“इफ्फी म्हणजे जिथे तुम्ही चित्रपट साजरा करता आणि जगभरातील चित्रपट पाहता”: दिग्दर्शक अग्नी
“वास्तविक जीवनाचा सामना करण्यास मदत करण्यासाठी आपण भयपट निर्माण करतो आणि रुधिरवन याच विचारावर आधारित आहे”: अभिनेत्री पावना
#IFFIWood, 24 नोव्हेंबर 2025
56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सिनेप्रेमींना आगामी कन्नड भयपट रुधीरवनची एक रोमांचक झलक दाखवण्यात आली. दिग्दर्शक अग्नि आणि मुख्य अभिनेत्री पावना गौडा यांनी आज महोत्सवातील पत्रकार परिषदेला संबोधित केले.

दिग्दर्शक अग्नि यांनी सांगितले की यापूर्वी अनेक चित्रपट प्रकल्पांमध्ये काम केले असले तरी रुधीरवन या चित्रपटाद्वारे आपण दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहोत. भयपट दिग्दर्शित करण्याच्या अनुभव विशद करताना ते म्हणाले की या शैलीसाठी वेगळ्या मानसिकतेची आवश्यकता असते. जंगले, दुर्गम भाग आणि इतर आव्हानात्मक ठिकाणी चित्रीकरण करण्यासाठी मजबूत मानसिक एकाग्रता आणि लवचिकता आवश्यक असते, असे त्यांनी नमूद केले.

आपल्या भयपटाच्या व्यावसायिक व्यवहार्यतेबद्दलच्या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितले की मर्यादित संसाधनांमध्येही भयपट शैली व्यवस्थापित केली आहे. "जवळजवळ 40 टक्के चित्रपटाचे चित्रीकरण घरामध्ये करण्यात आले आहे, यामुळे आम्हाला प्रकाशयोजना नियंत्रित करता आली आणि आवश्यकतेनुसार अनेक दृश्ये घेता आली. लहान क्रू आणि अनुकूल परिस्थितीमुळे भयपट एक व्यावहारिक आणि व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य शैली बनते," असे त्यांनी स्पष्ट केले.
इफ्फीमध्ये येण्याबद्दलचा उत्साह व्यक्त करताना ते म्हणाले, "मला नेहमीच इथे येण्याची उत्सुकता होती. मी एके दिवशी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याची योजना आखली होती आणि आज मी माझ्या पहिल्याच दिग्दर्शित चित्रपट 'रुधिरवन'साठी पत्रकारांना संबोधित करत आहे. मी आत खोलवर उत्साहाने थरथर कापत आहे." त्यांनी इफ्फीचे वर्णन असे केले की ते सीमांशिवाय सिनेमा साजरा करते. "येथे तुम्ही जगभरातील चित्रपट कोणताही भेदभाव न करता पाहता; मग व्यावसायिक, कलात्मक किंवा माहितीपट असो. इफ्फी असे चित्रपट दाखवते जे इतरत्र कुठेही सहज उपलब्ध होत नाहीत, अगदी ऑनलाइन देखील नाहीत. मला सिनेमा खरोखरच आकर्षित करतो," असे ते पुढे म्हणाले.

आपला दृष्टिकोन मांडताना अभिनेत्री पावना गौडा म्हणाली, "वास्तविक जीवनाशी जुळवून घेण्यासाठी भयपट निर्माण केला जातो असे म्हटले जाते आणि रुधिरवन त्या कल्पनेवर खरा राहतो." तिने नमूद केले की भयटात काम करणे हे इतर शैलींमध्ये काम करण्यापेक्षा खूप वेगळे आहे. "भयपट शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कठीण असतो, परंतु प्रकल्पाची वचनबद्धता आणि काहीतरी नवीन साध्य करण्याची तयारी ही अभिनेत्याला प्रेरित करते," ती म्हणाली.

रुधीरवन सारांश:
जंगलातील एका दुर्गम गावात जाणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांचे एक पथक एक रिसॉर्ट बांधकाम कंपनी आणि स्थानिक आदिवासी, ज्याला दादासी जमात म्हणतात, यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात अडकते. आदिवासी एका गैरसमजातून या पथकावर हल्ला करतात. त्यांच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्यांना एका पडक्या ट्रीहाऊसमध्ये आश्रय घ्यावा लागतो. रात्र जसजशी वाढत जाते तसतसे त्यांना हे जाणवू लागते की बाहेरील आदिवासींनी निर्माण केलेला धोका आत असलेल्या गोष्टींच्या तुलनेत काहीच नाही. बाहेर आणि आत, दोन्ही ठिकाणी मृत्यूची भीती असल्याने ते वाचतील का? जंगलतोडीच्या मानवी भयावहतेचा शोध एका राक्षसाच्या नजरेतून घेतला जातो.
पत्रकार परिषदेची लिंक:
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.
For more information, click on:
IFFI Website: https://www.iffigoa.org/
PIB’s IFFI Microsite: https://www.pib.gov.in/iffi/56/
PIB IFFIWood Broadcast Channel: https://whatsapp.com/channel/0029VaEiBaML2AU6gnzWOm3F
X Handles: @IFFIGoa, @PIB_India, @PIB_Panaji
* * *
PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/नंदिनी मथुरे/दर्शना राणे | IFFI 56
Release ID:
2193735
| Visitor Counter:
11