आयुष मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

जागतिक मधुमेह दिना निमित्ताने बंगळूरू इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या वतीने उद्या मधुमेहाच्या सर्वांगीण व्यवस्थापनाशी संबंधित कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 13 NOV 2025 4:57PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 नोव्हेंबर 2025

 

जागतिक मधुमेह दिन 2025 च्या निमित्ताने बंगळूरू इथल्या केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या वतीने, उद्या दि. 14 नोव्हेंबर 2025 रोजी मधुमेह विमर्श हा विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. बंगळूरू इथली केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्था, म्हणजे, केंद्रीय आयुष मंत्रालयाचे मधुमेहावरील मान्यताप्राप्त उत्कृष्टता केंद्र आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मधुमेहावरील संशोधन आणि वैद्यकीय उपचार विषयक सेवांसाठीच्या उत्कृष्टता केंद्राद्वारे, सुरू असलेले संशोधन, वैद्यकीय उपचारासंबंधीचे प्रयत्न आणि प्राचर प्रसाराशी संबंधित उपक्रम सर्वांसमोर मांडले जाणार आहेत.

या केंद्राच्या वतीने आयुर्वेद, योग आणि जीवनशैलीतील बदलांच्या माध्यमातून मधुमेहाला प्रतिबंध आणि त्याचे व्यवस्थापन करण्यासंबंधी एकात्मिक दृष्टिकोन विकसित करून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. आतापर्यंत सुमारे 6,000 रुग्णांनी या संस्थेच्या वतीने पुरवल्या जाणाऱ्या सेवांचा लाभ घेतला आहे, त्यापैकी 25% पेक्षा जास्त रुग्ण आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत.

या केंद्राच्या वतीने वैद्यकीय उपचारविषयक सेवा सुविधांच्या पलीकडे जात, आरोग्यविषयक डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून याबाबतचा प्रचार प्रसारालाही बळकटी दिली गेली आहे. यादृष्टीने ई- वैद्यकीय नोंदी, टेलीकन्सल्टेशन्स (दूरध्वनीद्वारे सल्लामसलत), मोबाईल संदेशांच्या माध्यमातून सूचना आणि केंद्राचे संकेतस्थळ (www.cari.gov.in) तसेच विविध समाजमाध्यमांवर उपयुक्त माहिती उपलब्ध करून दिली गेली असून, याचा सुमारे 6 लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाभ घेतला आहे.

या केंद्राने मधुमेह विषयक जोखिमांचे मूल्यमापन करण्यासाठी यंत्र शिक्षणावर  आधारित अंदाज व्यक्त करणारी व्यवस्थाही विकसित केली आहे. या व्यवस्थेला कॉपीराइट संरक्षण देखील मिळालेले आहे. सध्या एका वेब ॲप्लिकेशनच्या माध्यमातून या व्यवस्थेच्या प्रमाणिकरणाची प्रक्रिया सुरू आहे. यानंतर लोकांना त्यांच्या आरोग्याची अधिक प्रभावीपणे देखरेख ठेवता यावी यासाठी ते लवकरच मोबाईल ॲपच्या स्वरुपात उपलब्ध करून दिले जाणार आहे.

या कार्यक्रमाविषयी बंगळुरुतील केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेचे प्रभारी डॉ. सुलोचना भट यांनी अधिक माहिती दिली. संस्थेने मधुमेहावर परिपूर्ण आणि पुरावा आधारित पद्धतीने उपचार करण्यासाठी पारंपरिक ज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनाचा मिलाफ घडवून आणण्यावर भर दिला असल्याचे त्यांनी सांगितले. या केंद्राच्या वतीने राबवल्या जात असलेल्या उपक्रमांतून, एकात्मिक आरोग्यसेवेच्या माध्यमातून, आजाराला प्रतिबंध आणि आजाराचा धोका असलेल्यांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारण्यात  कशा रितीने मदत होऊ शकते हे दिसून येते असे त्यांनी यावेळी सांगितले.

म्हैसूर मधील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या अखत्यारितील केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था आणि बंगळूरू मधील भारतीय विज्ञान संस्थेच्या सहकार्यपूर्ण भागीदारी अंतर्गत निवडक खाद्य उत्पादने आणि आयुर्वेदिक सुसूत्रिकरण घडवून आणण्यावर अभ्यास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. मधुमेहाच्या प्रतिबंधासाठी आणि व्यवस्थापनासाठी एक एकात्मिक आराखडाही विकसित केला असून, सध्या तो प्रकाशनाच्या प्रक्रियेत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकृती आणि मधुमेहजन्य परिधीय न्यूरोपॅथी यावरील अभ्यासही प्रकाशनाच्या प्रक्रियेत असल्याची माहिती त्यांनी दिली.

उद्या होणार असलेल्या कार्यक्रमात रामय्या इंडिक स्पेशालिटी आयुर्वेद रिस्टोरेशन या रुग्णालयाचे माजी संचालक प्राध्यापक डॉ. जी.जी. गंगाधरन यांचे मधुमेहाचे सर्वंकष व्यवस्थापन (Holistic Management of Madhumeha) या विषयावर व्याख्यान होणार आहे, यासोबतच इतर अनेक मान्यवरांचीही व्याख्याने होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आयुष मंत्रालय मधुमेह सारख्या जीवनशैलीशी संबंधित आजारांचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने शाश्वत, सर्वसमावेशक आणि पुरावा आधारित धोरणांची निर्मिती करण्याचे काम करत आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्याकरता मंत्रालयाच्या वतीने  संशोधन आणि वैद्यकीय उपचार विषयक उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन दिले जाईल असेही त्यांनी सांगितले.

 

* * *

शैलेश पाटील/तुषार पवार/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2189701) Visitor Counter : 5