उपराष्ट्रपती कार्यालय
हैदराबाद येथील रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांची उपस्थिती
Posted On:
17 NOV 2025 1:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2025
तेलंगणातील हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे आज झालेल्या रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण 2025 च्या उद्घाटन सोहळ्याला उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
रामोजी उत्कृष्टता पुरस्कार सात श्रेणींमध्ये वितरित करण्यात आले : ग्रामीण विकास - अमला अशोक रुया, युथ आयकॉन - श्रीकांत बोंल्ला, विज्ञान आणि तंत्रज्ञान - माधवी लता गली, मानवसेवा - आकाश टंडन, कला आणि संस्कृती - प्रा. सातपुती प्रसन्ना श्री, पत्रकारिता - जयदीप हर्डीकर, सामाजिक कार्य - पल्लवी घोष, रामोजी उत्कृष्टता पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहणे हे अतिशय सन्मानाचे आणि भाग्याचे असून रामोजी समूहाच्या स्थापना दिनानिमित्त आणि संस्थापक रामोजी राव यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा सोहळा संपन्न होत असल्याबद्दल अतिशय आनंद होत असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले.
रामोजी राव हे एक असे दूरदर्शी व्यक्तिमत्त्व होते त्यांनी आपल्या कल्पनांना संस्थांच्या निर्मितीच्या स्वरूपात साकार केले आणि आपल्या स्वप्नांना चिरंतन वास्तवात परिवर्तित केले. ते केवळ माध्यम आणि संवाद जगताचे शिल्पकार नव्हते तर माहिती, सृजनशीलता आणि उद्योजकता यांच्या सामर्थ्यावर दृढ निष्ठा असलेले राष्ट्रनिर्मातेही होते, असे उपराष्ट्रपती म्हणाले.
इनाडू पासून ते रामोजी सिटी पर्यंत, ई-टीव्ही पासून ई-टीव्ही नेटवर्क पर्यंत अनेकविध उपक्रम राबवून रामोजी राव यांच्या कार्याने भारतीय पत्रकारिता, मनोरंजन आणि उद्योगजगताचा कायापालट केला आहे. सत्य, नीतिमत्ता आणि उत्कृष्टतेप्रती असलेली त्यांची दृढ बांधिलकी देशातील येणाऱ्या कित्येक पिढ्यांना प्रेरणा देत राहील, असे त्यांनी सांगितले.
रामोजी उत्कृष्टता पुरस्कारांची सुरुवात म्हणजे उकृष्ट कार्य करून इतरांना प्रेरणा देणाऱ्या आणि समाजात एक सकारात्मक बदल घडवणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव करुन रामोजी राव यांच्या उल्लेखनीय वारशाला वाहिलेली एक योग्य आदरांजली आहे, असे ते म्हणाले.
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळख असलेल्या माध्यमांची भूमिका एक माहितीपूर्ण नागरिकत्व राखण्याची असून माहितीच्या भडिमाराच्या आणि चुकीच्या माहितीच्या सध्याच्या युगात सत्य, नैतिकता आणि जबाबदार पत्रकारितेला महत्त्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार 2047 पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या दिशेने देश आगेकूच करत असताना माध्यम क्षेत्रातील संस्थांनी राष्ट्र निर्मितीमध्ये भागीदारी करणे आवश्य आहे. त्यासाठी नवोन्मेष, स्टार्टअप्स, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण भागातील कायापालट यांसारख्या यशोगाथांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. सत्य, वस्तुनिष्ठता आणि निष्पक्षता यांवर माध्यम क्षेत्रातील संस्थांचा पाया उभारलेला असावा, असे त्यांनी सांगितले.
अंमलीपदार्थमुक्त भारत निर्माण करण्यात आणि विशेषतः कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्र झपाट्याने विकसित होत असताना नागरिकांना खऱ्या आणि खोट्या बातम्यांमधील फरक ओळखण्यात मदत करण्यात माध्यमांच्या जबाबदारीवर त्यांनी भर दिला.
रामोजी समूहाने या पुरस्कारांची सुरुवात केल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी त्यांचे कौतुक केले, यामुळे स्मृतींचे रूपांतर प्रेरणेत आणि वारशाचे रूपांतर उद्देशपूर्ण कृतीत होते, असे ते म्हणाले.
सर्व पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले. हे सर्वजण उत्कृष्टतेचे ध्वजवाहक आहेत, तसेच त्यांच्या कामगिरीमुळे अनेकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने केवळ उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सन्मान झाला नाही तर जेव्हा अत्यंत निष्ठेने आणि ध्येयाने प्रेरित होऊन उत्कृष्टतेचा पाठपुरावा केला जातो, तेव्हा राष्ट्र आणि मानवता या दोघांची सेवा होते. या कालातीत सत्याला पुन्हा उजाळा मिळाला, असे उपराष्ट्रपती आपल्या भाषणाचा समारोप करताना म्हणाले.
तेलंगणाचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, माजी उपराष्ट्रपती एम. वेंकैया नायडू, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू, केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी. किशन रेड्डी, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री किंजारापू राममोहन नायडू, माजी सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, रामोजी ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक च. किरण तसेच चित्रपट क्षेत्रातील नामवंत आणि इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
* * *
नितीन फुल्लुके/भक्ती सोनटक्के/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190754)
Visitor Counter : 11