श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 मधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या पहिल्या आधुनिक डिजिटल दालनाचे उद्घाटन

Posted On: 17 NOV 2025 10:33PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025

 

नवी दिल्लीतील भारत मंडपममघ्ये आयोजित भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 मध्ये, पहिल्यांदाच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपले अत्याधुनिक दालन उभारले आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते या दालनाचे औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे, केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त रमेश कृष्णमूर्ती तसेच श्रम आणि रोजगार मंत्रालय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासह इतर महत्त्वाचे भागधारकही उपस्थित होते.

भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन 2025 मध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या दालनाचे उद्घाटन करून खूप आनंद झाल्याची भावना डॉ. मनसुख मांडविया यांनी व्यक्त केली. भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन हे कायमच भारताच्या विकासाची वाटचाल दर्शवणारे एक महत्त्वाचे व्यासपीठ म्हणून काम करत आले असल्याचे त्यांनी नमूद केले. यावर्षी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शनात पदार्पण केले आहे. या दालनाच्या माध्यमातून या आस्थापनेची पारदर्शकता, कार्यक्षमता तसेच मोठ्या प्रमाणात सेवा वितरणाची प्रचिती देणारी अद्ययावत आणि आधुनिक ओळख सर्वांसमोर मांडली जात असल्याचे त्यांनी सांगितले. भारताची सामाजिक सुरक्षा संरचना बळकट करण्यात, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सातत्यपूर्ण प्रगती केली असल्याचे त्यांनी नमूद केले, आणि याबद्दल संस्थेची प्रशंसाही केली. देशातील कार्यरत मनुष्यबळाची आर्थिक प्रतिष्ठा सुनिश्चिती करण्यात ही संस्था मध्यवर्ती भूमिका बजावत असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या या दालनातून केंद्र सरकारच्या जीवन सुलभता आणि सर्वांसाठी डिजिटल सार्वजनिक सेवा या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब उमटले आहे, आणि या संकल्पनेला भविष्यासाठी सज्ज आणि नागरिक केंद्रित डिजिटल अनुभवाचा स्पर्श दिला गेला आहे. या दालनाला भेट देणारे अभ्यागत निवृत्ती वेतन सुविधा क्षेत्र, नियोक्ता मदतकक्ष, ई-सेवा प्रात्यक्षिके आणि कर्मचारी भविष्य निधी, कर्मचारी निवृत्ती वेतन योजना, कर्मचारी ठेव संलग्न विमा आणि प्रधानमंत्री विमा योजना यांसारख्या सामाजिक सुरक्षा योजना तसेच नुकतीच घोषित करण्यात आलेली कर्मचारी नावनोंदणी योजना 2025 याबद्दल जागृतीपर माहिती पाहू शकतात.

   

नागरिकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने या दालनाच्या प्रत्येक कक्षात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे तज्ज्ञ उपस्थित असतील याची सुनिश्चिती केली गेली आहे. याद्वारे नागरिकांना संबंधित सेवा थेट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिक अभ्यागत दालनात आपले दावे, संयुक्त घोषणापत्र देखील दाखल करू शकणार आहेत, UAN तयार करू शकणार आहेत, तसेच डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या या दालनाच्या माध्यमातून नागरिकांना परस्परसंवादपूर्ण आणि समाधानकारक सेवांचा अनुभव मिळणार आहे. इथे टच स्क्रीन सुविधा युक्त सेवा केंद्राची सोय, आणि त्यावर विविध प्रक्रिया कशा फार पाडायच्या याचे मार्गदर्शक व्हिडिओ पाहण्याची सुविधा वापरकर्त्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय ते या सुविधेचा वापर करून महत्त्वाच्या प्रकाशनांचा शोध घेऊ शकतील, तसेच माहितीपूर्ण प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सेवांविषयी समजू घेऊ शकतील. याशिवाय इथे एका मोठ्या डिस्प्ले स्क्रीनच्या माध्यमातून जागृतीपर आणि मार्गदर्शनपर शैक्षणिक आशयही सातत्यपूर्णतेने प्रदर्शित केला जात आहे.

या दालन भेटीचा सर्व वयोगटांतील अभ्यागतांना आनंददायी अनुभव यावा यासाठी, या दालनात लहान मुलांकरता खेळण्याची जागा, नाटिकांचे सादरीकरण, बोलक्या बाहुल्यांचा प्रयोग आणि सेल्फी बूथही उभारला आहे. या दालनाला भेट देणारे अभ्यागत समाज माध्यमावर सेल्फी अपलोड करण्याच्या उपक्रमांमध्येही सहभागी होऊ शकणार आहेत, तर लहान मुले चित्रकला स्पर्धेत भाग घेऊ शकतील. या सर्व उपक्रमांमधील सहभागींना भेटवस्तूही दिल्या जाणार आहेत. अशा सर्व सोयी सुविधांमुळे हे दालन माहितीपूर्ण तसेच मनोरंजक ठरले आहे.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2191060) Visitor Counter : 6