माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) लक्षणीय अडथळे येत असूनही या क्षेत्रात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सचिवांची सीआयआयच्या 'बिग पिक्चर समिट'मध्ये माहिती


एक उदयोन्मुख आर्थिक महासत्ता म्हणून भारताच्या कथा जगाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत- माहिती आणि प्रसारण सचिव

प्रविष्टि तिथि: 01 DEC 2025 7:22PM by PIB Mumbai

मुंबई ,1 डिसेंबर 2025

 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आगमनाने महत्त्वपूर्ण अडथळे येत असतानाही माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे, असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, संजय जाजू यांनी व्यक्त केले आहे. ते आज मुंबईत 'द एआय इरा - ब्रिजिंग क्रिएटिव्हिटी ॲन्ड कॉमर्स' या संकल्पनेवर आधारित 12 व्या सीआयआय 'बिग पिक्चर समिट'मध्ये उद्घाटनाच्या भाषणात बोलत होते. 'भारताच्या जागतिक स्तरावर स्पर्धात्मक सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी प्राधान्य धोरण सुधारणा' या विषयावर सीआयआयची 'श्वेतपत्रिका' देखील यावेळी सचिवांनी प्रसिद्ध केली.

वेव्हज् समिट'कडे केवळ एक स्वतंत्र कार्यक्रम म्हणून न पाहता, त्याला एका चालू असलेल्या चळवळीचा भाग मानावे, जी सातत्याने सर्जनशीलता, नावीन्यता आणि प्रगतीच्या नवीन लाटांना प्रेरणा देत राहील, असे आवाहन जाजू यांनी उद्योगाला केले. " वेव्हज् समिट केवळ एक कार्यक्रम नाही; ती एक चळवळ आहे. आमच्या पंतप्रधानांनी आम्हाला वारंवार आठवण करून दिली आहे की या प्रवासातील प्रत्येक लाट मागील लाटेवर आधारित आहे, ज्यामुळे आम्हाला एक उद्योग म्हणून आपण कोठे उभे आहोत आणि एकत्र कसे पुढे जाऊ शकतो यावर विचार करण्यास प्रवृत्त करते," असे जाजू म्हणाले.

अन्न, निवारा आणि वस्त्र यांच्या जोडीला मनोरंजन हा सभ्यतेचा मूलभूत आधारस्तंभ आहे, जो केवळ आर्थिक विकासासाठीच नव्हे, तर सामाजिक सलोखा आणि आनंदासाठीही अविभाज्य आहे, यावर जाजू यांनी भर दिला "आपल्या क्षेत्राचे खरे मूल्य संख्यांच्या पलीकडचे आहे: ते लोकांना जोडते, सलोखा वाढवते आणि राष्ट्रांना एकत्र आणते," असे जाजू यांनी अधोरेखित केले.

भारताची सर्जनशील अर्थव्यवस्था आता 1 कोटीहून अधिक लोकांसाठी थेट किंवा अप्रत्यक्ष उपजीविकेचे स्रोत आहे, जी राष्ट्रीय सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (GDP) अंदाजे 3 लाख कोटी रुपयांचे योगदान देते, असे त्यांनी नमूद केले. जाजू यांनी मौखिक परंपरा पासून ते लिखित आणि दृकश्राव्य स्वरूपांपर्यंत, भारताच्या समृद्ध कथाकथनाच्या वारशावर प्रकाश टाकला, ज्यातून तीन प्रमुख स्तंभ तयार होतात, जसे 'वेव्हज् समिट'मधील भारत पॅव्हेलियनमध्ये आणि आता नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमामध्ये प्रदर्शित केले गेले आहे. "असा वारसा असूनही, जागतिक माहिती आणि मनोरंजन बाजारात भारताचा वाटा केवळ 2 टक्के आहे. आपल्या सर्जनशील क्षमतेचे रूपांतर जागतिक स्तरावर ओळख मिळवणाऱ्या उत्पादनांमध्ये आणि कथांमध्ये करणे, हे आपले आव्हान आहे," असे ते म्हणाले.

कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे आशय निर्मिती आणि वापराच्या स्वरुपाला वेगाने नवनवा आकार देत आहे, अशावेळी उद्योगक्षेत्राने आपल्या ध्येयवेडाचे रूपांतर व्यवसायात करण्याचं आव्हान स्विकारावं असं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव जाजू म्हणाले. व्यावसायिक लाभ या क्षेत्राला गती मिळवून देण्याचे काम करू शकते असे ते म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता मनोरंजन क्षेत्रात परिवर्तन घडवून आणत आहे. जर आपण नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार केला नाही, तर जागतिक पातळीवरचा आपला वाटा कमी होईल ही बाब त्यांनी नमूद केली. भारताच्या ऑरेंज इकॉनॉमी'चा उदय म्हणजे कल्पना आणि कल्पनाशक्तीचाही उदय आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्या सांस्कृतिक सामर्थ्याचे रूपांतर सर्जनशील क्षमतेत करण्याची क्षमता देशात असणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. आजच्या काळात तंत्रज्ञानात गुंफलेल्या कथा विकल्या जातात असेही त्यांनी सांगितले.

उदयोन्मुख आर्थिक शक्ती म्हणून, भारताच्या गाथा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्या पाहिजेत. हेच आपल्या सॉफ्ट पॉवरचे सार आहे असे जाजू यांनी सांगितले.

गोष्टी सुलभतेने मार्गी लावणे ही सरकारची भूमिका असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. सरकार पूरक वातावरण उपलब्ध करून देईल, समान संधी आणि आर्थिक प्रोत्साहन पुरवेल, मात्र माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला पुढे नेण्याची जबाबदारी उद्योग क्षेत्राची आहे, असेही त्यांनी नमूद केले. कौशल्ये विकसित करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचे ते म्हणाले. यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मुंबईत भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्था (IICT) स्थापन करायला मंजुरी दिली. आणि आता उद्योगक्षेत्राच्या नेतृत्वाखालील कार्यरत झालेल्या या प्रारुपाची उत्कृष्टता आणि नवोन्मेषासाठी प्रशंसा होऊ लागली आहे, हे सरकार आणि उद्योग क्षेत्रातील यशस्वी सहकार्याचे उदाहरण आहे, असेही त्यांनी सांगितले. गोरेगावमधील फिल्म सिटीतील IICT चा परिसर दोन वर्षांत पूर्ण होईल, तर राष्ट्रीय चित्रपट महामंडळातील शाखा आधीच कार्यान्वित झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. वेव्ह्ज बाजारने सर्जनशील कलाकारांना योग्य गुंतवणूकदार आणि खरेदीदार शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे ही बाबही त्यांनी नमूद केली.

भारतीय उद्योग महासंघाचे राष्ट्रीय माध्यम आणि मनोरंजन परिषदेचे अध्यक्ष तसेच सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव बॅनर्जी, भारतीय उद्योग महासंघाचे राष्ट्रीय माध्यम आणि मनोरंजन परिषदेचे सह-अध्यक्ष आणि जेटसिंथेसिसचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राजन नवानी, भारतीय उद्योग महासंघाच्या राष्ट्रीय माध्यम आणि मनोरंजन परिषदेच्या सहअध्यक्ष आणि यूट्यूब इंडियाच्या भारत क्षेत्र व्यवस्थापकीय संचालक गुंजन सोनी आदी मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या भविष्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या धोरणात्मक कृतींचा अंतर्भाव असलेल्या मार्गदर्शक आराड्यासंबंधी एका श्वेत्रपत्रीकेचेही प्रकाशन केले गेले. या आराखड्याअंतर्गत विकासाला चालना देण्यासाठी, नवोन्मेषाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि भारताला जागतिक सर्जनशील अर्थव्यवस्थेचे नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी कृतीयोग्य शिफारसींची रुपरेषा मांडलेली आहे.

भारतीय उद्योग महासंघाच्या माध्यम आणि मनोरंजन गुंतवणूकदार बैठकीचे तसेच आणि भारतीय उद्योग महासंघ वेव्ह्ज बाजाराचेही उद्घाटन करण्यात आले.

सुषमा काणे/शैलेश पाटील/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 


(रिलीज़ आईडी: 2197193) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil