पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतलेल्या संयुक्त वार्ताहर परिषदेत पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांना दिलेले निवेदन

प्रविष्टि तिथि: 05 DEC 2025 3:33PM by PIB Mumbai

 

महामहीम, माझे मित्र राष्ट्रपती पुतीन

दोन्ही देशांचे प्रतिनिधी,

प्रसारमाध्यमांचे सहकारी

नमस्कार!

"दोबरी देन"!

आज भारत आणि रशियाच्या तेविसाव्या शिखर परिषदेत राष्ट्रपती पुतीन यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. त्यांचा हा दौरा अशा वेळी होत आहे, ज्यावेळी आमचे द्विपक्षीय संबंध अनेक ऐतिहासिक टप्प्यांदरम्यान वाटचाल करत आहेत. बरोबर 25 वर्षांपूर्वी राष्ट्रपती पुतीन यांनी आमच्या धोरणात्मक भागीदारीचा पाया घातला होता. 15 वर्षांपूर्वी 2010 मध्ये आमच्या भागीदारीला विशेष आणि विशेषाधिकारप्राप्त धोरणात्मक भागीदारीचा दर्जा मिळाला होता. 

गेल्या अडीच दशकांपासून त्यांनी आपले नेतृत्व आणि दूरदृष्टीने या संबंधांची सातत्याने जोपासना केली आहे. प्रत्येक परिस्थितीत त्यांच्या नेतृत्वाने परस्परांमधील संबंधांना नवी उंची दिली आहे. भारतासोबतच्या या घनिष्ठ मित्रत्त्वाबद्दल आणि अढळ वचनबद्धतेबद्दल मी राष्ट्रपती पुतीन यांचे, माझ्या मित्राचे, मनापासून आभार मानतो.

मित्रहो,

गेल्या आठ दशकांत जगात अनेक चढउतार झाले आहेत. मानवतेला अनेक आव्हानांचा आणि संकटांचा सामना करावा लागला आहे.  आणि या सर्वांच्या दरम्यान भारत-रशिया मैत्री एका ध्रुव ताऱ्याप्रमाणे अढळ राहिली आहे. परस्पर सन्मान आणि दृढविश्वासावर टिकलेले हे संबंध काळाच्या प्रत्येक कसोटीवर नेहमीच खरे ठरले आहेत. आज आम्ही हा पाया आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्याच्या सर्व पैलूंवर चर्चा केली. आर्थिक सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याला आमचे सामायिक प्राधान्य आहे.  ते साकार करण्यासाठी आज आम्ही 2030 पर्यंत आर्थिक सहकार्याच्या कार्यक्रमाबाबत सहमती व्यक्त केली आहे. यामुळे आमचा व्यापार आणि गुंतवणूक वैविध्यपूर्ण, संतुलित आणि शाश्वत बनेल आणि सहकार्याचे नवे आयाम देखील जोडले जातील.

आज राष्ट्रपती पुतीन आणि मला भारत-रशिया व्यापार मंचाच्या बैठकीत सहभागी होण्याची संधी मिळेल. मला पूर्ण विश्वास आहे की हा मंच आमच्या व्यापारी संबंधांना नवे सामर्थ्य देईल. यामुळे निर्यात, सह-उत्पादन आणि सह नवोन्मेषाचे नवे दरवाजे देखील खुले होतील.

दोन्ही पक्ष युरेशियन इकॉनॉमिक युनियनसोबत एफटीए लवकरात लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहेत. कृषी आणि खतांच्या क्षेत्रात आमचे निकटचे सहकार्य, अन्न सुरक्षा आणि कृषी कल्याणासाठी महत्त्वाचे आहेत. मला आनंद आहे की हे सहकार्य पुढे नेताना आता दोन्ही पक्ष एकत्रितपणे युरिया उत्पादनाचे प्रयत्न करत आहेत.

मित्रहो,

दोन्ही देशांच्या दरम्यान, कनेक्टिव्हिटी वाढवण्याला आमचे मुख्य प्राधान्य आहे. आम्ही INSTC, Northern Sea Route, चेन्नई - व्लादिवोस्टोक Corridors वर नव्या ऊर्जेने आगेकूच करू. आता आम्ही भारताच्या नाविक मनुष्यबळाला polar watersमध्ये प्रशिक्षणासाठी सहकार्य करणार आहोत. हे आर्क्टिकमधील आमच्या सहकार्याला नवे सामर्थ्य देईलच त्याबरोबरच यामुळे  भारतातील युवा वर्गासाठी रोजगाराच्या नव्या संधी तयार होतील.

याच प्रकारे जहाजबांधणीतील आमच्या सखोल सहयोगात मेक इन इंडियाला बळकट करण्याचे सामर्थ्य आहे. हे आमच्या दोन्ही देशांसाठी लाभदायक  सहयोगाचे  एक आणखी उत्तम उदाहरण आहे. ज्यामुळे रोजगार, कौशल्ये आणि  क्षेत्रीय कनेक्टिव्हिटी – सर्वांना बळ मिळेल.

ऊर्जा सुरक्षा भारत - रशिया भागीदारीचा मजबूत आणि महत्त्वाचा स्तंभ राहिला आहे. नागरी अणुऊर्जेच्या क्षेत्रात आपले दशकांहून जुने सहकार्य, स्वच्छ ऊर्जेप्रती आपल्या सामायिक प्राधान्यक्रमांना सार्थकी  लावण्यात महत्वाचे ठऱले आहे. आम्ही हे दोन्ही बाजूंसाठी लाभदायी  सहकार्य सुरूच ठेवू.

महत्त्वपूर्ण  खनिजांबाबतीत आपचे सहकार्य संपूर्ण जगात सुरक्षित आणि वैविध्यपूर्ण  पुरवठा साखळी सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे आहे. यामुळे स्वच्छ ऊर्जा, उच्च तंत्रज्ञानाधारीत उत्पादन आणि नव्या युगातील उद्योग क्षेत्रांमध्ये आमच्या भागीदारीला ठोस बळ मिळेल.

मित्रहो,

भारत आणि रशियातील संबंधांमध्ये आपल्या सांस्कृतिक सहकार्याला आणि लोकांमधील परस्पर संबंधांचे विशेष महत्त्व आहे. दशकांपासून दोन्ही देशांमधील नागरिकांमध्ये एकमेकांप्रति स्नेह, सन्मान, आणि आपुलकीचा भाव राहिला आहे. हे संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही  अनेक नवीन पावले उचलली आहेत.

अलिकडेच रशियात भारताचे  दोन नवीन वाणिज्य दूतावास उघडण्यात आले  आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांमध्ये संपर्क अधिक सुलभ होईल, आणि आपसातील जवळीक वाढेल. या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाखो भाविकांना काल्मिकिया  मधील आंतरराष्ट्रीय बौद्ध मंचाच्या वेळी  भगवान बुद्ध यांच्या पवित्र अवशेषांचे आशीर्वाद लाभले.

मला आनंद आहे की लवकरच आपण रशियाच्या नागरिकांसाठी 30 दिवसांचा  निशुल्क ई-पर्यटक व्हिसा आणि 30 दिवसांचा गट पर्यटक व्हिसा सुरू करत आहोत.

मनुष्यबळाळाची  गतिशील देवाणघेवाण, आपल्या नागरिकांना जोडण्यासोबतच दोन्ही देशांसाठी नवी ताकद आणि नव्या संधी निर्माण करेल. मला आनंद आहे की याला चालना देण्यासाठी आज दोन करार केले गेले आहेत. आम्ही एकत्रितपणे व्यावसायिक शिक्षण, कौशल्ये आणि प्रशिक्षणासंबंधीतही काम करू. आम्ही दोन्ही देशांतील विद्यार्थी, अभ्यासक आणि खेळाडूंमधील आदानप्रदानाचाही  विस्तार करू.

मित्रहो,

आज आम्ही क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर देखील चर्चा केली. युक्रेनच्या संदर्भात भारताने सुरुवातीपासून शांतीची बाजू मांडली आहे. आम्ही या मुद्यावर शांततापूर्ण आणि स्थायी तोडग्यासाठी केल्या जात असलेल्या सर्व प्रयत्नांचे स्वागत करतो. भारत नेहमीच आपले योगदान देण्यासाठी सज्ज राहिला आहे आणि पुढेही राहील.

दहशतवादाविरोधातील  लढाईत भारत आणि रशियाने दीर्घकाळापासून खांद्याला खांदा लावून सहकार्य दिले आहे. पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला असो वा क्रोकस सिटी हॉलवर केलेला भ्याड आघात — या सर्व घटनांचे मूळ एकच आहे. भारताचा ठाम विश्वास आहे की दहशतवाद हा, मानवतेच्या मूल्यांवरील थेट प्रहार आहे आणि याविरुद्ध जागतिक एकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.

भारत आणि रशियामध्ये संयुक्त राष्ट्र, जी 20, ब्रिक्स, एससीओ (शांघाय सहकार्य संघटना) तसेच इतर मंचांवर घनिष्ठ सहयोग  राहिला  आहे. निकट  ताळमेळ साधत, पुढे वाटचाल करत असताना, आम्ही या सर्व मंचांवर  परस्परांमधील संवाद आणि सहयोग  सुरू ठेवू.

महामहीम,

मला पूर्ण विश्वास आहे की आगामी काळात आमची  मैत्री आम्हाला जागतिक आव्हानांचा सामना करण्याची शक्ती देईल — आणि हाच विश्वास आपले पस्पर सामायिक भविष्य अधिक समृद्ध करेल.

मी पुन्हा एकदा आपल्याला आणि आपल्या संपूर्ण प्रतिनिधीमंडळाला  भारतभेटीसाठी खूप खूप धन्यवाद देतो.

***

सोनाली काकडे/शैलेश पाटील/तुषार पवार/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2199588) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Gujarati , Odia , Kannada