iffi banner

युनिसेफ एक्स इफ्फी: पाच चित्रपट, एक वैश्विक कहाणी


56 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील बाल्यावस्थेतील धैर्य, सर्जनशीलता आणि स्वप्नांचा शोध घेणाऱ्या पाच चित्रपटांचे सादरीकरण होणार

#IFFIWood, 19 नोव्‍हेंबर 2025

 

भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र बालक निधी  (युनिसेफ) बरोबर भागीदारी करणार असून चालत्या-बोलत्या,आव्हान देणाऱ्या आणि प्रेरित करणाऱ्या कहाण्यांच्या माध्यमातून बाल्यावस्थेच्या विविध छटा, त्यातील नवल, त्यांचे संघर्ष आणि त्यांची अतूट लवचिकता साजरी करणार आहे!

युनिसेफ एक्स इफ्फी यांचे सहयोगपूर्ण नाते 2022 मध्ये पहिल्यांदा सुरु झाले. आता या सहयोगाच्या चौथ्या वर्षी, लहान मुलांचे हक्क आणि चित्रपट महोत्सव यांच्या जगातील दोन प्रख्यात ब्रँड्स एकत्र येऊन एक असा अवकाश उभारत आहेत जेथे चित्रपट विश्वाची विवेकाशी सांगड घातली आहे. इफ्फीच्या 56 व्या वर्षीच्या कार्यक्रमात, लहान मुलांचे धैर्य, सर्जनशीलता आणि आशावाद साजरे करतानाच, विविध संस्कृतींमध्ये मुलांना भेडसावणाऱ्या वास्तवाला भिडणारे चित्रपट एका मंचावर एकत्र होत आहेत. युनिसेफच्या मानवतावादी संकल्पनेला चित्रपटाच्या अभिव्यक्ती सामर्थ्यासह एकत्र जोडून ही भागीदारी, अधिक उत्तम विश्व अनुभवायला मिळण्याचा प्रत्येक मुलाचा हक्क मिळवून देण्यासाठी सहानुभूतीला जाग आणण्याची आणि त्यानुसार कृती करण्याची प्रेरणा देण्याची चित्रपट माध्यमाची शक्ती पुन्हा एकदा अधोरेखित करते.

पाच चित्रपट, एक वैश्विक कहाणी

यावर्षी या विभागाच्या शृंखलेत- जगभरातून कोसोव्हो, दक्षिण कोरिया, इजिप्त आणि भारत या देशांतील पाच विलक्षण चित्रपट सादर होणार आहेत. यापैकी प्रत्येक चित्रपट आपल्यासमोर बालपणातील - मालकीचा शोध, सन्मानासाठीचा लढा, प्रेमाची आस आणि स्वातंत्र्याचे स्वप्न-  अशा वेगवेगळ्या संकल्पनांचे वास्तव उभे करतो. एका सूत्रात गुंफलेल्या या कथा, युनिसेफ आणि इफ्फीची सामायिक भावना, हृदयाची दारे उघडण्याच्या बाबतीत कथाकथनाच्या सामर्थ्यावरील विश्वास आणि प्रत्येक बालकासाठी अधिक न्याय्य, करुणामय विश्वाला आकार देण्याच्या इच्छेचे मूर्त रूप साकार करणारे एक मर्मभेदक चित्रपटीय वस्त्र तयार करतात.

1. हॅपी बर्थडे (इजिप्त/ इजिप्शियन अरेबिक भाषा)

इजिप्तच्या चित्रपट निर्मात्या सारा गोहर यांचा हॅपी बर्थडे हा पदार्पणातील मर्मभेदक चित्रपट त्रिबेका चित्रपट महोत्सव 2025मध्ये प्रदर्शित करण्यात आला आणि तो इजिप्ततर्फे ऑस्कर पारितोषिकासाठी देखील नामनिर्देशित झाला आहे. हा चित्रपट आजूबाजूचे विश्व पराकोटीचे प्रतिकूल असूनही, सर्वात आवडती मैत्रीण नेली हिच्या वाढदिवसासाठी एक उत्कृष्ट समारंभ आयोजित करण्याचा निश्चय केलेल्या आठ वर्षांच्या तोहा या घरकाम करणाऱ्या मुलीची गोष्ट सांगतो. आधुनिक काळातील कैरो शहराच्या पार्श्वभूमीवर घडणारा हा चित्रपट विशेष लाभ आणि निष्पापपणा यातील तीव्र विभागणी उघड करतो आणि लहान मुले बहुतेकदा त्यांच्या सभोवताली वावरणाऱ्या मोठ्या माणसांपेक्षा मानवतेच्या तत्वाला अधिक स्वच्छपणे पाहू शकतात हे दाखवून देतो.  

हॅपी बर्थडे हा चित्रपट मैत्री आणि असमानता यांचे नाजूकपणे चित्रण करून, कोणत्याही भागात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलासाठी सन्मान, समानता आणि संधी मिळवून देण्यासाठीची युनिसेफची बांधिलकी दाखवून देतो.

2- कडाल कण्णी (भारत/तमिळ भाषा)

तमिळ चित्रपट निर्माते दिनेश सेल्वराज यांचा कडाल कण्णी हा गीतमय चित्रपट अनाथ मुलांच्या भावविश्वाचे दर्शन घडवतो. या मुलांच्या स्वप्नामध्ये देवदूत आणि जलपऱ्या येतात. प्रेम/काळजी, निवांतपणा कोणाशीतरी जोडल्याची भावना याच्या प्रतीकांची स्वप्ने पाहणारे जग यात रंगवले आहे. वास्तव आणि मनोरथ यांचा मिलाफ घडवून हा चित्रपट अशा कल्पना उदात्तपणे मांडतो ज्यांच्या बळावर ती बालके कष्टमय जीवनातही तग धरू शकतात. जिवंत राहण्याचे पहिले स्वरूप स्वप्नांमधून दिसते, याची आठवण हा चित्रपट आपल्याला करून देतो. उत्तम काव्य आणि करुणा यांच्या सहाय्याने कडाल कण्णी चित्रपट, युनिसेफ X-IFFI च्या चित्रपेटिकेत तंतोतंत बसतो. हा चित्रपट एक प्रकारे प्रत्येक बालकाचा स्वप्ने बघण्याचा, लोकांचा नजरेत राहण्याचा आणि प्रेम करून घेण्याचा अधिकार साजरा करतो.

3- पुतुल (भारत/ हिंदी भाषा) 

भारतीय चित्रपट निर्माते राधेश्याम पिपलवा यांचा पुतुल चित्रपट, आई-वडिलांच्या घटस्फोटाच्या भावनिक वादळात सापडलेल्या सात वर्षांच्या मुलीचे दर्शन घडवतो. दुखावलेल्या आणि गोंधळलेल्या त्या मुलीला तिच्या लाडक्या आजोबांमध्ये आणि 'डॅमेज्ड गॅंग' नावाच्या मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये विसावा मिळतो. ती नाहीशी झाल्यावर तिच्या पालकांना त्यांच्या भीतीचा आणि स्वतःच्या अंतरंगातील कच्च्या दुव्यांचाही सामना करावा लागतो. दुभंगलेल्या कुटुंबातील बालकांचे मूकपणे सहन करत राहणे 'पुतुल'मधून परिणामकारकपणे समोर येते, आणि एका अर्थी संवेदनशील पद्धतीने प्रेक्षकाला हेलावून सोडते. मानसिक स्वास्थ्यासाठी युनिसेफ करत असलेल्या प्रचाराचा प्रतिध्वनी या चित्रपटात उमटलेला दिसतो आणि प्रेम, समजून घेतले जाणे आणि सुरक्षा याचा प्रत्येक बालकाला असलेला अधिकार हा चित्रपट जाणवून देतो.

4- द बीटल प्रोजेक्ट (कोरिया/ कोरियन भाषा)

कोरियन चित्रपट निर्माते जिन क्वांग-क्यो यांच्या हृदयस्पर्शी अशा 'द बीटल प्रोजेक्ट' चित्रपटाचा पहिला खेळ, शिकागोमध्ये 'द एशियन पॉप अप' मध्ये झळकला होता. चित्रपट सुरू होतो तोच एका प्लास्टिकच्या पिशवीतील ढेपक्यापासून. उत्तर कोरियातील हा ढेपका (बीटल) दक्षिण कोरियातील एका मुलीच्या हाती लागतो. त्या ढेपक्यामुळे कोरियन सीमेच्या दोन्ही बाजूच्या बालकांमध्ये कुतूहल आणि एकमेकांशी जोडल्याची भावना उत्पन्न होते. तो ढेपका देशकालाच्या सीमा भेदून दोन्हीकडे वाटणाऱ्या नवलाईचे प्रतीक बनतो. काहीशा स्नेहभावनेने आणि विनोदी अंगाने उलगडत जाताना हा चित्रपट कुतूहल, सहभावना आणि अतिशय दूरवरच्या 'अंतरांना' जोडणारी निरागस आशा यांचे उदात्त रूप मांडतो. दिलजमाई आणि करुणा हे भाव उत्कटपणे मांडणारा 'द बीटल प्रोजेक्ट' म्हणजे, शांतता आणि सामंजस्य यांना प्रेरणा देण्यासाठी तरुण मनांमध्ये उमटणाऱ्या कल्पना आणि सहभावना यांच्यावरील युनिसेफच्या विश्वासाचे मूर्तरूप आहे.

5. द ओडिसी ऑफ जॉय (Odiseja e Gëzimit) (फ्रान्स, कोसोव्हो / अल्बेनियन, इंग्रजी, फ्रेंच, रोमानी भाषा)

कोसोवन चित्रपट निर्माते झजिम तेर्झिकी यांचा 'ओडिसी ऑफ जॉय' हा चित्रपट कैरो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाची कथा नवीन सहस्रकाच्या पहाटे उलगडते. 11 वर्षांचा लिस, त्याचे वडील युद्धात बेपत्ता आहेत, ते दुःख आणि जगण्याचा संघर्ष या दुहेरी आव्हानांचा सामना करत तो आपली वाट शोधतो आहे. आणि जेव्हा तो युद्धानंतरच्या कोसोवोमधून स्थानिक मुलाचं मनोरंजन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या फ्रेंच विदुषकांच्या गटात सामील होतो, तेव्हा लिसचा मानसिक उभारीच्या दिशेने एक शांत प्रवास सुरू होतो, त्याला उमगतं, की एकदा गमावलेली आशा परत मिळवता येते.

सौम्य, पण गहन विचार मांडणारा ‘ओडिसी ऑफ जॉय’, संघर्षातही बालपण जपणारी चिकाटीची भावना टिपतो, आणि प्रत्येक मुलाच्या आनंद, सुरक्षितता आणि भविष्याच्या अधिकारावर असलेला युनिसेफचा (UNICEF) ठाम विश्वास प्रतिबिंबित करतो.

एकत्रितपणे, हे पाच चित्रपट युनिसेफ × इफ्फी सहकार्याचा गाभा साकारतात, आणि चित्रपटाच्या परिवर्तनकारी शक्तीचा वापर करून जगाच्या कोणत्याही प्रदेशातील मुलांच्या आशा, भीती आणि विजय, या भावना प्रकट करतात.  

जगभरातील मुलांच्या जीवनाचे चित्रण करणाऱ्या या दमदार चित्रपटांचे प्रदर्शन चुकवू नका.

युनिसेफ × इफ्फीमधील चित्रपटांचे प्रदर्शन पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

इफ्फी (IFFI):

1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी), दक्षिण आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा चित्रपट महोत्सव म्हणून ओळखला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी), गोवा राज्य सरकार यांनी संयुक्तपणे आयोजित केलेला हा महोत्सव ‘जागतिक सिनेमॅटिक पॉवरहाऊस’ म्हणून प्रस्थापित झाला आहे, जिथे पुनर्संचयित क्लासिक्स धाडसी प्रयोगांना सामोरे जातात आणि सिनेमातील दिग्गज आणि निर्भय, नवागत चित्रकर्मी एकाच व्यासपीठावर एकत्र येतात. इफ्फी ला खऱ्या अर्थाने झळाळी देणारी गोष्ट म्हणजे, विविध कार्यक्रमांचे अद्भुत मिश्रण- इथल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक प्रदर्शने, मास्टरक्लासेस, सन्मान आणि ऊर्जामय वेव्हज फिल्म बझार, जिथे कल्पना, करार आणि सहयोग एकत्रितपणे भरारी घेतात. 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्याच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या सागरी किनारपट्टीच्या पार्श्वभूमीवर रंगणाऱ्या 56 व्या इफ्फी महोत्सवात, भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाज, याचा  चमकदार मेळ पाहायला मिळेल, आणि जागतिक मंचावर भारताच्या सर्जनशील प्रतिभेचा हा अविस्मरणीय सोहळा असेल.

 

* * *

PIB IFFI CAST AND CREW | गोपाळ चिप्पलकट्टी/निलिमा चितळे/संजना चिटणीस/जाई वैशंपायन/राजश्री आगाशे/दर्शना राणे | IFFI 56


Great films resonate through passionate voices. Share your love for cinema with #IFFI2025, #AnythingForFilms and #FilmsKeLiyeKuchBhi. Tag us @pib_goa on Instagram, and we'll help spread your passion! For journalists, bloggers, and vloggers wanting to connect with filmmakers for interviews/interactions, reach out to us at iffi.mediadesk@pib.gov.in with the subject line: Take One with PIB.


Release ID: 2191802   |   Visitor Counter: 10