युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत पीढीसाठीच्या दृष्टिकोनामुळे विकसित भारत युवा नेते संवाद 2026मध्ये विक्रमी सहभाग


संपूर्ण देशातील 50 लाखांहून अधिक तरुणांनी व्हीबीवायएलडी 2026 प्रश्नमंजुषेत घेतला सहभाग

प्रविष्टि तिथि: 10 NOV 2025 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025

भारतातील तरुणांना राष्ट्र उभारणीत सक्रिय योगदान देण्यासाठी प्रेरित करण्याच्या उद्देशाने युवक व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या ‘विकसित भारत युवा नेते संवाद’ (व्हीबीवायएलडी), या  प्रमुख उपक्रमाला, त्यांच्या स्वायत्त संस्था ‘मेरा युवा भारत’ (माय भारत) च्या माध्यमातून देशभरात उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला 2026 आवृत्तीचा यशस्वी प्रारंभ झाला असून, पहिल्या टप्प्यात देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.  

1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान MY Bharat आणि MyGov या व्यासपीठांवर संयुक्तपणे आयोजित करण्यात आलेल्या ‘विकसित भारत युवा नेते संवाद 2026’ - प्रश्नमंजुषा कार्यक्रमात 50.42 लाखांहून अधिक तरुणांनी सहभाग घेतला. यावर्षीच्या सहभागी तरुणांच्या संख्येने मागील आवृत्तीच्या 30 लाख सहभागींच्या विक्रमाला मोडीत काढले. देशातील सर्व 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमधील तरुणांनी या उपक्रमात सहभाग घेतला, यामुळे विकसित भारत@2047 च्या दृष्टिकोनासाठी युवकांचा उत्साह पुन्हा अधोरेखित झाला.

या उपक्रमात तरुण पुरुष आणि महिलांचा जवळजवळ समान सहभाग दिसून आला, ज्यामध्ये 51% पुरुष आणि 49% महिला सहभागी झाल्या. सर्वाधिक सहभागात तामिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा आणि पश्चिम बंगाल ही पाच राज्ये आघाडीवर होती. हा अभूतपूर्व सहभाग भारतातील तरुण पिढीच्या प्रशासन, धोरण रचना आणि विकसित भारत बनण्याच्या दिशेने भारताच्या विकासात्मक प्रवासात अर्थपूर्ण योगदान देण्याची वाढती आकांक्षा प्रतिबिंबित करतो.

निवडण्यात आलेल्या सुमारे 2.56 लाख तरुणांना, आता विकसित भारत युवा नेते संवाद 2026 च्या  दुसऱ्या टप्प्यात,  विकसित भारताचे स्वप्न साकार करणाऱ्या दहा प्रमुख राष्ट्रीय विषयांवर निबंध लेखनाद्वारे त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित केले जाईल:

1. विकसित भारतासाठी लोकशाही आणि सरकारमधील तरुणांची भूमिका 

2. महिलांच्या नेतृत्वाखालील विकास: विकसित भारताची गुरुकिल्ली

3. फिट भारत, हिट भारत

4. भारताला जगाची स्टार्ट-अप राजधानी बनवणे

5. भारताची सॉफ्ट-पॉवर: विकसित भारतासाठी सांस्कृतिक कूटनीति आणि जागतिक प्रभाव

6. परंपरेसह नवोन्मेष: आधुनिक भारताची निर्मिती

7. आत्मनिर्भर भारत: मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड

8. स्मार्ट आणि शाश्वत शेतीद्वारे उत्पादकता वाढवणे

9. शाश्वत आणि हरित विकसित भारताची निर्मिती

10. विकसित भारतासाठी भविष्यासाठी सज्ज कार्यबलाची निर्मिती

निबंध 22 भारतीय भाषांपैकी कोणत्याही भाषेत लिहिता येतील आणि ते निबंध 20 नोव्हेंबरपर्यंत 2025 स्वीकारले जातील. निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यांकन होईल याची खात्री करण्यासाठी, सर्व राज्यांमध्ये मूल्यांकन केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. येथे सादर केलेल्या निबंधांचे परीक्षण करून सर्वोत्तम तरुणांना राज्यस्तरीय फेरीसाठी निवडले जाईल, जिथे ते सादरीकरणाद्वारे विकसित भारतासाठी त्यांचे दृष्टिकोन सामायिक करतील.

या फेरींचे निकाल केवळ भारतातील युवा विचारांच्या विविधतेवर प्रकाश टाकणार नाहीत तर 2023 मध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांनी राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1 लाख तरुणांना सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी केलेले आवाहन देखील पुढे नेतील. विकसित भारत युवा नेते संवाद आज तरुण परिवर्तनकाऱ्यांची देशव्यापी चळवळ बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘जन भागीदारी’ आणि ‘युवा शक्ती’च्या दृष्टिकोनावर आधारित, हा गतिशील मंच भारतातील तरुणांना प्रशासनात सहभागी होण्यासाठी, नवोन्मेषी कल्पना सामायिक करण्यासाठी आणि देशाच्या विकासात्मक प्रवासात अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी एक गतिमान व्यासपीठ म्हणून काम करत आहे.


निलीमा चितळे/श्रद्धा मुखेडकर/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 2188450) आगंतुक पटल : 36
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Telugu , Kannada