संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते अत्याधुनिक संरक्षण क्षेत्रासंबंधीच्या सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रम भवनाचे उद्घाटन,संरक्षण क्षेत्रासंबंधीच्या सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रमांच्या कामगिरीचाही घेतला आढावा
Posted On:
10 NOV 2025 5:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 10 नोव्हेंबर 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. 10 नोव्हेंबर 2025 रोजी संरक्षण क्षेत्रासंबंधीच्या सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रमांसंबंधी(डीपीएसयू) सर्वंकष आढावा बैठक झाली. नवी दिल्लीतील नौरोजी नगर, वर्ल्ड ट्रेड सेंटर मधील नव्यानेच उद्घाटन झालेल्या संरक्षण क्षेत्रासंबंधीच्या सार्वजनिक क्षेत्रीय उपक्रम भवनात ही बैठक पार पडली. या बैठकी दरम्यान मीनीरत्न (श्रेणी-1) दर्जा मिळवलेल्या म्युनिशन इंडिया लिमिटेड, आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड, इंडिया ऑप्टेल लिमिटेड आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील चार उपक्रमांचा गौरवही केला गेला.

यावेळी राजनाथ सिंह यांनी उपस्थितांना संबोधितही केले. यावेळी राजनाथ सिंह यांनी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांनी भारताच्या संरक्षण उत्पादनविषयक परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी आणि आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाला गती देण्यासाठी दिलेल्या सातत्यपूर्ण योगदानासाठी त्यांचे कौतुक केले. सर्व 16 डीपीएसयू देशाच्या आत्मनिर्भरतेचे मजबूत आधारस्तंभ म्हणून सेवा देत असल्याचे त्यांनी नमूद केले. ऑपरेशन सिंदूरसारख्या मोहिमेतील या उपक्रमांनी नोंदवलेल्या उत्कृष्ट कामगिरीतून, देशातील स्वदेशी व्यासपीठांची विश्वासार्हता आणि क्षमता सिद्ध झाली असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या सर्व संस्थांनी दाखवलेल्या सातत्यपूर्ण समर्पण भावनेसाठी तसेच त्यांच्या उत्कृष्टतेसाठी राजनाथ सिंह यांनी त्यांचे अभिनंदनही केले.
राजनाथ सिंह यांनी हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड, आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड, इंडिया ऑप्टेल लिमिटेड आणि म्युनिशन इंडिया लिमिटेड या उपक्रमांना मिनिरत्न दर्जा मिळाल्याबद्दल या चारही उपक्रमांची प्रशंसा केली, हे यश म्हणजे या उपक्रमांची वाढती कार्यक्षमता, स्वायत्तता आणि संरक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदानाचे याचे प्रतिबिंब असल्याचे ते म्हणाले.

या क्षेत्राने आजवर नोंदवलेल्या उल्लेखनीय कामगिरीचीही राजनाथ सिंह यांनी आपल्या संबंधनातून दखल घेतली. 2024-25 या वर्षांत भारताने 1.51 लाख कोटी रुपयांचे संरक्षण उत्पादन साध्य केले आहे, यात डीपीएसयूचा एकूण वाटा 71.6% इतका होता असे त्यांनी सांगितले. त्याचवेळी देशाची संरक्षण निर्यात 6,695 कोटी रुपयांवर पोहोचली असून, यातून भारताच्या स्वदेशी व्यवस्थावरचा जागतिक विश्वास दिसून येतो, या सर्व बाबी म्हणजे, मेड इन इंडिया संरक्षण उत्पादनांना जागतिक स्तरावर आदर-सन्मान मिळत असल्याचेच द्योतक आहे असे त्यांनी सांगितलं.

हा वेग कायम ठेवण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीनेच सर्व डीपीएसयूंनी अत्यावश्यक तंत्रज्ञानाचे जलदगतीने स्वदेशीकरण करावे, सर्वंकश संशोधन आणि विकासावर भर द्यावा, उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवून आणावी, निर्धारीत लक्ष्य निर्धारीत वेळेत पूर्ण करावीत आणि निर्यातीत वाढ घडवून आणण्यासाठी धोरणात्मक दृष्टिकोनाचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले. या पुढच्या आढावा बैठकीत सर्व डीपीएसयूंनी स्वदेशीकरणाच्या स्वरुपाला निश्चित आयाम द्यावा, आणि त्याअनुषंगाने मापनयोग्य ध्येय उद्दिष्टांची निश्चिती असलेला मार्गदर्शक आराखडा तयार करावा असे निर्देशही त्यांनी दिले. याकामी जिथे जिथे विशेष स्वरुपातील कार्यवाहीची वा मदतीची गरज असेल तिथे तिथे सरकार ते पुरवेल असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संशोधन आणि विकास विषयक अनेक उपक्रमांचाही प्रारंभ केला गेला.
यावेळी राजनाथ सिंह यांनी स्वयं अर्थात शाश्वत आणि हरित संरक्षण उत्पादन (SWAYAM - Sustainable and Green Defence Manufacturing) या एका सर्वसमावेशक संग्रहाचे प्रकाशनही केले. या प्रकाशनातून डीपीएसयूमधील हरित संक्रमणाची वाटचाल दर्शवली गेली असून, ते शाश्वत संरक्षण उत्पादनाच्या दिशेचे एक महत्त्वाचे पाऊलही ठरले आहे.

इंडिया ऑप्टेल लिमिटेड आणि हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने 100% हरित ऊर्जा वापराचे ध्येय साध्य केल्याबद्दल, या दोन्ही संस्थांचा संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरवही केला गेला. इंडिया ऑप्टेल लिमिटेडने सप्टेंबर 2025 पासूनच पूर्णतः नवीकरणीय ऊर्जा वापराच्या दिशेने संक्रमण केले आहे. यामुळे 2025-26 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कार्बन उत्सर्जनात 8,669 टन इतकी घट झाली असून, 26 लाख 36 लाख रुपयांची बचतही झाली आहे.

निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2188415)
Visitor Counter : 10