बल्गेरियाच्या ॲक्सिस ऑफ लाईफने इफ्फीमध्ये मांडले तत्त्वज्ञान आणि अध्यात्म
मॅक्सिम डोब्रोमिस्लोव्ह यांनी रशियाच्या विकसित होत असलेल्या सिनेपरिसंस्थेची दिली माहिती
आंतरराष्ट्रीय सहनिर्मिती असलेल्या 'दोज हू व्हिसल आफ्टर डार्क' या भयपटाने सिनेमातून साधली जाणारी एकता केली अधोरेखित
#IFFIWood, 26 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) आज जगातील विविध प्रदेशांमधील चित्रपट निर्माते - दिग्दर्शक जागतिक कथात्मक मांडणी आणि एकजूट साधण्याची सिनेमाची क्षमता, याची प्रचिती देण्यासाठी एकत्र आले, आणि त्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत उपस्थितांशी संवाद साधला.
या पत्रकार परिषदेत रशियातील 'ट्रान्सपरंट लँड्स' या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते मॅक्सिम डोब्रोमिस्लोव्, बल्गेरियाच्या 'ॲक्सिस ऑफ लाईफ' या चित्रपटाचे दिग्दर्शक अतानास योरदानोव्ह, तुर्की-जर्मन-बल्गेरिया यांची सह-निर्मिती असलेला 'दोज हू व्हिसल आफ्टर डार्क' या चित्रपटाचे दिग्दर्शक पिनार योरगान्सीओग्लू यांनी आपापल्या चित्रपटांविषयी संवाद साधला

या पत्रकार परिषदेदरम्यान, दिग्दर्शक अतानास योरदानोव्ह यांनी 'ॲक्सिस ऑफ लाईफचा' कलात्मक प्रवास आणि चित्रपटाचा तत्त्वज्ञानात्मक पाया याबद्दल सांगितले. यासंदर्भात त्यांनी भारतापासून प्रेरणा मिळाल्याचे सांगितले, इथले अध्यात्म आणि तत्त्वज्ञानाधारीत रुजलेल्या परंपरा या चित्रपटासाठी प्रेरणादायी ठरल्याची बाब त्यांनी नमूद केली. या चित्रपटाच्या मध्यवर्ती संकल्पनेला युवा प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला असल्याचेही त्यांनी नमूद केले. कृत्रिम बुद्धिमत्तेवरही त्यांनी भाष्य केले. कृत्रिम बुद्धिमत्ता कितीही वेगाने प्रगती करत असली तरी, ती खऱ्या मानवी भावनांची किंवा सर्जनतीलची खोली साध्य करू शकत नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.

त्याग आणि आकांक्षा
कार्यकारी निर्माते मॅक्सिम डोब्रोमिस्लोव्ह यांनी 'ट्रान्सपरंट लँड्स' मधील आकांक्षा आणि स्थलांतराच्या विषयांवर चर्चा केली. संधींच्या शोधात लोक लहान शहरांतून मोठ्या महानगरांकडे कसे वळतात, ही बाब त्यांनी अधोरेखित केली. भारत आणि रशिया यांच्यातील काही साम्यही त्यांनी यावेळी मांडले, तसेच जागतिक सिनेमातील रशियाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. जगभरातील प्रेक्षकांनी समकालीन रशियन चित्रपट निर्मितीसोबत अधिक जोडले जावे, असे आवाहन त्यांनी केले.

पिनार योरगान्सीओग्लू यांनी मांडला पदार्पण आणि जागतिक सिनेमाबाबतचा दृष्टिकोन
दिग्दर्शक पिनार योरगान्सीओग्लू यांनी आपला पहिला चित्रपट असलेला 'दोज हू व्हिसल आफ्टर डार्क' हा चित्रपट, आंतरराष्ट्रीय सहकार्यपूर्ण भागिदारीअंतर्गत साकारलेली एक कलाकृती असल्याचे सांगितले. या चित्रपटातून एका शोकग्रस्त संग्रहालय व्यवस्थापकाची गोष्ट सांगितली आहे. तो एक दैवी शक्तीसमान घटना अनुभवतो आणि तिथून तो संकटात सापडतो. या घटनांच्या अर्थाचा शोध घेत असतो, तर त्याचवेळी त्याची पत्नी आणि मुलगी त्यांच्या अव्यक्त संघर्षांशी झगडत असतात. अगदी थोड्या काळातच या कुटुंबासमोर त्यांनी त्यागलेल्या स्वप्नांची भूताटकी उभी ठाकते.

सिनेमामध्ये लोकांना सीमा ओलांडून एकत्र आणण्याची शक्ती आहे, ही बाब पिनार यांनी अधोरेखीत केली. भविष्यात आपल्याला भारतात चित्रीकरण करायला आवडेल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. भारत हा एक आकर्षक सर्जनशील परिसंस्था असलेला देश आहे, असे ते म्हणाले. आपल्याला एकाच चित्रपटात अनेक चित्रपटीय शैलींचे मिश्रण करायला आवडते, असेही त्यांनी नमूद केले.
वेगवेगळ्या संस्कृतींचे प्रतिनिधित्व करत असतानाही, समान विचारसरणीच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि जागतिक संबंधांना चालना देण्यासाठी सिनेमा हे सर्वात मजबूत माध्यम आहे, यावर सर्व चित्रपट निर्माते - दिग्दर्शकांनी सहमती व्यक्त केली.

इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, Click on:
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2191742
https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2190381
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | सोनाली काकडे/तुषार पवार/दर्शना राणे | IFFI 56
रिलीज़ आईडी:
2195253
| Visitor Counter:
18