सांस्कृतिक मंत्रालय
देशभक्तीची लाट शिगेला! ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या वर्षभर चालणाऱ्या उत्सवाची सुरुवात उत्साहात
1.25 कोटी भारतीयांनी आपल्या आवाजातले ‘वंदे मातरम्’केले ध्वनिमुद्रित
आतापर्यंत देशभरातील 36 राज्ये आणि 653 जिल्ह्यांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन
11,632 शाळा आणि 554 महाविद्यालयांमध्ये ‘वंदे मातरम्’ विषयक उपक्रमांचे आयोजन
Posted On:
14 NOV 2025 3:36PM by PIB Mumbai
‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षांच्या निमित्ताने राष्ट्रीय स्मरणोत्सव वर्षभर साजरा होत आहे. वंदे मातरम् हे केवळ एक गीत नाही, तर ते भारताचे सामूहिक चेतनास्थान आहे. स्वातंत्र्यलढ्यातील वीरांचे घोषवाक्य म्हणून त्याने लोकांना एकत्र आणले आणि स्वातंत्र्याच्या जाज्वल्य भावना जागृत केल्या.
‘वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त 1 ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने देशव्यापी उत्सवाला मंजुरी दिली. या उपक्रमाचा उद्देश विशेषतः युवा आणि विद्यार्थ्यांना या गीताच्या मूळ क्रांतिकारी भावनेशी जोडणे आणि त्या अमर संदेशाचा उत्सव साजरा करून तो पुढील पिढीच्या मनात दृढपणे रुजवणे हा आहे.
‘वंदे मातरम्’ हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचलेले असून ते त्यांच्या प्रसिद्ध कादंबरी आनंदमठमध्ये प्रथम प्रकाशित झाले. ही कादंबरी बंगाली साहित्यिक नियतकालिक बंगदर्शन मध्ये मालिका स्वरूपात प्रसिद्ध झाली होती. काळाच्या ओघात हे गीत भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक बनले. मातृभूमीचे दैवी स्वरूप आणि निसर्ग व राष्ट्र यांचे एकात्म दर्शन या गीताने पीढ्यान्पीढ्या भारतीयांना भावनिक आणि सांस्कृतिक एकतेच्या बंधनात जोडले.
वंदे मातरम्’ 150 वर्षांच्या स्मरणोत्सवाचा उद्घाटन सोहळा :
या उपक्रमाचा भव्य राष्ट्रीय उद्घाटन सोहळा नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. देशभरातील प्रमुख कलाकार, युवा प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रांतील व्यक्तींनी यात सहभाग घेतला. या प्रसंगी स्मृती नाणे आणि विशेष टपाल तिकीटाचे अनावरण करण्यात आले.
‘वंदे मातरम्’ कॉन्सर्ट – ‘नाद एकम रूपम अनेकम’
‘नाद एकम, रूपम अनेकम’ या सांस्कृतिक कार्यक्रमात देशभरातील गायक आणि संगीतकारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय गीताचे मंत्रमुग्ध करणारे सादरीकरण केले. या सादरीकरणातून भारताच्या विविधतेतील ऐक्याची भावना सुंदरतेने प्रकट झाली. संगीताच्या माध्यमातून अभिमान, एकता आणि देशभक्तीच्या भावना जागृत करणारा हा कार्यक्रम होता.

‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन :
कार्यक्रमात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली ‘वंदे मातरम्’च्या संपूर्ण गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्याचसोबत देशभरातील मुख्यमंत्री, राज्यपाल, विद्यार्थी, अधिकारी आणि नागरिकांनीही वंदे मातरम्’चे सामूहिक गायन केले. या सामूहिक आविष्काराने देशभक्तीचा उत्साह आणि मातृभूमीप्रती प्रेम यांचे अप्रतिम दर्शन घडवले. हे गीत जसे स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान होते, तसेच आजही ते राष्ट्रीय एकता, अभिमान आणि समर्पणाची ऊर्जा देत राहिले आहे.
‘वंदे मातरम्’ उपक्रम देशभरात:

या उपक्रमात देशभरात मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत 39,783 पेक्षा अधिक कार्यक्रम यासाठी समर्पित संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम 36 राज्ये आणि 653 जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आले. केंद्र सरकारच्या 52 मंत्रालयांनीही कार्यक्रम आयोजित करून सामूहिक गायन आणि संबंधित उपक्रमांत सहभाग नोंदविला आहे.





‘वंदे मातरम्’चे जागतिक पातळीवरील कार्यक्रम:
विविध देशांतील भारतीय दूतावास आणि दूतावासांच्या शाखा कार्यालयांमार्फत ‘वंदे मातरम्’च्या सामूहिक गायनाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांमध्ये भारतीय समुदाय तसेच स्थानिक नागरिकांचाही सक्रिय सहभाग आहे.

शाळा आणि महाविद्यालयांनी मोठ्या उत्साहाने या सामूहिक गायन उपक्रमात सहभाग घेतला आहे. आतापर्यंत देशभरातील 11,632 शाळा आणि 554 महाविद्यालयांनी ‘वंदे मातरम्’शी संबंधित कार्यक्रम आयोजित केले आहेत.

अनेक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी आणि शिक्षकांनी 7 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्लीमध्ये झालेला राष्ट्रीय कार्यक्रम थेट प्रक्षेपणाद्वारे पाहिला.

आजपर्यंत 1.25 कोटी भारतीयांनी आपल्या आवाजात ‘वंदे मातरम्’चे सादरीकरण ध्वनिमुद्रित करून या उत्सवात योगदान दिले आहे.

पूर्ण गीत ऐका आणि आपले सादरीकरण येथे अपलोड करा: https://www.vandemataram150.in/
***
सोनाली काकडे/राज दळेकर/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2190134)
Visitor Counter : 10