारा अंतर्गत डिजि-सक्षम या उपक्रमाद्वारे एआय-आधारित कौशल्य प्रशिक्षणाची व्याप्ती वाढवली जाईल. यामुळे लाखो युवकांना एआय, क्लाऊड तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा आणि उत्पादकता साधन या क्षेत्रात आगामी काळात उपयोगी पडणारी कौशल्ये शिकता येतील. या प्रयत्नांमुळे जागतिक मानकांशी सुसंगत आणि उद्योगाच्या नव्या गरजांशी जुळणारा कामगार वर्ग तयार होईल.

मांडविया यांनी या भागीदारीचे स्वागत केले. भारतातील तरुण लोकसंख्येचा फायदा घेऊन जगासाठी स्पर्धात्मक, डिजिटल कौशल्य असलेले आणि भविष्यातील गरजांना तयार कामगार तयार करणे हे या कराराचे उद्दिष्ट आहे, असे त्यांनी सांगितले. मायक्रोसॉफ्टच्या मदतीमुळे रोजगाराच्या संधी वाढतील, प्रशिक्षण अधिक चांगले होईल आणि जागतिक कामगार क्षेत्रात भारताचे स्थान अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारताने सामाजिक संरक्षणामध्ये मोठे यश मिळवले आहे. 2015 मध्ये फक्त 19% लोकांना सामाजिक संरक्षण मिळत होते, पण 2025 मध्ये ते 64.3% पर्यंत वाढले आहे आणि 94 कोटी नागरिकांना त्याचा फायदा झाला आहे. ई-श्रम आणि नॅशनल करीअर सर्व्हिस सारख्या व्यासपीठावर एआय वापरून सामाजिक सुरक्षा अधिक मजबूत केली जात आहे. मार्च 2026 पर्यंत 100 कोटी नागरिकांना सामाजिक संरक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्याकडे वाटचाल सुरू आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

भारतात, जास्तीत जास्त लोकांना आता सामाजिक सुरक्षा मिळत असल्याबद्दल नडेला यांनी गौरवोद्गार काढले. भारताने आता 64.3% सामाजिक संरक्षणाचा आवाका गाठला आहे आणि 940 दशलक्ष लोकांना त्याचा फायदा झाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. ई – श्रम उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. ई – श्रम उपक्रमामुळे लाखो असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा जाळ्याखाली आले. तसेच कामगारांसाठी चांगली धोरणे तयार करण्याची भारताची ताकद ताज्या माहितीमुळे वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.

भारतात रोजगार डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा तयार करण्याच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मायक्रोसॉफ्ट पुढील टप्प्यात त्यासाठी सहकार्य करेल. यामुळे खासगी कंपन्यांकडून नवीन कल्पना पुढे येतील आणि कामगार बाजारासाठी मोठ्या प्रमाणावर वापरता येतील असे सोपे व एकमेकांशी जोडलेले उपाय तयार होतील,असे त्यांनी नमूद केले.

"मायक्रोसॉफ्टचे मजबूत Azure (म्हणजे क्लाऊड प्लॅटफॉर्म - इंटरनेटवरून सर्वर्स, स्टोरेज, डेटाबेसेस , एआय टूल्स वापरता येतात) आणि एआय कौशल्य मंत्रालयाच्या एनसीएस प्लॅटफॉर्म, ई श्रम  विश्लेषण आणि कामगार बाजार माहिती मजबूत करण्याच्या प्राधान्यांशी सुसंगत आहेत. रोजगार सेवा आणि नोकरी जुळवणी प्रणाली आधुनिक करण्यासाठी हे उपयुक्त ठरेल. या करारामुळे मायक्रोसॉफ्टच्या भागीदार नेटवर्कचा उपयोग करून नियोक्त्यांपर्यंत पोहोच वाढवता येईल आणि उद्योग, प्रशिक्षण भागीदार आणि संस्थांमध्ये एनसीएसचा वापर वाढवता येईल."


शैलेश पाटील/प्रज्ञा जांभेकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2201688) आगंतुक पटल : 13
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu