लोकसभा सचिवालय
azadi ka amrit mahotsav

राजकीय पक्षांनी संसदीय संस्थांचे पावित्र्य जपावे आणि या संस्थांचे कामकाज सुरळीतपणे चालेल याची सुनिश्चिती करावी - लोकसभा अध्यक्षांचे राजकीय पक्षांना आवाहन


हेतुपुरस्सर अडथळ्यामुळे लोकशाही कमकुवत होते - लोकसभा अध्यक्ष

Posted On: 10 NOV 2025 7:37PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025

नागालँडच्या कोहिमा येथील  विधानसभेत आज राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या, भारत क्षेत्र, विभाग–III ची वार्षिक परिषद झाली. या परिषदेच्या निमित्ताने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी माध्यम जगताच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सर्व राजकीय पक्षांनी संसदीय संस्थांचे कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित चालवत, या व्यवस्थेचे पावित्र्य जपावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले. शांततेने, मुद्देसूद आणि माहितीपूर्ण चर्चांच्या माध्यमातून आपले मुद्दे मांडता यावेत, समस्या मांडता यावी यासाठी तसेच सुदृढ वादविवाद करण्यासाठी लोकशाही व्यवस्था पुरेशी संधी प्रदान करते असेही त्यांनी सांगितले. हेतुपुरस्सर अडथळे निर्माण केल्याने लोकशाही व्यवस्था कमकुवत होते, त्यासोबतच नागरिकांनाही अर्थपूर्ण चर्चा आणि उत्तरदायित्वापासून वंचित राहावे लागते असे त्यांनी सांगितले. पुढच्या महिन्यात 1 डिसेंबर 2025 पासून संसदेचे हिवाळी अधिवेशनन सुरु होणार आहे, या अधिवेशनाच्या काळात सर्व राजकीय पक्षांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्याची सुनिश्चिती करावी असे आवाहनही त्यांनी केले. पारदर्शक शासन आणि लोककल्याण केंद्रीत धोरण निर्मितीत संसदीय संस्थांनी अधिक सक्रिय आणि विधायक भूमिका बजावली पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या संवादाआधी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राष्ट्रकुल संसदीय संघटनेच्या, भारत क्षेत्र, विभाग–III ची वार्षिक परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधितही केले. संसदीय संस्थांनी जनमताचे धोरणात रूपांतर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. केवळ कायदा करण्यापुरतीच या संस्थांची जबाबदारी मर्यादित नाही, लोकांच्या आकांक्षा आणि समस्यांवर कृतीयोग्य धोरणांची आखणी करणे ही देखील या संस्थांचीच जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. सक्रिय सार्वजनिक सहभागातूनच सर्वसमावेशक विकास शक्य आहे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. जेव्हा नागरिक लोकशाही प्रक्रियेत थेट सहभाग घेतात, तेव्हाच खरी प्रगती होते, असे त्यांनी नमूद केले. यामुळेच धोरण निर्मिती नागरिकांच्या मतांचे अर्थपूर्ण प्रतिबिंब  उमटले आहे की नाही हे लोकप्रतिनिधींनी सुनिश्चित केले पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.

 
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2188512) Visitor Counter : 12