शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

शिक्षण मंत्रालयाकडून ‘काशी तमिळ संगमम् 4.0 चे 2 डिसेंबर 2025 पासून आयोजन; काशी आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक नात्याचा उत्सव साजरा होणार

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2025 4:46PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 नोव्हेंबर 2025

 

2 डिसेंबर 2025 पासून शिक्षण मंत्रालयाकडून 'काशी तमिळ संगम 4.0' चे आयोजन करण्यात येणार असून, हा उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून प्रेरित असून, तामिळनाडू आणि काशी यांच्यातील प्राचीन सांस्कृतिक, भाषिक आणि जनतेमधील संबंधांचा सन्मान करणारा आहे. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेचे प्रतिबिंब यात दिसून येते.

या कार्यक्रमाचे समन्वयक भारतीय तंत्रज्ञान संस्था मद्रास आणि बनारस हिंदू विद्यापीठ असून, त्यांना संस्कृती मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालय, पर्यटन मंत्रालय, वस्त्र मंत्रालय, अन्न प्रक्रिया मंत्रालय, सूक्ष्म, छोटे व मध्यम उद्योग मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन आणि उत्तर प्रदेश शासन यांचे सहाय्य मिळणार आहे.

2022 पासून काशी तमिळ संगम कार्यक्रमास मोठा लोकसहभाग मिळाला असून, हा दोन प्राचीन विद्यापीठांचा सांस्कृतिक सेतु ठरला आहे. तिसऱ्या आवृत्तीच्या यशावर आधारित, चौथी आवृत्ती शिक्षण, सांस्कृतिक अनुभव, शैक्षणिक संवाद आणि युवक सहभाग यावर भर देणार आहे.

2025  ची मुख्य संकल्पना: “तमिळ शिकूया – तमिळ करकलाम”

काशी तमिळ संगम 4.0ची मुख्य संकल्पना: “देशभर तमिळ भाषा शिकण्यास प्रोत्साहन देणे आणि भारताच्या शास्त्रीय भाषिक-साहित्यिक परंपरेबाबत जनजागृती वाढवणे हे उद्दिष्ट आहे.

या आवृत्तीत तमिळनाडूतील 1,400 हून अधिक प्रतिनिधी सात श्रेण्यांमध्ये सहभागी होणार:

  1. विद्यार्थी
  2. शिक्षक
  3. लेखक व प्रसार माध्यम  व्यावसायिक
  4. कृषी व संलग्न क्षेत्र
  5. व्यावसायिक व कारागीर
  6. महिला
  7. आध्यात्मिक विद्वान आणि साधक

प्रतिनिधींना 8 दिवसांचा अनुभव दौरा मिळणार आहे. यात वाराणसी, प्रयागराज, अयोध्या येथे भेटी, संवाद, सेमिनार, सांस्कृतिक कार्यक्रम, स्थानिक खाद्य-प्रकार, हस्तकला आणि वारसा अनुभवता येईल.

तामिळ वारशाच्या स्थानांना भेट: प्रतिनिधींना वाराणसीतील महाकवी सुब्रमण्य भारतीयर यांच्या पुश्तैनी घर, केदार घाट, 'लिट्ल तामिळनाडू' भागातील काशी मठ, श्री काशी विश्वनाथ मंदिर आणि माता अन्नपूर्णा मंदिर यांना भेट दिली जाणार आहे. तसेच, बनारस हिंदू विद्यापीठ मधील तामिळ विभागात शैक्षणिक व साहित्य संवादही होईल.

काशी तमिळ संगमम 4.0 अंतर्गतचे प्रमुख उपक्रम

1. संत अगस्त्य वाहन मोहीम : तेनकासी ते काशी

तमिळनाडू आणि काशी दरम्यानच्या प्राचीन सांस्कृतिक मार्गाचा माग घेणारी  काढणारी संत अगस्त्य वाहन मोहीम राबवली जाणार आहे. 2 डिसेंबर 2025 रोजी तेनकासीहून हा मोहीमेला प्रारंभ होईल आणि ती 10 डिसेंबर 2025 रोजी काशी इथे तिचा समारोप होईल. या मोहिमेअंतर्गत पांडियन शासक श्री आदिवीर पराक्रम पांडियन यांनी केलेले प्रयत्न अधोरेखित केले जाणार आहेत. त्यांनी तमिळनाडूहून काशीपर्यंत केलेल्या प्रवासातून भारतीय संस्कृतीतील एकात्मतेचा संदेश दिला आणि भगवान शंकराचे एक मंदिरही बांधले. एकतेची भावना रुजवण्यासाठी त्यांनी शहराचे नाव बदलून तेनकासी (दक्षिण काशी) असे ठेवले होते.

ही मोहीमेद्वारे चेर, चोळ, पांड्य, पल्लव, चालुक्य आणि विजयनगर कालखंडातील नागरी संस्कृतीमधील परस्पर दुवा प्रकाशझोतात आणला जाईल, तसेच अभिजात तमिळ साहित्य, सिद्ध औषधोपचार प्रणाली आणि परस्पर सामायिक वारशासंबंधीची जागरूकता निर्माण करेल.

2. वाराणसी, उत्तर प्रदेशमधील शाळांमध्ये तमिळ भाषेचे अध्यापन

तमिळ शिकूया (Tamil Karkalam) या अभियानाअंतर्गत 50 तमिळ शिक्षक काशीमधील हिंदी भाषिक शालेय विद्यार्थ्यांना तमिळ भाषा शिकवतील.

3. उत्तर प्रदेशमधील विद्यार्थ्यांसाठी तमिळ शिक्षण अभ्यास दौरे

काशीमधील 300 महाविद्यालयीन विद्यार्थी 15 दिवसांच्या तमिळ भाषा शिक्षण कार्यक्रमासाठी तमिळनाडूतील निवडक संस्थांना भेट देतील. चेन्नईमधील केंद्रीय अभिजात तमीळ संस्था (CICT) या कार्यक्रमासाठी अभ्यास साहित्य आणि मार्गदर्शनाची जबाबदारी पार पाडणार आहे. यासोबतच या उपक्रमाची यजमान संस्था तमिळनाडूचा वारसा, परंपरा आणि काशीसोबतचे ऐतिहासिक संबंध अधोरेखित करणारे शैक्षणिक आणि सांस्कृतिक अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करणार आहे. या विद्यार्थ्यांचे चेन्नईत उत्स्फूर्त स्वागतही केले जाणार आहे.

काशी तमिळ संगमम 4.0 चे आयोजन सांस्कृतिक देवाणघेवाण, भाषिक समृद्धी आणि ज्ञानाच्या आदान प्रदानाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मतेला बळकटी देण्याची केंद्र सरकारची दृढ वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त होणार आहे. विविध समाजांना एकत्र आणणारा हा कार्यक्रम भारताच्या नागरी संस्कृतीच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे आणि सांस्कृतिक एकात्मतेचे चैतन्यमयी सार मूर्त रूपात साकारणारा कार्यक्रम ठरणार आहे.

या उपक्रमाकरता नोंदणी करण्यासाठी:

काशी तमिळ संगमम 4.0 साठी दोन विशेष नोंदणी पोर्टल्स सुरू करण्यात आले आहेत : https://kashitamil.iitm.ac.in/ हे पोर्टल सर्व सहभागींना नोंदणी करण्यासाठी खुले असेल. यावर 21 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 8:00 वाजतेपर्यंत नोंदणी करता येईल. यासोबतच 23 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 10:00 ते सायंकाळी 5:00 या वेळेत निवड चाचणी घेतली जाईल.

दुसरे पोर्टल हे विद्यार्थ्यांसाठीचे विशेष पोर्टल आहे. याअंतर्गत https://kashitamil.bhu.edu.in/ या पोर्टलवर विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. यावरून केवळ 300 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. निवड झालेले विद्यार्थी डिसेंबर 2025 च्या तिसऱ्या आठवड्यात 15 दिवसांच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यासाठी तमिळनाडूला भेट देतील.

 

* * *

गोपाळ चिप्पलकट्टी/शैलेश पाटील/राज दळेकर/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2192886) आगंतुक पटल : 29
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Odia , English , Urdu , हिन्दी , Tamil , Kannada , Malayalam