कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान 7 नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगरला देणार भेट


छत्रपती संभाजीनगरमधील कृषी आणि ग्रामविकास योजनांची शिवराज सिंह करणार पाहणी, शेतकऱ्यांशी साधणार संवाद

केंद्रीय मंत्री कृषी आणि ग्रामविकास योजनांचा घेणार आढावा, शेतकऱ्यांच्या घेणार भेटी, पूरबाधित भागांना देणार भेट

Posted On: 06 NOV 2025 6:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 नोव्हेंबर 2025

 

केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान 7 नोव्हेंबर 2025 रोजी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्यालगतच्या ग्रामीण भागाच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात केंद्रीय मंत्री कृषी आणि ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील, स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि पूरबाधित क्षेत्रांच्या परिस्थितीचे मूल्यमापन करतील.

केंद्रीय मंत्री चौहान सकाळी लवकर दिल्लीहून निघून विमानाने छत्रपती संभाजीनगरला येणार आहेत. तेथून ते, हेलिकॉप्टरने सिरसाळा येथे जाऊन कृषीकुल संस्थेत रुद्राभिषेक आणि ध्वजारोहण करणार आहेत. कृषी क्षेत्रातील सध्याच्या उपक्रमांच्या प्रगतीविषयी केंद्रीय मंत्री GVT पथकाबरोबर सविस्तर चर्चा करणार असून, शेतकऱ्यांशीही संवाद साधणार आहेत. ते संस्थेच्या विविध सुविधांची पाहणी करणार आहेत. तसेच कल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी व शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अडचणी समजून घेण्यासाठी ते खुल्या चर्चेतही सहभागी होणार आहेत.

दुपारी ते, पूरबाधित पुलाची पाहणी करण्यासाठी आणि भोवतालच्या पायाभूत सुविधांचा अदमास घेण्यासाठी अरणपूर गावाला भेट देणार आहेत. नुकत्याच झालेल्या पुरामुळे ओढवलेले पीक-नुकसान आणि अन्य हानी याचे मूल्यमापन करण्यासाठी ते तपोवन गावाला भेट देणार आहेत. तसेच, लाभार्थी कुटुंबांशी आणि ग्रामस्थांशी संवाद साधण्यासाठी ते, घरकुल गृहनिर्माण प्रकल्पाला भेट देणार आहेत.

त्यानंतर केंद्रीय मंत्रिमहोदय, हेमाडपंती महादेव मंदिराला भेट देऊन पूजा करणार आहेत आणि जवळपासच्या भागात झालेल्या जमिनीच्या धुपेचे निरीक्षण करणार आहेत. तसेच खाणगाव-तपोवन पूल आणि जवळच्या विंधणविहिरी यांच्या नुकसानाचीही ते पाहणी करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी उशिरा केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून दिल्लीसाठी मार्गस्थ होतील.

केंद्रीय कृषी आणि ग्रामविकास मंत्री देशातील शेतकरी आणि ग्रामस्थांशी थेट संवाद साधण्यासाठी सध्या राज्यपातळीवर जे दौरे करत आहेत, त्या मालिकेचाच भाग म्हणून हा दौरा आखण्यात आला आहे. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रातील वास्तव समजून त्याचे मूल्यमापन करणे, केंद्रीय योजनांच्या प्रगतीचा आढावा घेणे, आणि आपद्ग्रस्त भागांमध्ये मदत आणि पुनर्वसन कार्याला गती देणे या उद्देशांनी ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्यालगतच्या ग्रामीण भागाला भेट देत आहेत.

 

* * *

सुषमा काणे/जाई वैशंपायन/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2187077) Visitor Counter : 10