वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल न्यूझीलंड दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी रोटोरुआ येथे उच्च-स्तरीय बैठकांमध्ये सहभागी
Posted On:
06 NOV 2025 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 नोव्हेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी न्यूझीलंडच्या त्यांच्या अधिकृत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी, भारत आणि न्यूझीलंड दरम्यान व्यापार, गुंतवणूक, संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने अनेक उच्च-स्तरीय बैठका घेतल्या.
त्यापूर्वी दिवसाच्या सुरुवातीला, रोटोरुआच्या मार्गावर असताना, मंत्र्यांनी एयर न्यूझीलंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल रविशंकर यांची भेट घेतली. प्रादेशिक आणि जागतिक संपर्क वाढविण्यात एअरलाइनच्या भूमिकेवर या बैठकीत चर्चा झाली. गोयल यांनी भारताच्या वेगाने विस्तारणाऱ्या विमान वाहतूक क्षेत्राच्या वाटचालीची माहिती दिली आणि हवाई सेवा तसेच पर्यटन क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी असलेल्या महत्त्वपूर्ण संधींवर भर दिला.
रोटोरुआ येथे आगमन झाल्यावर, रोटोरुआच्या महापौर तानिया टॅपसेल यांनी गोयल यांचे स्वागत केले. अतिशय जिव्हाळ्याने केलेल्या स्वागताबद्दल गोयल यांनी महापौरांचे आभार मानले आणि शहराचे अद्वितीय नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांचे कौतुक केले. द्विपक्षीय संवाद वाढविल्याने व्यापार आणि पर्यटन संबंधांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माओरी संस्कृती आणि कलांचे राष्ट्रीय केंद्र 'टे पुईआ' येथे, न्यूझीलंडचे व्यापार मंत्री टॉड मॅक्ले यांच्या उपस्थितीत गोयल यांचे पारंपरिक माओरी पद्धतीने स्वागत करण्यात आले. या समारंभात पारंपारिक मंत्रोच्चार आणि होंगी अभिवादन समाविष्ट होते, जे दोन्ही राष्ट्रांमधील जिव्हाळ्याचे संबंध आणि परस्पर आदराचे प्रतीक होते. गोयल यांनी माओरी समुदायाच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरांचे कौतुक केले आणि माओरी मूल्यांमध्ये आणि भारताच्या नागरी संस्कृतीच्या नीतीमूल्यांमध्ये असलेल्या समानतेकडे लक्ष वेधले, विशेषतः निसर्ग आणि समुदायासाठी असलेल्या त्यांच्या सामायिक आदरभावाचा यावेळी त्यांनी उल्लेख केला.
त्यानंतर, गोयल आणि टॉड मॅक्ले यांनी भारत-न्यूझीलंड मुख्य कार्यकारी अधिकारी गोलमेज बैठकीचे सह-अध्यक्षपद भूषवले, ज्यात दोन्ही देशांतील प्रमुख व्यावसायिक प्रतिनिधी एकत्र आले होते. उपस्थितांना संबोधित करताना गोयल यांनी भारताच्या वेगाने बदलणाऱ्या आर्थिक परीदृष्याची माहिती दिली आणि तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण, स्वच्छ ऊर्जा, पर्यटन आणि शाश्वतता या क्षेत्रांमध्ये असलेल्या सहकार्याच्या प्रचंड शक्यतांवर भर दिला. त्यांनी भारतीय वंशाच्या व्यावसायिक नेत्यांच्या मोठ्या सहभागाचे स्वागत केले आणि न्यूझीलंडच्या उद्योगांना परस्पर वाढीसाठी भारतासोबत अधिक सखोल भागीदारी शोधण्यास प्रोत्साहित केले.
मंत्री मॅक्ले यांनी त्यांचे रोटोरुआ या मूळ शहरात केलेल्या आदरातिथ्याबद्दल गोयल यांनी आभार व्यक्त केले आणि दोन्ही पक्ष अधिक मैत्री, समृद्धी आणि सामायिक प्रगतीच्या दिशेने भारत-न्यूझीलंड संबंध पुढे नेण्यास कटिबद्ध आहेत याची हमी दिली.
* * *
निलिमा चितळे/शैलेश पाटील/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2187145)
Visitor Counter : 3