पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ (128 वा भाग) कार्यक्रमातून देशवासियांशी साधलेला संवाद

प्रविष्टि तिथि: 30 NOV 2025 11:52AM by PIB Mumbai

 

माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. ‘मन की बात’ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नोव्हेंबरचा महिना अनेक प्रेरणादायक घडामोडी घेऊन आला, काही दिवसांपूर्वीच, 26 नोव्हेंबर रोजी ‘संविधान दिना’निमित्त संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. वंदे मातरम् या गीताला 150 वर्षं झाल्याबद्दल संपूर्ण देशभरात होऊ घातलेल्या कार्यक्रमांची दिमाखात सुरुवात झाली. 25 नोव्हेंबर रोजी अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजाचं आरोहण करण्यात आलं. त्याच दिवशी कुरुक्षेत्रात ज्योतिसर येथे पांचजन्य स्मारकाचं लोकार्पण झालं.

मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच मी हैदराबाद मध्ये जगातील सर्वात मोठ्या लीप इंजिन एमआरओ सुविधेचं उद्घाटन केलं. विमानांची देखभाल, दुरुस्ती आणि संपूर्ण तपासणी या क्षेत्रात भारतानं हे फार मोठं पाऊल उचललं आहे. गेल्या आठवड्यात, मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आयएनएस ‘माहे’ हे जहाज भारतीय नौदलाच्या सेवेत सामावून घेण्यात आलं. गेल्याच आठवड्यात, स्कायरूटच्या इन्फिनिटी कॅम्पसनं भारताच्या अवकाश परिसंस्थेला नवी उंची गाठून दिली. भारताची नवी मानसिकता, नवोन्मेष आणि युवा शक्तीचे  प्रतिबिंब झाले आहे.

मित्रांनो, कृषी क्षेत्रात देखील देशानं फार मोठी साध्य कामगिरी केली आहे. भारतानं 357 दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करून एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. तीनशे सत्तावन्न दशलक्ष टन! 10 वर्षांपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत भारतातील अन्नधान्य उत्पादन आता आणखी 100 दशलक्ष टनांनी वाढलं आहे. क्रीडाविश्वात देखील भारताचा झेंडा उंच फडकतो आहे. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रकुल स्पर्धांचे यजमानपद भारताला देण्याची घोषणा देखील करण्यात आली. या कामगिऱ्या देशाच्या आहेत, देशवासीयांच्या आहेत. आणि ‘मन की बात’ हा कार्यक्रम देशातील लोकांच्या अशा यशांना, लोकांच्या सामुहिक प्रयत्नांना सामान्य जनतेसमोर आणणारं एक उत्तम व्यासपीठ आहे.

मित्रांनो, जर मनात तीव्र इच्छा असेल, सामूहिक शक्तीवर, संघभावनेनं काम करण्यावर विश्वास असेल, अपयश मिळालं तर पुन्हा उठून उभं राहण्याचं धैर्य असेल तर कठीणात कठीण कार्यात सुद्धा यशाची खात्री मिळते. जेव्हा उपग्रह नव्हते, जीपीएस प्रणाली नव्हती, दिशादर्शनाची कोणतीही सोय नव्हती त्या काळाची तुम्ही कल्पना करून बघा. आपले नाविक तेव्हाही मोठमोठी जहाजं घेऊन समुद्र सफरीला जात आणि इच्छित स्थळी पोहोचत देखील होते. आता समुद्राच्या पलीकडे जाऊन जगातले देश अवकाशाची अनंत उंची मोजू लागले आहेत. आव्हाने तर तिथे देखील आहेत. कोणतीही जीपीएस प्रणाली नाही, संपर्काची तितकीशी बरी व्यवस्था नाही, मग आपण पुढे कसं जाणार?

मित्रांनो, काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवरच्या एका व्हिडीओनं माझं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ इस्रोच्या एका अनोख्या ड्रोन स्पर्धेविषयी होता. या व्हिडीओमध्ये आपल्या देशातील युवक, विशेषतः नव्या पिढीचे तरुण मंगळ ग्रहासारख्या वातावरणात ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत होते.ड्रोन उडत होते, थोडा वेळ संतुलन साधत होते आणि मग अचानक जमिनीवर कोसळत होते. असं का होत होतं माहित आहे? कारण हे जे ड्रोन उडत होते त्यांच्यासाठी जीपीएस प्रणालीची अजिबात मदत उपलब्ध नव्हती. मंगळ ग्रहावर जीपीएस प्रणाली असणं शक्य नाही. त्यामुळे ड्रोनला बाहेरून कोणतीच सूचना किंवा मार्गदर्शन मिळू शकत नव्हतं. त्या ड्रोनला स्वतःचा कॅमेरा आणि अंतर्गत सॉफ्टवेअरच्या बळावरच उडायचं होतं. त्या छोट्याश्या ड्रोनला, जमिनीचा प्रकार ओळखून, उंची मोजायची होती, खाचखळगे समजून घ्यायचे होते आणि स्वतःच सुरक्षितपणे खाली उतरण्याचा रस्ता शोधायचा होता. आणि म्हणूनच हे ड्रोन एकामागोमाग एक कोसळत होते.

मित्रांनो, या स्पर्धेत, पुण्याच्या तरुणांच्या संघानं काही अंशी यश मिळवलं. त्यांचा ड्रोन सुद्धा अनेक वेळा खाली पडला, कोसळला, पण त्यांनी माघार घेतली नाही. बऱ्याच प्रयत्नानंतर या संघाच्या ड्रोननं मंगळ ग्रहासारख्या परिस्थितीत काही वेळ उडण्यात यश मिळवलं.

मित्रांनो, हा व्हिडीओ पाहताना माझ्या मनात आणखी एक दृश्य उभं राहिलं. त्या दिवशी, जेव्हा चांद्रयान-2 चा संपर्क तुटला होता. त्या दिवशी संपूर्ण देश, विशेषतः वैज्ञानिक काही क्षणांसाठी निराश झाले होते. पण मित्रांनो, हे अपयश त्यांना थांबवू शकलं नाही. त्याच दिवशी त्यांनी चांद्रयान-3 च्या यशाची गाथा लिहायला सुरुवात केली. याच कारणामुळे, चांद्रयान-3 जेव्हा यशस्वीपणे चंद्रावर उतरलं तेव्हा ते केवळ त्या मोहिमेला मिळालेलं यश नव्हतं तर अपयशातून बाहेर पडून घडवलेल्या विश्वासाचं यश होतं. या व्हिडीओमध्ये मला जे तरुण दिसत होते त्यांच्या डोळ्यात मला तशीच चमक दिसली. मी जेव्हा आपल्या युवकांची निष्ठा आणि शास्त्रज्ञांचं समर्पण पाहतो, तेव्हा प्रत्येक वेळी मन उत्साहानं भरून जातं. युवकांची हीच निष्ठा, विकसित भारताचं फार मोठं सामर्थ्य आहे. 

माझ्या प्रिय देशवासियांनो, तुम्हाला सगळ्यांना मधाचं माधुर्य तर नक्कीच ओळखीचं असेल, पण याच्यामागे किती लोकांची मेहनत आहे, किती परंपरा आहेत आणि निसर्गासोबत किती सुंदर ताळमेळ आहे हे बहुतेकदा आपल्याला माहित नसतं.

मित्रांनो, जम्मू-काश्मीरच्या डोंगराळ भागात वन तुळस म्हणजेच सुलाई, या सुलाईच्या फुलांपासून तिथल्या मधमाशा अत्यंत उत्तम मध तयार करतात. हा पांढऱ्या रंगाचा मध असतो आणि त्याला रामबन सुलाई मध असं म्हटलं जातं. रामबन सुलाई मधाला काही वर्षांपूर्वीच जीआय टॅग मिळालेला आहे. त्यानंतर हा मध संपूर्ण देशात प्रसिद्ध होऊ लागला आहे.

मित्रांनो, दक्षिण कन्नड जिल्ह्यातल्या पुत्तूर मधली झाडं मध उत्पादनासाठी उत्कृष्ट मानली जातात. तिथली ‘ग्रामजन्य’ नावाची शेतकरी संस्था या नैसर्गिक देणगीला नवी दिशा देत आहे. ‘ग्रामजन्य’ संस्थेनं तिथे एक आधुनिक प्रक्रिया संयंत्र उभारलं, ज्याच्याशी प्रयोगशाळा, बाटल्यांमध्ये भरण्याची प्रक्रिया, साठवण आणि डिजिटल मागोवा, यांसारख्या सुविधा संलग्न करण्यात आल्या. आता हाच मध ब्रँडेड उत्पादनाचं रूप घेऊन गावांतून शहरात पोहोचला आहे. अडीच हजाराहून अधिक शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ मिळाला आहे.

मित्रांनो, कर्नाटकातल्याच तुमकुरू जिल्ह्यात ‘शिवगंगा कालंजिया’ नावाच्या संस्थेचा उपक्रम देखील कौतुकास्पद आहे. या संस्थेतर्फे प्रत्येक सदस्याला सुरुवातील दोन मधुमक्षिका पालन पेट्या दिल्या जातात. या कार्याद्वारे या संस्थेनं अनेक शेतकऱ्यांना स्वतःच्या उपक्रमाशी जोडून घेतलं आहे. या संस्थेतले शेतकरी एकत्र मध काढतात, त्याला उत्तम पॅकेजिंग करतात आणि स्थानिक बाजारात घेऊन जातात. यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई सुद्धा होत आहे. असंच एक उदाहरण नागालँडमध्ये होणाऱ्या क्लिफ-हनी हंटिंगचं आहे. नागालँडमधल्या चोकलांगन गावात खियामनि-याँगन ही आदिवासी जमात शेकडो वर्षांपासून मध गोळा करण्याचं काम करते. इथल्या मधमाशा झाडांवर नव्हे तर उंच डोंगरांवर मधाची पोळी बनवतात. म्हणूनच त्यातून मध गोळा करण्याचं काम सुद्धा तितकंच जोखमीचं असतं. म्हणून इथले लोक आधी मधमाशांशी हळुवारपणे बोलतात, त्यांची परवानगी घेतात. आज ते मध गोळा करण्यासाठी आले आहेत असं मधमाशांना सांगतात आणि मग त्यानंतर मध काढतात.

मित्रांनो, आज भारत मध उत्पादनात नवे विक्रम स्थापन करत आहे. 11 वर्षांपूर्वी देशात 76 हजार टन मध उत्पादन होत असे. आता त्यात वाढ होऊन हे उत्पादन दीड लाख टनांपेक्षा जास्त झालं आहे. गेल्या काही वर्षांत, मधाची निर्यात सुद्धा तीन पटीपेक्षा जास्त वाढली आहे. मध अभियान कार्यक्रमांतर्गत खादी ग्रामोद्योगाने देखील लोकांना सव्वा दोन लाखांपेक्षा जास्त मधुमक्षिका पालन पेट्यांचं वाटप केलं आहे. यातून हजारो लोकांना रोजगाराच्या नव्या संधी प्राप्त झाल्या आहेत. म्हणजेच देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात मधाचे माधुर्य सुद्धा वाढत आहे. आणि हे माधुर्य शेतकऱ्यांचं उत्पन्न देखील वाढवत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, हरियाणामध्ये कुरुक्षेत्रात महाभारताचं युध्द झालं होतं हे आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. पण युद्धाचा हा अनुभव तुम्ही तिथल्या महाभारत अनुभव केंद्रात प्रत्यक्ष अनुभवू शकता. या अनुभव केंद्रात महाभारताच्या गाथेला त्रिमितीय, प्रकाश आणि ध्वनी योजना आणि डिजिटल तंत्राने सादर करण्यात येत आहे. 25 नोव्हेंबर रोजी मी जेव्हा कुरुक्षेत्र येथे गेलो होतो तेव्हा या अनुभव केंद्राच्या अनुभवाने मला खूप आनंद दिला.

मित्रांनो, कुरुक्षेत्रात ब्रह्म सरोवर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवात सहभागी होणं ही देखील माझ्यासाठी विशेष पर्वणी ठरली. जगभरातले लोक गीतेच्या दिव्य ग्रंथाने कसे प्रेरित होत आहेत हे पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. या महोत्सवात युरोप आणि मध्य आशियासह जगातल्या अनेक देशांचा सहभाग होता.

या महिन्याच्या सुरुवातीला, सौदी अरब देशात पहिल्यांदाच एखाद्या सार्वजनिक व्यासपीठावर गीता सादर करण्यात आली. युरोपात लाटव्हिया देशात सुद्धा एक संस्मरणीय गीता महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवात लाटव्हिया, इस्टोनिया, लिथुआनिया आणि अल्जेरिया या देशांच्या कलाकारांनी उत्साहानं भाग घेतला. 

मित्रांनो, भारताच्या महान संस्कृतीमध्ये शांती आणि करुणा ही तत्वे सर्वात महत्त्वाची आहेत. तुम्ही दुसऱ्या महायुद्धाच्या काळाची कल्पना करा. त्यावेळी सगळीकडे विनाशाचे भयानक वातावरण होते. अशा कठीण काळात, गुजरातमधील नवानगर संस्थानाचे जाम साहेब, महाराजा दिग्विजय सिंहजी यांनी जे महान कार्य केलं ते आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. त्यावेळी जाम साहेब कोणत्याही राजनैतिक आघाडी किंवा युद्धाच्या रणनीतीचा विचार करत नव्हते. तर महायुद्धाच्या काळात पोलिश ज्यू मुलाचं रक्षण कसं करायचं याची त्यांना चिंता लागून राहिली होती. त्यांनी तेव्हा गुजरातमध्ये हजारो मुलांना आश्रय देऊन त्यांना नवजीवन दिलं, ही बाब आजही आदर्शवत आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या दक्षिण भागात मोशाव नेवातिम येथे जाम साहेब यांच्या प्रतिमेचं अनावरण करण्यात आलं. हा फार मोठा सन्मान आहे. गेल्या वर्षी पोलंडमध्ये वॉर्सामध्ये मला जाम साहेब यांच्या स्मारकापाशी पुष्पांजली अर्पण करण्याचं भाग्य लाभलं. तो क्षण माझ्या कायम आठवणीत राहील.

माझ्या प्रिय देशवासियांनो, काही दिवसांपूर्वी मी नैसर्गिक शेतीविषयक एका भव्य संमेलनात सहभागी होण्यासाठी कोईम्बतूरला गेलो होतो. दक्षिण भारतात नैसर्गिक शेतीसंदर्भात सुरु असलेले उपक्रम पाहून मी अत्यंत प्रभावित झालो. तिथले कितीतरी तरुण उच्च शिक्षित, व्यावसायिक आता नैसर्गिक शेतीच्या क्षेत्राचा स्वीकार करत आहेत. मी तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांचे अनुभव जाणून घेतले. नैसर्गिक शेती भारताच्या प्राचीन परंपरांचा भाग आहे आणि धरतीमातेच्या रक्षणासाठी या पद्धतीला सतत प्रोत्साहन देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे.

मित्रांनो, जगातली सर्वात पुरातन भाषा आणि जगातल्या सर्वात प्राचीन शहरांमधले एक शहर या दोघांचा मिलाफ नेहमीच अद्भुत असतो. मी काशी-तमिळ संगमम बद्दल बोलतो आहे. काशीच्या नमो घाटावर यावर्षी 2 डिसेंबर रोजी चौथा काशी-तमिळ संगमम सुरु होतो आहे. यावेळी काशी-तमिळ संगममची संकल्पना अत्यंत मनोरंजक आहे – तमिळ शिका - तमिल करकलम्. ज्यांना तमिळ भाषेची आवड आहे अशा सर्व लोकांसाठी काशी-तमिळ संगमम एक महत्वाचा मंच झाला आहे. काशीच्या जनतेशी जेव्हा बोलणं होतं तेव्हा ते नेहमीच सांगतात की काशी-तमिळ संगमममध्ये सहभागी व्हायला त्यांना नेहमीच आवडतं. त्यांना तिथे नवीन शिकायला आणि नवनव्या लोकांना भेटायची संधी मिळते. यावेळी देखील काशीनिवासी संपूर्ण जोमानं आणि उत्साहानं तामिळनाडूहून येणाऱ्या बंधू भगिनींचं स्वागत करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत. मी तुम्हा सर्वाना सांगू इच्छितो की तुम्ही काशी-तमिळ संगमम मध्ये नक्की सहभागी व्हा. त्याचबरोबर, ‘एक भारत-श्रेष्ठ भारत’ ची भावना बळकट करणाऱ्या अशा इतर अनेक मंचांचा सुद्धा विचार करा. इथे मी पुन्हा एकदा म्हणेन:

तमिल कलाच्चारम उयर्वानद्

तमिल मोलि उयर्वानद्

तमिल इन्दियाविन पेरूमिदम् |

(मराठी भाषांतर)

तमिळ संस्कृती महान आहे

तमिळ भाषा महान आहे

तमिळ हा देशाचा अभिमान आहे

माझ्या प्रिय देशवासियांनो,

ज्यावेळी भारताच्या सुरक्षा यंत्रणेला बळकटी येते, त्यावेळी प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत असतो. गेल्या आठवड्यामध्ये मुंबईमध्ये आयएनएस - ‘माहे‘ ला भारतीय नौदलामध्ये समाविष्ट केलं. काही लोकांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्‍ये ‘माहे’च्या  स्वदेशी डिझाइनविषयी खूप चर्चा झाली. तर  पुद्दुचेरी आणि मलबार किनाऱ्यावरील लोक या नौकेच्या नावामुळेही आनंदी झाले. वास्तविक,  ‘माहे‘ हे नाव;  एका स्थानाच्या नावावरून ठेवण्यात आलं आहे. ‘माहे‘ या स्थानाला समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. केरळ आणि तामिळनाडूमधील अनेक लोकांनी निरीक्षण नोंदवलं  आहे की, या युद्धनौकेचा वरच्या टोकाकडचा भाग उरूमी आणि कलारिपयट्टू च्या पारंपरिक लवचिक तलवारीप्रमाणे दिसतो. आपल्या सर्वांसाठी एक अतिशय अभिमानाची गोष्ट म्हणजे, आपल्या नौदलाने आत्मनिर्भर होण्यासाठी खूप वेगानं पावलं उचलण्यास प्रारंभ केला आहे. 4 डिसेंबरला आपण नौसेना दिवस साजरा करणार आहे.  आपल्या  सैनिकांच्या अदम्य साहसाचा आणि पराक्रमाचा सन्मान करण्यासाठी हा एक विशेष दिवस आहे.

मित्रांनो, जे लोक नौदलाशी संबंधित  असतात, जोडले गेलेले असतात;  त्यांना पर्यटनामध्ये विशेष रस असतो, त्यांच्यासाठी आपल्या देशामध्ये फिरण्यासाठी अनेक स्थाने आहेत. तिथं  जाऊन त्यांना खूप काही शिकण्याची संधी मिळेल. देशाच्या पश्चिमी किनारपट्टीवर गुजरातमधील सोमनाथजवळ एक जिल्हा आहे -दीव! दीवमध्ये ‘आयएनएस खुखरी‘ ला समर्पित ‘खुखरी मेमोरिअल  अॅंड म्युझियम‘ आहे. तसेच गोव्यामध्ये ‘नेव्हल अॅव्हिएशन म्युझियम‘ आहे.  संपूर्ण  अशियामध्ये असे संग्रहालय कुठेही नाही. सर्वाधिक वेगळे, अद्वितीय संग्रहालय आहे. कोची किल्ला इथं आयएनएस द्रोणाचार्य मध्ये -भारतीय नौदलाचे संग्रहालय‘‘ आहे. इथे आपल्या देशाच्या नौवहन क्षेत्राचा  इतिहास आणि भारतीय नौदलामध्ये घडून आलेली उत्क्रांती पाहण्यास मिळते. श्रीविजयापुरम  म्हणजेच, ज्या स्थानाला पूर्वी  पोर्ट ब्लेअर असे म्हणत होते, तिथे  ‘समुद्रिका – नौदल  संग्रहालय‘ आहे. त्याच्या  माध्यमातून या क्षेत्राचा समृद्ध इतिहास जाणून घेता येतो. कारवारच्या रवींद्रनाथ टागोर सागरी किनाऱ्यावरील  ‘युध्‍दनौका  संग्रहालयामध्ये- क्षेपणास्त्र आणि युद्ध साधने, हत्यारे यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्याआहेत. विशाखापट्टणम येथेही भारतीय नौदलाशी संबंधित एक पाणबुडी, हेलिकॉप्टर आणि लढाऊ  विमानांचे संग्रहालय आहे.  आपल्या सर्वांना विशेषतः ज्यांना लष्करी इतिहासामध्ये रस आहे, अशा लोकांना माझा आग्रह आहे की, तुम्ही एकदा संग्रहालयांना जरूर भेट द्यावी आणि ती पहावीत.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

थंडीचे दिवस सुरू होत आहेत आणि त्याचबरोबर हिवाळ्यातील पर्यटनाचाही काळ आता सुरू झाला आहे. जगातील अनेक देशांनी थंडीमध्ये केल्या जाणाऱ्या पर्यटनाला, अर्थात ‘हिवाळी पर्यटनाला आपल्या अर्थव्यवस्थेचा खूप मोठा आधार बनवला आहे. अनेक देशांमध्ये जगातील सर्वात मोठे, यशस्वी हिवाळी महोत्सव आणि हिवाळी क्रीडा मॉडेल तयार केले आहे. या देशांनी स्किईंग, स्नो बोर्डिंग, स्नो ट्रेकिंग, आईस क्लायम्बिंग आणि ‘फॅमिली स्नो पार्क्स‘, यासारखे अनुभव लोकांना देण्यामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी आपल्या हिवाळी महोत्सवालाही वैश्विक आकर्षणांमध्ये रूपांतरित केले आहे.

मित्रांनो, आपल्या देशामध्येही हिवाळी पर्यटनाच्या दृष्टीने खूप क्षमता आहे. आपल्याकडे डोंगर,पर्वतरांगा आहेत, संस्कृतीही आहे आणि ‘अॅडव्हेंचर’ अर्थात साहसी खेळांविषयी तर अनंत, अमर्याद शक्यताही आहेत. मला आनंद वाटतो की, या दिवसांमध्ये उत्तराखंडचा हिवाळा पर्यटन प्रेमींना खूप आकर्षित करीत आहे. हिवाळ्यामध्ये औली, मुनस्यारी, चोपटा आणि डेयारा यासारखी ठिकाणे खूप लोकप्रिय होत आहेत. अलिकडेच काही आठवड्यांपूर्वी पिथौरागढ जिल्ह्यातील साडे चौदा हजार फूटांपेक्षा अधिक उंचीवर आदि कैलाशमध्ये राज्याच्या पहिल्या  सर्वाधिक उंच स्थानावर  ‘अल्ट्रा रन मॅरेथान’चे आयोजन केले होते. यामध्ये देशभरातून 18 राज्यांतील 750 पेक्षा जास्त धावपटूंनी भाग घेतला होता. 60 किलोमीटर लांबीच्या ‘आदि कैलाश परिक्रमा रन‘ चा प्रारंभ अगदी गोठवणाऱ्या थंडीमध्ये पहाटे पाच वाजता झाला. इतकी कडाक्याची थंडी असतानाही लोकांचा उत्साह कौतुकास्पद होता. आदि कैलाशच्या  यात्रेमध्ये पूर्वी म्हणजे अगदी तीन वर्षांपूर्वी साधारणपणे दोन हजारांपेक्षाही कमी पर्यटक सहभागी होत होते. आता ही संख्या वाढून तीस हजारांपेक्षाही जास्त झाली आहे.

मित्रांनो, काही आठवड्यांत उत्तराखंडमध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धांचेही आयोजन होणार आहे. देशभरातील क्रीडापटू, साहसी क्रीडाप्रेमी आणि क्रीडा क्षेत्राशी संबंधित लोक या आयोजनाविषयी उत्साहीत आहेत. स्किईंग असो अथवा स्नो बोर्डिंग, बर्फावर    होणाऱ्या अनेक प्रकारच्या खेळांची तयारी सुरू झाली आहे. उत्तराखंडने हिवाळी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी वाहन संपर्क व्यवस्था आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यावरही  लक्ष केंद्रित केले आहे. ‘होम स्टे‘ विषयी नवीन धोरणही तयार केले आहे.

मित्रांनो, हिवाळ्यामध्ये ‘वेड इन इंडिया-‘ अभियानाची एक वेगळीच गडबड असते. हिवाळ्यातील सोनेरी ऊन असो, डोंगराच्या  उतरणीवर पसरणारी  धुक्याची चादर असो, ‘डेस्टिनेशन वेडिंग‘ साठी डोंगराळ  भाग आता खूप लोकप्रिय होत आहे. अनेकजण   तर आता विशेष स्‍थान पाहिजे,  म्हणून विवाहाचे आयोजन गंगेच्या किनारी करीत आहेत.

मित्रांनो, हिवाळ्यासाठी या दिवसांमध्ये हिमालयाच्या डोंगर रांगा, दरी-खोऱ्यांमध्ये फिरणे म्हणजे एक अनोखा  अनुभव घेणे आहे. तो आयुष्यभरासाठी आपल्या आयुष्याचा भाग बनतो. आणि आयुष्यभर त्याच्या आठवणी कायम राहतात. जर तुम्ही याच हिवाळ्यात बाहेर फिरायला जाण्याचा विचार करीत असाल तर, हिमालयातील डोंगररांगा या पर्यायाचा जरूर विचार करावा.

मित्रांनो, काही आठवड्यापूर्वी मी भूतानला गेलो होतो. अशा दौऱ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संवाद आणि  आणि चर्चा करण्याची संधी  मिळते. आपल्या या प्रवासामध्ये भूतानचे नरेश, वर्तमान राजांचे  वडील, हे स्वतः आधी राजे होते, तिथले पंतप्रधान आणि इतर लोकांची मी भेट घेतली. यावेळी प्रत्येकाकडून मला एक गोष्ट आवर्जून ऐकायला मिळाली. तिथले सर्व लोक ‘बुद्धिस्ट रेलिक्स‘ म्हणजेच भगवान बुध्दांचे पवित्र अवशेष-  आपण जे पाठवले, त्याबद्दल भारतवासियांचे आभार व्यक्त करीत होते. ही गोष्ट ज्यावेळी मी ऐकली, त्यावेळी माझे हृदय अभिमानाने भरून आले.

मित्रांनो, भगवान बुध्द यांच्या पवित्र अवशेषांविषयी इतर अनेक देशांमध्येही असाच उत्साह पहायला मिळाला आहे. गेल्या महिन्यामध्येच राष्ट्रीय संग्रहालयातून   या पवित्र अवशेषांना रशियातील कलमीकिया इथे घेऊन जाण्यासाठी पाठवण्यात आले. इथे बौद्ध धर्माचे विशेष महत्त्व आहे. मला असेही सांगण्यात आले की, त्यांच्या दर्शनासाठी रशियातील खूप, अतिदुर्गम भागातूनही खूप मोठ्या संख्येने लोक तिथे पोहोचले होते. या पवित्र अवशेषांना मंगोलिया, व्हिएतनाम आणि थायलंडमध्येही नेण्यात आले आहे. प्रत्येक ठिकाणी लोकांमध्ये खूप उत्साह पहायला मिळाला आहे. त्यांच्या  दर्शनासाठी थायलंडचे राजेही पोहोचले होते. संपूर्ण विश्वामध्ये भगवान बुध्द यांच्या पवित्र अवशेषांविषयी अशा प्रकारचा खोलवर असलेला संबंध पाहून मन भावविभोर होते. एक गोष्ट ऐकून खूप चांगले वाटले की, अशा  प्रकारचा केलेला प्रयत्न अवघ्या दुनियेतील लोकांना आपआपसांमध्ये जोडण्याचे माध्यम बनला जात आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो,

तुम्हा सर्वांना मी नेहमीच ‘व्होकल फॉर लोकल‘ मंत्र जपत पुढे वाटचाल करण्याविषयी सांगत असतो. अलिकडेच काही दिवसांपूर्वी जी-20 शिखर परिषदेच्या काळात ज्यावेळी जगभरातील अनेक नेत्यांना भेटी देण्याविषयी चर्चा सुरू झाली, त्यावेळी मी पुन्हा एकदा म्हणालो, -‘व्होकल फॉर लोकल‘!! देशवासियांच्या वतीने मी जगातील नेत्यांना ज्या भेटी दिल्या, त्यामध्ये या स्थानिक भावनेकडे  विशेष लक्ष देण्यात आलं. जी-20 च्या काळात, मी दक्षिण अफ्रिकेच्या राष्ट्रपतींना नटराजाची कांस्य प्रतिमा भेटीदाखल दिली. ही प्रतिमा तामिळनाडूच्या तंजावूरचा सांस्कृतिक वारशाशी संबंधित असून,  चोल काळातील शिल्पकलेचा अद्भूत नमुना  आहे. कॅनडाच्या पंतप्रधानांना चांदीच्या अश्वाची प्रतिकृती भेट दिली. ही प्रतिकृती राजस्थानमधील उदयपूरच्या उत्कृष्ट शिल्पकलेचा नमुना आहे. जपानच्या पंतप्रधानांना चांदीमध्‍ये बनवलेली  बुद्धाची  प्रतिकृती भेट दिली. या कलाकृतीवर तेलंगणा आणि करीमनगरच्या प्रसिद्ध चांदी कारागिरांनी बारीक काम केले आहे. इटलीच्या पंतप्रधानांना फुलांची आकृती असलेला चांदीचा आरसा भेटस्वरूपामध्ये दिला. हा आरसाही करीमनगरच्या पारंपरिक धातू शिल्पकलेचे प्रदर्शन करतो. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना मी पितळी उरळी भेट दिली. ही उरळी केरळमधील मुन्नारमध्ये तयार केलेले एक उत्कृष्ट शिल्प आहे. माझा उद्देश होता की, संपूर्ण जगाने भारतीय शिल्प, कला आणि परंपरा यांच्याविषयी जाणले पाहिजे. आणि आमच्या कारागिरांची प्रतिभा वैश्विक मंचावर गेली पाहिजे.

मित्रांनो, मला आनंद आहे की, ‘व्होकल फॉर लोकल‘ या भावनेला देशाच्या कोट्यवधी लोकांनी आपल्या जीवनाचा एक भाग बनवला आहे. या वर्षी ज्यावेळी तुम्ही सण-उत्सवाच्या खरेदीसाठी बाजारामध्ये गेले असाल, त्यावेळी एक गोष्ट तुम्हालाही जाणवली असेल की,  लोकांची पसंती, आणि घरांमध्ये येणाऱ्या सामानांमध्ये एक स्पष्ट संकेत दिसून येत होता की, देश स्वदेशी वस्तूंकडे परत येत आहे. लोक स्वतःच्या मनानेच भारतीय उत्पादनांची निवड करीत आहेत. या बदलाचा अनुभव  लहान लहान दुकानदारांनाही आला आहे. यावेळी युवकांनीही ‘व्होकल फॉर लोकल‘ अभियानाला गती दिली. आगामी काही दिवसांमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षानिमित्त खरेदीचा नवीन अध्याय सुरू होईल. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा स्मरण करून देतो की, ‘व्होकल फॉर लोकल‘ हा मंत्र लक्षात ठेवावा. ज्या वस्तू, गोष्टी देशात बनल्या आहेत, त्यांचीच खरेदी करावी. तसेच ज्या उत्पादनाची निर्मिती करण्यासाठी देशवासीचे परिश्रम कारणी लागले आहेत, त्याच वस्तूंची विक्री करावी.

माझ्या प्रिय देशवासियांनो, भारतीय खेळांविषयी बोलायचे झाले, तर हा महिना अगदी ‘सुपरहिट‘ होता. या महिन्याच्या प्रारंभीच भारतीय महिला संघाने आयसीसी महिला विश्व चषक जिंकून चांगला प्रारंभ केला. परंतु त्यानंतरही मैदानावर आणखी जास्त ‘अॅक्शन‘ पहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच टोकियोमध्ये डेफ-ऑलिपिंक्स झाले होते, या स्पर्धेमध्ये भारताने आपले आत्तापर्यंतचे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करून 20 पदके जिंकली. आपल्या महिला खेळाडूंनी कबड्डी विश्वचषक जिंकून इतिहास रचला. संपूर्ण सामन्यांच्या काळामध्ये त्यांनी उत्तम प्रदर्शन करून, प्रत्येक भारतीयाचे मन जिंकले. जागतिक मुष्टीयुद्ध चषक अंतिम फेरीमध्ये आपल्या खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. या स्पर्धेत त्यांनी 20 पदके जिंकली.

मित्रांनो, ज्याविषयी बोललो आणि त्याची चर्चाही खूप झाली, ती म्हणजे आपल्या महिला संघाने ‘अंध क्रिकेट विश्वचषक‘ जिंकणे. यामध्ये सर्वात महत्वाची आणि मोठी गोष्ट म्हणजे, आपल्या या संघाला एकाही, कोणत्याही  सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला नाही. या संघाने प्रत्येक सामना जिंकला. आणि अखेर ही स्पर्धा आणि विश्वचषकही जिंकला. देशवासियांना या संघाच्या प्रत्येक खेळाडू विषयी खूप अभिमान वाटतो. या विजयी  संघाची मी पंतप्रधान निवासस्थानी भेट घेतली. खरोखरीच या खेळाडूंचा आत्मविश्वास, खेळाविषयी असलेले समर्पण, जिंकण्याची जिद्द अशा अनेक गोष्टी आपल्याला खूप काही शिकवणाऱ्या  आहेत. हा विजय आपल्या क्रीडा इतिहासातील सर्वात मोठ्या यशांपैकी एक आहे. या खेळाडूंचा विजय, प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देत राहील.

मित्रांनो, अलिकडे आपल्या देशामध्ये ‘एन्ड्युरन्स स्पोर्टस‘ ची एक नवीन क्रीडा संस्कृतीही वेगाने उदयास  येत आहे. ‘एन्ड्युरन्स स्पोर्टस‘ याचा अर्थ मला म्हणायचे   आहे की, अशा क्रीडा विषयक कार्यक्रमांविषयी आहे. यामध्ये आपल्या मर्यादेचे परीक्षण केले जाते, परीक्षा घेतली जाते.  काही वर्षांपूर्वीपर्यंत मॅरेथॉन, बाइकथॉन यासारख्या  विशेष कार्यक्रमांचे आयोजन काही विशिष्‍ट  लोकांपर्यंत मर्यादित होते. परंतु आता खूप काही बदल घडून आले आहेत. मला असेही सांगण्यात आले की, देशभरामध्ये प्रत्येक महिन्याला 1500 पेक्षा जास्त ‘एन्ड्युरन्स स्पोर्टस‘चे आयोजन केले जाते. या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी अॅथलेटस् दूर-दूरपर्यंत जातात.

मित्रांनो, एन्ड्युरन्स स्पोर्टस्‘चेच  एक उदाहरण आहे - ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन‘. आता आपण कल्पना करा की, जर तुम्हाला असे सांगितले गेले की, तुमच्याकडे एका दिवसापेक्षाही कमी अवधी आहे आणि तुम्हाला ही तीन कामे करायची आहेत. यामध्ये - समुद्रामध्ये चार किलोमीटरपर्यंत पोहणे, 180 किलोमीटर सायकल चालवणे आणि जवळपास 42 किलोमीटरची मॅरेथॉन-धावायची आहे. अशावेळी तुम्ही विचार करणार की, हे कसे काय शक्य आहे? परंतु मजबूत पोलादी-जिद्द असलेले लोक अशी कामेही यशस्वीतेने पूर्ण करतात. म्हणूनच त्याला ‘आयर्नमॅन ट्रायथलॉन‘ असे म्हटले जाते.

गोव्यामध्ये अलिकडे अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. अलिकडे या प्रकारच्या आयोजनांमध्ये लोक मोठ्या चढाओढीने सहभागी होत आहेत. अशा आणखी अनेक स्पर्धा आहेत, त्या  आपल्या  युवा सहकारी वर्गांमध्ये खूप लोकप्रिय होत आहेत. आजकाल अनेक लोक ‘फिट इंडिया संडे ऑन सायकल‘ यासारख्या कार्यक्रमामध्ये भाग घेण्यासाठी एकत्र येत आहेत. या सर्व गोष्टींमुळे फिटनेस अर्थात तंदुरूस्तीला प्रोत्साहन मिळत आहे.

मित्रांनो, तुम्हा मंडळींना दर महिन्याला भेटणे, हा माझ्यासाठी नेहमीच एक नवीन, अनोखा अनुभव असतो. तुमच्या यशोगाथा, तुमचे प्रयत्न, मला नव्याने प्रेरणा देत असतात. तुमच्याकडून येणाऱ्या संदेशांमधून ज्या शिफारशी केल्या जातात, जे अनुभव सामायिक केले जातात, त्यामुळे मला या कार्यक्रमातून भारताच्या वैविध्यतेला सामावून घेण्याची प्रेरणा मिळते. ज्यावेळी आपण पुढच्या महिन्यामध्ये भेटणार आहोत, त्यावेळी वर्ष 2025 संपण्याच्या मार्गावर असेल. देशाच्या बहुतांश भागामध्ये आता थंडीही अधिक कडाक्याची पडायला लागेल.  हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही आपली आणि आपल्या कुटुंबाची विशेष काळजी घ्यावी. पुढच्या महिन्यात आपण काही नवीन विषयांवर, नवीन व्यक्तीविषयी जरूर चर्चा करूया. खूप-खूप धन्यवाद! नमस्कार!!

***

शैलेश पाटील/संजना चिटणीस/सुवर्णा बेडेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2196532) आगंतुक पटल : 19
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Punjabi , Telugu , Manipuri , Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Bengali-TR , Gujarati , Odia , Tamil , Kannada , Malayalam