संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'माहे' नौकेच्या नक्षीदार बोधचिह्नाचे भारतीय नौदलाने केले अनावरण

प्रविष्टि तिथि: 17 NOV 2025 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 नोव्हेंबर 2025

 

'माहे' नौकेच्या नक्षीदार बोधचिह्नाचे भारतीय नौदलाने अनावरण केले आहे. ASW-SWC म्हणजे, उथळ पाण्यातील पाणबुडीविरोधी युद्धजलवाहनांच्या 'माहे' प्रवर्गापैकी ही पहिली नौका आहे. हा प्रवर्ग भारतात संरचित आणि भारतात निर्मित असा आहे. मुंबईत लवकरच 'माहे' या नौकेचे जलावतरण केले जाणार आहे. संरचनेपासून ते तैनात करेपर्यंतच्या या नौकेच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. नौदलासाठी नौकानिर्मिती करण्यात भारताच्या वाढत्या आत्मनिर्भरतेचे ते प्रतीक असून, या नौकेचा वारसा, संरचना आणि कार्यात्मक भूमिकेचे प्रतीकात्मक दर्शन त्यातून घडते.

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2190631

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील 'माहे' शहराच्या नावावरून या नौकेस हे नाव देण्यात आले आहे. भारताच्या बलिष्ठ सागरी परंपरांचे आणि किनारपट्टीवरील चैतन्यमय वातावरणाचे प्रतिबिंब या नौकेत दिसून येते.

स्थानिक प्रदेशाच्या सांस्कृतिक आणि स्वसंरक्षणविषयक युद्धनीतीच्या वारशाकडून सदर बोधचिह्नाने प्रेरणा घेतलेली दिसते. कलारिप्पयट्टू या क्रीडाप्रकाराशी संबंधित आणि केरळच्या स्वसंरक्षणविषयक युद्धनीतीच्या वारशाचे प्रतीक अशी लवलवती तलवार- उरुमी -समुद्रातून वर उसळून येत असल्याचे या बोधचिह्नात दाखवले गेले आहे. चापल्य, अचूकता, आणि प्राणघातक ठरेल असे कौशल्य या साऱ्यांचे प्रतीक असणारी उरुमी - या नौकेच्या चपळ कृती, आणि किनारी भागात निर्णायक हल्ला करण्याच्या क्षमतांचे प्रतिबिंब आहे. तर त्यातील लाटा हे दर्शवतात की- भारताला दीर्घ असा सागरकिनारा लाभला असून, भारतीय नौदल त्याच्या रक्षणास सदैव सज्ज आहे.

'सायलेंट हंटर्स'  हे या नौकेचे बोधवाक्य असून, त्यातून सावधपणा, दक्षता आणि अविचल निर्धार या गुणधर्मांचे मूर्तिमंत दर्शन घडते. पाणबुडी-विरोधी युद्धतंत्राचे गमक त्यामध्ये सामावलेले आहे.

भारताचे सांस्कृतिक संचित आणि तंत्रज्ञान सामर्थ्य यांचा संगमच या नक्षीदार बोधचिह्नातून दिसतो. स्वदेशी संरचना, नवोन्मेष आणि आत्मनिर्भरता यांप्रति भारतीय नौदलाच्या वचनबद्धतेकडे टाकलेले हे आणखी एक दमदार पाऊल होय.

 

* * *

शैलेश पाटील/जाई वैशंपायन/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2190842) आगंतुक पटल : 58
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Gujarati , Tamil , Telugu