56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) समारोप सोहळ्यात रजनीकांत यांचा झाला सन्मान
#IFFIWood, 28 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) पुरस्कार वितरण सोहळ्यात, ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत हे केंद्रबिंदू ठरले. चित्रपटसृष्टीत 50 वर्षांचा उल्लेखनीय प्रवास पूर्ण केल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आले. या सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटांना प्रतिष्ठेचे सुवर्ण आणि रौप्य मयूर पुरस्कार तसेच विशेष पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. चित्रपट क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या योगदानाचा सन्मान करत या समारोहात चित्रपट निर्मितीतील उत्कृष्टतेचा जयघोष करण्यात आला.

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि माहिती-प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांच्या हस्ते रजनीकांत यांना त्यांच्या 50 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल सन्मानित करण्यात आले.

माहिती-प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री एल. मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माहिती-प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू आणि अभिनेते रणवीर सिंग यांनी, भारतीय चित्रपटसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल आणि 50 सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण केल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा सत्कार केला.

ऋषभ शेट्टी यांचा सत्कार ज्येष्ठ यक्षगान कलाकार विद्या कोल्यार यांच्या हस्ते शिरोवस्त्र(मुकूट)चढवून करण्यात आला.

माहिती-प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांनी, सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट वेब सिरीजचे पुरस्कार प्रदान केले.

राज्यमंत्री एल. मुरुगन यांच्या हस्ते "केसरी चॅप्टर 2" साठी करण सिंग त्यागी यांना सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक पुरस्कार देण्यात आला.

राज्यमंत्री एल. मुरुगन आणि सचिव संजय जाजू यांच्या हस्ते "बॅन्डिश बँडिट्स सीझन 2" साठी आनंद तिवारी यांना सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कार प्रदान करण्यात आला.

माहिती-प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा परिक्षक (ज्युरी) मंडळाचे अध्यक्ष ओमप्रकाश मेहरा यांच्या हस्ते "स्किन ऑफ यूथ" चित्रपटाचे दिग्दर्शक ॲश मेफेअर आणि अभिनेत्री ट्रान क्वान यांना सर्वोत्कृष्ट पटाचा (फिल्म) सुवर्ण मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

एनएफडीसी (नॅशनल फिल्म्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) या राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश मगदूम यांनी "सेफ हाऊस" चित्रपटासाठी एरिक स्वेन्सन यांना आयसीएफटी युनेस्को गांधी मेडल हे पदक प्रदान केले.

राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर आणि ज्युरी अध्यक्ष ओमप्रकाश मेहरा यांनी "अ पोएट" चित्रपटातील भूमिकेसाठी युबेमार रिओस यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष) पुरस्कार प्रदान केला.

राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर आणि ज्युरी अध्यक्ष ओमप्रकाश मेहरा यांनी सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट दिग्दर्शनाचा संयुक्त पुरस्कार "माय डॉटर्स हेअर" चित्रपटासाठी हेसम फरामंद आणि "फ्रँक" चित्रपटासाठी टोनिस पिल यांना प्रदान केला.

राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर आणि ज्युरी अध्यक्ष ओमप्रकाश मेहरा यांनी "गोंधळ" या मराठी चित्रपटासाठी संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार प्रदान केला.

राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, सचिव संजय जाजू, महोत्सव संचालक शेखर कपूर आणि ज्युरी अध्यक्ष ओमप्रकाश मेहरा यांनी "माय फादर्स शॅडो" चित्रपटासाठी अकिनोला डेव्हिस जूनियर यांना विशेष ज्युरी पुरस्कार प्रदान केला.
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुषमा काणे/आशुतोष सावे/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2196336
| Visitor Counter:
8