पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
ब्राझीलमधील बेलेम येथे कॉप 30 मध्ये आयबीसीए वरील उच्च स्तरीय मंत्रीस्तरीय बैठकीत केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी सादर केली भारताची भूमिका
Posted On:
18 NOV 2025 11:17AM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 18 नोव्हेंबर 2025
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी 17.11.2025 रोजी ब्राझीलमधील बेलेम येथे यूएन एफ सी सी सी कॉप 30 येथे आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (आय बी सी ए) संदर्भातील उच्च पातळीवरील मंत्रीस्तरीय बैठकीला संबोधित केले. त्यांनी एकात्मिक हवामान आणि जैवविविधता कृतीचा भाग म्हणून मोठ्या मार्जारकुळातील प्रजाती आणि त्यांच्या अधिवासांचे संरक्षण करण्यासाठी जागतिक सहकार्याचे नूतनीकरण करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मंत्र्यांनी ब्राझीलचे आभार मानले आणि मोठ्या मार्जारकुळाचे संरक्षण, हवामान आणि जैवविविधतेचे संरक्षण या विषयाची समयोचितता विशद केली. आज पर्यावरणीय आव्हाने एकमेकांशी सखोलपणे जोडलेली आहेत आणि त्यांच्यासाठी परस्पर निगडित उपाययोजनांची आवश्यकता आहे यावर त्यांनी भर दिला. यादव यांनी नमूद केले की मोठे मार्जारकुळ हे सर्वोच्च शिकारी, पर्यावरणीय संतुलनाचे नियामक आणि परिसंस्थेच्या आरोग्याचे रक्षक आहेत. मोठ्या मार्जारकुळाच्या लोकसंख्येत घट होत असल्याने परिसंस्था अस्थिर होतात, हवामान बदलांचा सामना करू शकणारी लवचिकता कमकुवत होते आणि नैसर्गिकरीत्या कार्बन विसर्जित करणाऱ्या परिसंस्थेचे नुकसान होते यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
मोठ्या मार्जारकुळामधील सातपैकी पाच प्रजातींचे घर म्हणून भारताच्या भूमिकेबद्दलची माहिती यादव यांनी दिली आणि देशाच्या प्रमुख संवर्धन यशोगाथांची रूपरेषा सांगितली. "भारताने लक्ष्यित वेळेपूर्वीच वाघांची संख्या दुप्पट केली आहे तसेच आपल्या आशियाई सिंहांची संख्या चांगली वाढत आहे", असे मंत्री म्हणाले.
यादव यांनी आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्सच्या विस्तारित सदस्यत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी नमूद केले की आयबीसीए हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक असा दृष्टिकोन आहे, जो विश्वास, परस्पर आदर आणि सामायिक जबाबदारीवर आधारित आहे, जो 'एक पृथ्वी, एक जग, एक भविष्य' या तत्वज्ञानावर आधारित आहे. त्यांनी माहिती दिली की 17 देश औपचारिकपणे आयबीसीएशी जोडले गेले आहेत, तर 30 हून अधिक देशांनी त्यात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मोठ्या मार्जारकुळाशी निगडित असलेल्या सर्व देशांना तसेच जैवविविधता आणि हवामान सुरक्षेला महत्त्व देणाऱ्या सर्व राष्ट्रांना या आघाडीमध्ये आणण्याची भारताची महत्त्वाकांक्षा आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर, मंत्र्यांनी घोषणा केली की भारत सरकार 2026 मध्ये नवी दिल्ली येथे 'जागतिक मोठे मार्जारकुळ (बिग कॅट) शिखर परिषद' आयोजित करणार आहे. त्यांनी सर्व श्रेणीतील देशांना मोठे मार्जारकुळ आणि त्यांचे अधिवास वाचवण्यासाठी आपापले अनुभव आणि धोरणे सामायिक करण्यासाठी या परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण दिले. त्यांनी सर्व राष्ट्रांना आयबीसीए मध्ये सामील होण्याचे आणि जागतिक संवर्धन भागीदारी मजबूत करण्याचे आवाहन केले.


सुषमा काणे/नंदिनी मथुरे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2191094)
Visitor Counter : 4