वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल न्यूझीलंड दौऱ्यावर
भारत-न्यूझीलंड व्यवसाय मंच: सहकार्याच्या नवीन मार्गांचा शोध
Posted On:
05 NOV 2025 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, दोन देशांमधील द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापार संबंध मजबूत करण्यासाठी न्यूझीलंडच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार (एफटीए) साठीच्या वाटाघाटींची चौथी फेरी (3-7 नोव्हेंबर 2025) न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे सुरू आहे.
ऑकलंड येथील उद्योग संघाने आयोजित केलेल्या भारत-न्यूझीलंड व्यवसाय मंचात गोयल यांनी भाग घेतला.
सत्राची सुरुवात करताना,गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीचा उल्लेख केला. या बैठकीमुळे द्विपक्षीय संबंधांना नवचैतन्य मिळाले असून विविध क्षेत्रांतील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी एक दिशा निश्चित झाली आहे.
दोन्ही राष्ट्रांनी आर्थिक भागीदारी वृद्धिंगत करण्यासाठी सहकार्याचे नाविन्यपूर्ण मार्ग शोधण्याचे आवाहन गोयल यांनी केले. सागरी वाहतूक, वनक्षेत्र, क्रीडा, शिक्षण, तंत्रज्ञान आणि पर्यटन अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये भागीदारीची अफाट क्षमता असल्याचे गोयल यांनी अधोरेखित केले.
संतुलित फलनिष्पत्ती साध्य करण्याच्या दृष्टीने परस्पर आदर आणि सामायिक वचनबद्धतेनुसार दोन्ही देशांमध्ये संवाद सुरु असल्याचे सध्या सुरु असलेल्या भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार वाटाघाटींबद्दल बोलताना त्यांनी सांगितले. भारताच्या भव्य आणि झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठेतील प्रवेश मिळाल्यानंतर न्यूझीलंडला नक्कीच फायदा होईल, तर परस्परांना लाभदायक सहकार्य निर्माण करण्यासाठी भारत न्यूझीलंडच्या तांत्रिक कौशल्याचा आणि विशिष्ट क्षमतांचा फायदा घेऊ शकतो, यावर त्यांनी भर दिला.
न्यूझीलंडच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यात आणि दोन्ही देशांच्या नागरिकांमधील संबंध वृद्धिंगत करण्यात न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाने दिलेल्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
ऑकलंड येथील महात्मा गांधी सेंटरमध्ये आयोजित समुदाय कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांचे कार्यक्रमात उपस्थित राहून भारत–न्यूझीलंड भागीदारीच्या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले.
आपल्या भाषणात पीयूष गोयल यांनी भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि मूल्यांची चर्चा केली आणि दोन्ही देशांमधील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने “सक्सेसफुल कीवी–भारत स्टोरीज” निर्माण करण्याबाबत आशावाद व्यक्त केला. त्यांनी न्यूझीलंडमधील भारतीय वंशीय समुदायाच्या कष्टाळू आणि सक्रिय भूमिकेचे कौतुक केले आणि सांगितले की सांस्कृतिक बंध, समान मूल्ये आणि एकसमान आकांक्षा या दोन्ही देशांना अधिक जवळ आणत आहेत, ज्यामुळे भविष्याभिमुख आणि मजबूत भागीदारीसाठी मार्ग प्रशस्त होत आहे.
पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांनी भारताच्या जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयाला येण्याबाबत न्यूझीलंडचा दृढ पाठिंबा व्यक्त करत सांगितलं की, “भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहे.”
पंतप्रधानांनी पुढे सांगितले की भारत–न्यूझीलंड संबंध परस्पर आदर, न्याय आणि समृद्धीच्या सामायिक दृष्टिकोनावर आधारित आहेत. त्यांनी भारतीय वंशीय समुदायाचे वर्णन “दोन राष्ट्रांना जोडणारा सेतू ” म्हणून केले, जे दोन्ही देशांतील नातेसंबंधांना अधिक बळकटी देतात.
यानंतर पीयूष गोयल यांनी “टी विथ इंडियन बिझनेस डेलिगेशन” या शीर्षकाखाली भारतीय व्यावसायिक प्रतिनिधींसोबत संवाद साधला. या चर्चांमध्ये दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांमधील सहकार्याच्या वाढत्या संधींवर विशेषतः कृषी आणि अन्न प्रक्रिया, लाकूड व वनीकरण, तंत्रज्ञान आणि नवकल्पना या क्षेत्रांमध्ये भर देण्यात आला. व्यावसायिक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या प्रगत आणि दूरदर्शी धोरणांचे कौतुक केले.
सुषमा काणे/भक्ती सोनटक्के/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186773)
Visitor Counter : 4