भूविज्ञान मंत्रालय
भारत आता तंत्रज्ञान-आधारित विकासात जागतिक प्रवाह घडवणारा देश बनला असून पारंपरिक अर्थव्यवस्थेतून देशाचा प्रवास एक नवोन्मेष-आधारित अर्थव्यवस्थेकडे झाला आहे : डॉ. जितेंद्र सिंह यांचे पंचकुला येथे भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात प्रतिपादन
प्रविष्टि तिथि:
07 DEC 2025 6:16PM by PIB Mumbai
भारत पारंपरिक अर्थव्यवस्थेतून नवोन्मेष-संचालित राष्ट्र बनण्याच्या निर्णायक टप्प्यात पोहचला आहे आणि आता तंत्रज्ञान-चालित विकासात जागतिक प्रवाहांचे अनुसरण करण्याऐवजी त्याला आकार देत आहे, असे विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार); पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री; तसेच अणुऊर्जा आणि अवकाश विभागातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी पंचकुला येथे सध्या सुरू असलेल्या 4 दिवसीय भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवात सांगितले.
महोत्सवात विशेष अनौपचारिक संवादादरम्यान बोलताना, मंत्र्यांनी सांगितले की गेल्या दशकात भारताच्या वैज्ञानिक दृष्टीकोनात, धोरणात्मक दिशेत आणि शासकीय दृष्टिकोनात मूलभूत बदल झाले आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेष हे आता भारताच्या आर्थिक वाढीचे प्रमुख घटक झाले असून जागतिक समुदाय भारताकडे शासन, सार्वजनिक सेवा वितरण आणि तंत्रज्ञान-आधारित विकासाचे नवे मॉडेल निर्माण करणारा देश म्हणून पाहत आहे.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले की भारतात कधीच प्रतिभा, क्षमता किंवा बांधिलकीचा अभाव नव्हता, परंतु बदललेली गोष्ट म्हणजे राजकीय पाठबळाची गुणवत्ता आणि राष्ट्रीय ध्येयाची स्पष्टता. ते म्हणाले की भारत आता जागतिक तांत्रिक परिवर्तनांमध्ये मागे राहिला नाही आणि जैवतंत्रज्ञान, अणु-नवोन्मेष, पुनरुत्पादक विज्ञान आणि पुढील पिढीचे अवकाश तंत्रज्ञान अशा अनेक उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भारत नेतृत्वकारी भूमिका बजावत आहे.
या कार्यक्रमात त्यांनी नवीन राष्ट्रीय संशोधन आणि विकास निधीच्या लोकार्पणाबद्दल सविस्तर सांगितले आणि त्याला उच्च-जोखीम, उच्च-प्रभावी नवोन्मेषला प्रोत्साहन देण्यासाठी एक परिवर्तनकारी पाऊल असे म्हटले. हा निधी अवकाश आणि अणुऊर्जा यांसारख्या पूर्वी खासगी क्षेत्रासाठी मर्यादित असलेल्या क्षेत्रांमध्ये संशोधन आणि उद्योगांना पाठबळ देईल, असे त्यांनी सांगितले.
भारताचे अवकाश यश केवळ रॉकेट प्रक्षेपणापुरते मर्यादित राहिलेले नाही तर शेती, आरोग्यसेवा, पिण्याच्या पाण्यासाठीचे उपाय आणि आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रांमध्ये अवकाश तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी जागतिक प्रारूप तयार करत आहे, असे ते म्हणाले.
ते म्हणाले की, अणू क्षेत्रातही समान परिवर्तन दिसून येत आहे, ज्यामध्ये नवोन्मेषाचा थेट लाभ नागरिकांना होत आहे. भारताच्या आण्विक आणि अवकाश क्षेत्रातील यशोगाथा, धोरणात्मक तंत्रज्ञानामुळे राहणीमान सुलभतेमध्ये कशी सुधारणा घडवून आणता येते ते दाखवून देतात.
भारताने आपल्या नवोन्मेष प्रगतीचे मोजमाप कसे करावे या प्रश्नावर, शाश्वतता हेच खरे मोजमाप असल्याचे ते म्हणाले. बळकट उद्योग आणि बाजार संबंध असलेल्या व्यवहार्य उद्योगांमध्ये कल्पनांचे रूपांतर झाले पाहिजे असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले. नवोन्मेष केवळ आदर्शवादापुरता मर्यादित राहू शकत नाही, त्याने समाजात प्रतिष्ठा, आर्थिक सुरक्षितता आणि समानतेची जाणीव देखील प्रदान करावी .
भविष्याचा वेध घेताना, डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताची सर्वांत मोठी ताकद ही पिढ्यान् पिढ्यांमध्ये असलेली बुद्धिमत्ता असल्याचे नमूद केले. ते म्हणाले, अवकाश हे अशा क्षेत्रांपैकी एक आहे जिथे जगाला भारत आश्चर्यचकित करेल आणि पुढील 15 ते 20 वर्षांत कोणी भारतीय चंद्रावर पाऊल टाकेल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारी आणि परिपक्वतेने हाताळला तर कृत्रिम बुद्धिमत्ता भारतातील दैनंदिन जीवनात वेगाने बदल घडवून आणू शकते असे प्रतिपादन त्यांनी केले. नवोन्मेषी तरुणांना त्यांनी, जोखीम घ्या, उद्योगांसमवेत बळकट भागीदारी करा आणि सरकार देऊ करत असलेल्या सहाय्य आणि प्रोत्साहनाचा पुरेपूर वापर करा, अशा संदेश दिला.


***
सुषमा काणे/नितीन गायकवाड/विजयालक्ष्मी साळवी साने/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2200132)
आगंतुक पटल : 21