पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान 15 नोव्हेंबर रोजी सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देणार


मुंबई–अहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिकेच्या प्रगतीचा पंतप्रधान आढावा घेणार

​​​​​​​बुलेट ट्रेनमुळे मुंबई–अहमदाबाद प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तासांवर येणार

Posted On: 14 NOV 2025 11:43AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15  नोव्हेंबर रोजी गुजरातला भेट देणार आहेत. सकाळी 10 वाजता ते सुरतमधील बांधकामाधीन बुलेट ट्रेन स्थानकाला भेट देऊन मुंबईअहमदाबाद उच्चगती रेल्वे मार्गिका  या देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतील. हा प्रकल्प भारताच्या उच्च-गती रेल्वे युगात पदार्पणाचे प्रतीक मानला जातो. मुंबईअहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर सुमारे 508 किलोमीटर लांबीचा असून त्यापैकी 352  किलोमीटरचा भाग गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगरहवेलीमधून, तर 156  किलोमीटरचा भाग महाराष्ट्रात येतो. हा कॉरिडॉर साबरमती, अहमदाबाद, आनंद, वडोदरा, भरूच, सुरत, बिलीमोरा, वापी, बोईसर, विरार, ठाणे आणि मुंबई अशी महत्त्वाची शहरे जोडणार आहे. हा प्रकल्प भारताच्या वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवणारा ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाचा वापर करून उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पातील तब्बल 465 किलोमीटर (सुमारे 85 टक्के मार्ग) उड्डाणपुलांवर असणार आहे, ज्यामुळे जमिनीचा कमी वापर आणि अधिक सुरक्षितता सुनिश्चित होते. आतापर्यंत 326 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलांचे  काम पूर्ण झाले असून 25 पैकी 17 नदीवरील पूल बांधले गेले आहेत.

 हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि अहमदाबादमधील प्रवासाचा कालावधी सुमारे दोन तासांवर येईल. यातून शहरांमधील प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि आरामदायी ठरेल. या बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे व्यवसाय, पर्यटन आणि आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल तसेच संपूर्ण कॉरिडॉर परिसराचा विकास होईल.

सुरतबिलीमोरा विभाग सुमारे 47 किलोमीटर लांबीचा असून हा विभाग कामाच्या अंतिम  टप्प्यात आहे. येथील नागरी बांधकाम आणि ट्रॅक-बेड घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. सुरत स्थानकाचे डिझाइन शहराच्या जगप्रसिद्ध हिरे उद्योगापासून प्रेरित आहे, ज्यामध्ये सौंदर्य आणि कार्यक्षमतेचा संगम दिसून येतो. प्रवाशांच्या सोयीसाठी प्रशस्त प्रतीक्षालये, स्वच्छतागृहे आणि किरकोळ विक्री केंद्रे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच या स्थानकाला सुरत मेट्रो, शहर बस सेवा आणि भारतीय रेल्वे नेटवर्कशी सुसंगत बहु-आयामी जोडणी दिली जाणार आहे.

***

सुषमा काणे/राज दळेकर/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189981) Visitor Counter : 10