कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

कृषी क्षेत्रात भारत आणि रशियामधील परस्पर  सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी रशियाच्या कृषीमंत्र्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांची द्विपक्षीय बैठक


दोन्ही देशांमधील द्विपक्षीय कृषी व्यापार वृद्धींगत करण्यासाठी भारत आणि रशियाने व्यक्त केली सहमती, अन्नधान्य आणि फलोत्पादन निर्यातीतील नव्या शक्यतांचा शोध घेण्यालाही उभय पक्षांची मान्यता 

कृषी संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील परस्पर भागीदारी अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने भारतीय कृषी संशोधन परिषद आणि रशियाच्या फेडरल सेंट्र फॉर अॅनिमल हेल्थ या संस्थेमध्ये सामंजस्य करार

भारताकडून रशियाला ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीचे आमंत्रण, दोन्ही देशांनी खते, बियाणे, बाजारपेठांची उपलब्धता आणि संयुक्त संशोधन या क्षेत्रांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर व्यक्त केली सहमती

प्रविष्टि तिथि: 05 DEC 2025 3:55PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी. 4 डिसेंबर 2025 रोजी, कृषी भवन इथे रशियाच्या कृषी मंत्री ऑक्साना लुट यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी उभय देशांमधील विद्यमान सहकार्यावर चर्चा केली तसेच, भविष्यातील सहकार्यपूर्ण भागीदारीच्या क्षेत्रांविषयीदेखील चर्चा केली.

भारत आणि रशियामधील संबंध हे विश्वास, मैत्री आणि परस्पर सहकार्यावर आधारलेले आहेत, असे या दोन्ही मंत्र्यांनी नमूद केले. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय कृषी व्यापार 3.5 अब्ज अमेरिकी डॉलर इतका वाढला असल्याची बाब चौहान यांनी अधोरेखित केली. अधिक संतुलित व्यापाराची गरजही त्यांनी व्यक्त केली. बटाटे, डाळिंब आणि बियाणे यांसारख्या भारतीय उत्पादनांच्या निर्यातीशी संबंधित, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडवल्याबद्दल त्यांनी रशियाचे आभारही मानले.

कृषी वस्तुमालाच्या व्यापारात वाढ करण्याच्या उद्देशाने, भारताकडून अन्नधान्य आणि फलोत्पादन उत्पादनांच्या निर्यातीच्या शक्यतांचीही दोन्ही देशांनी चाचपणी केली.

या बैठकीदरम्यान, कृषी संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता निर्मितीच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि रशियाच्या फेडरल सेंट्र फॉर अॅनिमल हेल्थ या संस्थेमध्ये एका सामंजस्य करारावर स्वाक्षरीही करण्यात आली.

यावेळी चौहान यांनी, रशियाला पुढील वर्षी भारतात होणार असलेल्या ब्रिक्स कृषी मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्याचे आमंत्रणही दिले.

यावेळी दोन्ही देशांनी कृषी व्यापार, खते, बियाणे, बाजारपेठांची उपलब्धता आणि संयुक्त संशोधन या क्षेत्रांमधील परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्यावर सहमती व्यक्त केली, यासोबतच  नवोन्मेषाला चालना देणे आणि दोन्ही देशांतील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याची वचनबद्धताही त्यांनी पुन्हा अधोरेखित केली. यावेळी लुट यांनी कृषी क्षेत्रातील व्यापार वाढवण्यासह सहकार्यपूर्ण भागिदारी अधिक बळकट करण्याबद्दलची उत्सुकता व्यक्त केली.

या बैठकीसाठी आपलेल्या रशियाच्या शिष्टमंडळात त्यांच्या कृषीमंत्र्यांसह, उपमंत्री मॅक्सिम मार्कोविच, उपमंत्री मरिना अफोनिना, फेडरल सर्व्हीस फॉर व्हेटर्नरी अँड फायटोसॅनिटरी सुपरव्हिजनचे प्रमुख सर्गेई डँकव्हर्ट आणि आशिया विभागाच्या  संचालक दारिया कोरोलेव यांच्यासह शिष्टमंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

यासोबतच भारताच्या वतीने कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव देवेश चतुर्वेदी, कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव एम.एल. जाट आणि खते विभागाचे सचिव रजत कुमार मिश्र , परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रतिनिधी, कृषी व शेतकरी कल्याण विभागाचे संयुक्त सचिव, तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले.

***

निलिमा चितळे/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2199592) आगंतुक पटल : 7
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada