गृह मंत्रालय
समावेशक आपत्ती जोखीम डेटा प्रशासनावरील आशिया आणि पॅसिफिक आपत्ती माहिती व्यवस्थापन विकास केंद्राचे 10 वे अधिवेशन विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे आयोजित
प्रविष्टि तिथि:
22 NOV 2025 4:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2025
नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे आशिया आणि पॅसिफिक आपत्ती माहिती व्यवस्थापन विकास केंद्राचे “समावेशक आपत्ती जोखीम डेटा प्रशासन” या विषयावरील 10 वे अधिवेशन आयोजित करण्यात आले. या अधिवेशनामध्ये भारतीय प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्व गृहराज्य आणि आपत्ती व्यवस्थापन राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी केले. या प्रतिनिधिमंडळात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य व विभागप्रमुख राजेंद्रसिंग आणि सचिव मनीष भारद्वाज यांचा समावेश होता.

आपल्या उद्घाटनपर भाषणात नित्यानंद राय यांनी आपत्ती प्रतिबंध आणि व्यवस्थापन क्षेत्रातील भारताच्या प्रादेशिक सहकार्याबद्दलच्या वचनबद्धतेवर भर दिला. भारताच्या अध्यक्षतेखाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गतिशील नेतृत्वात, देश जोखीम मूल्यांकन, भू-स्थानिक अनुप्रयोग, परिणामाधारित अंदाजपत्रक, पूर्वसूचना प्रसारण आणि हवामान-प्रतिरोधक पायाभूत सुविधा नियोजन या सर्वांचा समावेश असलेल्या व्यापक क्षमता-वृद्धी कार्यक्रमाचे नेतृत्व करेल, असे त्यांनी सांगितले.
भारताने आशिया-प्रशांत प्रदेशातील आपत्ती आणि हवामान जोखीम कमी करण्यासाठी एपीडिम तसेच प्रादेशिक भागीदारांसोबत घनिष्ठ सहकार्य करण्याची आपली वचनबद्धता पुन्हा दृढ केली. संयुक्त राष्ट्र ईएससीएपी, एपीडिम आणि इतर बहुपक्षीय मंचांसोबतची ही भागीदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आपत्ती जोखीम कमी करण्यासाठीच्या 10- सूत्रीय दृष्टिकोनाने प्रेरित आहेत. या कार्यक्रमात स्थानिक स्तरावर गुंतवणूक वाढवणे, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमधील जाळे मजबूत करणे, जोखीम-विषयक माहिती बळकट करणे आणि प्रादेशिक सहकार्यास चालना देणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.

आशिया-पॅसिफिक प्रदेशात आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी नाविन्यपूर्ण धोरणे राबविण्यासाठी आणि प्रादेशिक सहकार्य विस्तारण्यासाठी एकत्रित वचनबद्धतेने या अधिवेशनाचा समारोप झाला. चर्चेदरम्यान एपीडिमच्या शासक मंडळाच्या मागील वर्षातील उपक्रमांचा आढावा घेण्यात आला, तसेच 2026 मध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे विचारमंथन आणि 2026-2030 या कालावधीसाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करण्यात आला. या बैठकीतून निघालेल्या निष्कर्षांवर आधारित एपीडिमचे आगामी कार्यक्रम ठरविले जातील आणि ते सेन्डाई फ्रेमवर्क आणि 2030 शाश्वत विकास आराखड्याच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेमध्येही योगदान देतील.

या दहाव्या अधिवेशनात बांगलादेश, इराण, मालदीव, कझाकिस्तान, मंगोलिया आणि तुर्की यांच्या प्रतिनिधिमंडळ प्रमुखांनी तसेच ताजिकिस्तानच्या पर्यवेक्षक प्रतिनिधींनी सहभाग घेतला. अधिवेशनास संयुक्त राष्ट्रांच्या आशिया आणि पॅसिफिकसाठीच्या आर्थिक आणि सामाजिक आयोगाचे प्रशासन संचालक स्टीफन कूपर, एपीडिमच्या संचालिका लेतिजिया रॉसानो, वरिष्ठ समन्वयक मोस्तफा मोहंघेघ आणि इराण तसेच इतर निरीक्षक संस्थांतील अधिकारी उपस्थित होते.
* * *
शैलेश पाटील/राज दळेकर/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2192892)
आगंतुक पटल : 15