आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते प्रतिजैविक प्रतिकारकतेवरील राष्ट्रीय कृती योजनेच्या दुसऱ्या आवृत्तीचे लोकार्पण


प्रतिजैविकांचा अतिवापर आणि गैरवापर सहजपणे केला जात असून यामुळे सुधारणात्मक उपाययोजनांची तातडीची गरज निर्माण झाली आहे - जगत प्रकाश नड्डा

Posted On: 18 NOV 2025 4:18PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांच्या हस्ते आज प्रतिजैविक प्रतिरोधकतेवरील (Antimicrobial Resistance - AMR) राष्ट्रीय कृती योजनेच्या दुसऱ्या आवृत्तीचे (2025–29) लोकार्पण करण्यात आले.

यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमाला नड्डा यांनी संबोधित केले. प्रतिजैविक प्रतिरोधकता हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या चिंतेचा विषय झाला असल्याची दखल त्यांनी घेतली. या समस्येवर सामूहिक कृतींच्या माध्यमातूनच मात करता येईल याची जाणिव त्यांनी उपस्थितांना करून दिली. त्यादृष्टीनेच 2010 मध्ये प्राथमिक चर्चेच्या माध्यमातून हा प्रवास सुरू झाला आणि त्यानंतर 2017 मध्ये पहिली राष्ट्रीय कृती योजना - प्रतिजैविक  प्रतिरोधकता (एनएपी-एएमआर) योजना सुरू करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.

प्रतिजैविक प्रतिरोधकतेमुळे विशेषत: शस्त्रक्रिया, कर्करोगावरील उपचार आणि इतर अत्यावश्यक आरोग्य सेवा विषयक उपाययोजनांना मोठे धोके निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रतिजैविकांचा अतिवापर आणि गैरवापर दुर्दैवाने सर्रासपणे केला जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. यामुळे सुधाराणात्मक उपाययोजनांची तातडीची गरज निर्माण झाली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. त्याअनुषंगाने आता विविध मंत्रालयांनी देखील अनेक महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले असल्याची माहिती त्यांनी दिली.

राष्ट्रीय कृती योजना - प्रतिजैविक  प्रतिरोधकता 2.0 अंतर्गत पहिल्या एनएपी-एएमआरमध्ये आढळलेल्या त्रुटी दूर केल्या गेल्या आहेत. याअंतर्गत प्रतिजैविक  प्रतिरोधकतेशी संबंधित प्रयत्नांच्या  दायित्वाची व्याप्ती विस्तारणे,  आंतर क्षेत्रीय समन्वयाला बळकटी देणे आणि खासगी क्षेत्राचा अधिकाधिक सहभाग असेल याची  सुनिश्चिती करण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय कृती योजना – प्रतिजैविक  प्रतिरोधकता 2.0 अंतर्गत लागू केल्या जाणाऱ्या प्रतिजैविक  प्रतिरोधकता नियंत्रणाशी संबंधित प्रमुख धोरणांविषयी देखील त्यांनी माहिती दिली. यादृष्टीने जागरूकता वाढवणे, शिक्षित करणे आणि प्रशिक्षण देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आरोग्य विषयक सेवा सुविधांमध्ये प्रयोगशाळेची क्षमता आणि संसर्ग नियंत्रणाच्या उपाययोजनांचा विस्तार करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. याबाबतीत आपल्या समोर असलेल्या आव्हानांवर तातडीने मात करण्यासाठी  संबंधित भागधारकांच्या नियमित बैठका होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.

पार्श्वभूमी

प्रतिजैविक  प्रतिरोधकतेचे, आरोग्यासह गंभीर राजकीय आणि आर्थिक दुष्पपरिणाम होत असल्याचे जगभर दिसून आले आहे, त्यामुळे प्रतिजैविक  प्रतिरोधकतेला आरोग्य विषयक जागतिक धोका म्हणून मानले गेले आहे. प्रतिजैविक  प्रतिरोधकतेमुळे उपचारांमध्ये विलंब होतो, यामुळे प्रतिरोधी सूक्ष्मजीवांचा प्रसार होण्याचा धोका वाढतो, आरोग्य सेवेवरील खर्चात वाढ होते तसेच यामुळे कुटुंबांसह समाजावरचा आर्थिक भारही वाढतो. प्रतिजैविक  प्रतिरोधकतेमुळे शस्त्रक्रिया, कर्करोगाचे उपचार आणि अवयव प्रत्यारोपण यांसारख्या प्रक्रियांची सुरक्षितता आणि परिणामकारकेलाही धोका निर्माण होता. एका अर्थाने प्रतिजैविक  प्रतिरोधकता  आधुनिक वैद्यकशास्त्रासह,  जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रगती आणि अर्थव्यवस्थेच्या प्रगतीला नुकसान पोहोचवू शकते.

प्रतिजैविक  प्रतिरोधकता ही एक बहु क्षेत्रीय समस्या बनली आहे. यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकसामायिक आरोग्यविषयक दृष्टिकोनातून काम करण्याची गरज निर्माण झाली आहे.   मानव, प्राणी, कृषी आणि पर्यावरण या प्रत्येक क्षेत्रांशी संबंधितांनी प्रतिजैविक  प्रतिरोधकतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कृतीशील योगदान देण्याप्रती वचनबद्धता दाखवली तर एकसामायिक आरोग्यविषयक दृष्टिकोनाचा यशस्वी होऊ शकतो.

आजचा कार्यक्रम हा पहिल्या जागतिक प्रतिजैविक  प्रतिरोधकता जागरूकता सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित केला गेला होता. या लोकार्पण सोहळ्यादरम्यान, सर्व भागधारकांनी प्रतिजैविक  प्रतिरोधकतेवर नियंत्रण मिळवण्यासाठी राष्ट्रीय कृती योजना 2.0 लागू करण्याचा आपला निर्धार पुन्हा एकदा दृढपणे व्यक्त केला. 

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2191230) Visitor Counter : 7