युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी ऐतिहासिक अश्वारोहण स्पर्धेतील पदक विजेत्यांचा केला सत्कार


भारताची सुधारित क्रीडा परिसंस्था कशा प्रकारे पहिल्यांदाच महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पदके जिंकण्यासाठी पाठबळ देत आहे, त्याकडे क्रीडामंत्र्यांनी वेधले लक्ष

Posted On: 05 DEC 2025 2:25PM by PIB Mumbai

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, डॉ. मनसुख मांडविया यांनी एफईआय आशियाई अश्वारोहण अजिंक्यपद 2025 या स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या इव्हेंटिंग  आणि ड्रेसेज  पदक विजेत्या संघांचा शुक्रवारी सत्कार केला.

सहा खेळाडूंच्या या चमूने पटाया येथे सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये पाच पदके पटकावली, ज्यामुळे खंडांतर्गत अजिंक्यपद स्पर्धेतील त्यांची ही कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.

आशिष लिमये यांनी इव्हेंटिंगमध्ये वैयक्तिक सुवर्ण आणि सांघिक रौप्य अशी दोन पदकांची कमाई केली. तर श्रुती व्होरा यांनी सांघिक ड्रेसेजमध्ये एक आणि वैयक्तिक प्रकारात दोन अशी एकूण तीन रौप्य पदके पटकावली. त्यांच्यासोबत शशांक सिंग कटारिया आणि शशांक कनमुरी इव्हेंटिंगमध्ये तर दिव्याकृती सिंग आणि गौरव पुंदीर ड्रेसेज स्पर्धांमध्ये सहभागी झाले होते. या खेळाडूंचा सत्कार करताना डॉ. मांडविया यांनी अश्वारोहण स्पर्धात अलीकडच्या काळात भारताची उंचावलेली कामगिरी अधोरेखित केली. “यापूर्वीच्या काळात जागतिक स्तरावर आपले अस्तित्व देखील जाणवत नसलेल्या क्रीडाप्रकारांमध्येही आता भारत चांगली कामगिरी करू लागला आहे. भारतामध्ये मर्यादित पोषक वातावरण असलेल्या एका क्रीडाप्रकारात तुम्ही आपले कसब सिद्ध केले आहे, त्याबद्दल मी तुम्हा सर्वांच्या या खेळावरील प्रेमाची प्रशंसा करतो. तरीही हा 10 वर्षांपूर्वीचा भारत नाही गेल्या एका दशकात भारताच्या क्रीडा परिसंस्थेत झालेला बदल तुम्ही नक्कीच अनुभवला असेल. खेळाडू आणि त्याच्या किंवा तिच्या पदकादरम्यान येणारा कोणताही अडथळा सरकार दूर करेल असे मी आश्वासन देत आहे. या खेळामध्ये खेळाडूंना प्रशिक्षणासाठी परदेशी जायला लागू नये, म्हणून आम्ही भारतातच अश्वारोहण स्पर्धांसाठी पोषक क्रीडासुविधा निर्माण करणार आहोत.,” असे मांडविया म्हणाले.

केंद्रीय क्रीडामंत्र्यांनी, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी घोड्यांची वाहतूक करण्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले, आणि प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले क्वारंटाईन सेंटर  एका वर्षाच्या आत भारतात स्थापन करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

या स्पर्धेत तीन रौप्य पदके जिंकणाऱ्या श्रुती व्होरा यांनी खेळाडूंच्या समस्या विचारात घेऊन मंत्र्यांनी दिलेल्या त्वरित प्रतिसादाबद्दल प्रशंसा केली.

***

सोनाली काकडे/शैलेश पाटील/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2199462) अभ्यागत कक्ष : 9