इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'इंडियाएआय' मिशन अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षित, सर्वसमावेशक आणि जबाबदार वापर सुनिश्चित करण्यासाठी भारताच्या एआय वापरपद्धतीविषयक मार्गदर्शक तत्व केली जारी


प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय कुमार सूद यांनी 'कोणाचीही हानी करू नका' हे भारताच्या एआय संरचनेचे मुख्य तत्त्व म्हणून अधोरेखित केले;तसेच लवचिक, जुळवून घेणाऱ्या परिसंस्थेमध्ये 'इनोव्हेशन सँडबॉक्स' आणि जोखीम कमी करण्यावर दिला भर

भारताची एआय वापरपद्धती संरचना मानवकेंद्रित विकास, जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संभाव्य हानी टाळण्यावर लक्ष केंद्रित करेल- एस. कृष्णन, सचिव, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान

Posted On: 05 NOV 2025 6:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2025

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने (मेईटी) 'इंडियाएआय'मिशन अंतर्गत आज भारताच्या एआय  वापरपद्धतीविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे प्रकाशन केले. हा एक सर्वसमावेशक आराखडा असून तो कृत्रिम बुद्धिमत्तेचा  सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षित, सर्वसमावेशक आणि जबाबदार वापर सुनिश्चित करेल.

भारताचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा.अजय कुमार सूद यांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे औपचारिक प्रकाशन केले.

भारत जबाबदार एआय वापरपद्धतींमध्ये आपले नेतृत्व बळकट करत असल्याच्या पार्श्वभूमीवर, या प्रकाशनामुळे इंडिया–एआय इम्पॅक्ट शिखर परिषद 2026 पूर्वी एक महत्त्वाचा टप्पा  गाठला गेला आहे.

अत्याधुनिक नवोन्मेष वाढवण्यासाठी आणि व्यक्ती आणि  समाजाची कोणतीही हानी होऊ न देता, सर्वांसाठी एआयचा सुरक्षितपणे विकास आणि वापर करण्यासाठी एक भक्कम वापरपद्धतीविषयक संरचना ही मार्गदर्शक तत्वे प्रस्तावित करत आहेत. या संरचनेत चार मुख्य घटक समाविष्ट आहेत:

  • नैतिक आणि जबाबदार एआयसाठी सात मार्गदर्शक सिद्धांत (सूत्रे)
  • एआय वापरपद्धतीच्या सहा स्तंभांवरील महत्त्वाच्या शिफारशी
  • अल्प, मध्यम  आणि दीर्घकालीन  वेळापत्रकानुसार आखलेली कृती योजना
  • पारदर्शक आणि उत्तरदायी  एआयचा वापर सुनिश्चित करण्यासाठी उद्योग, डेव्हलपर्स आणि नियामकांसाठी व्यावहारिक मार्गदर्शक तत्त्वे

“जिथे शक्य असेल तिथे सध्याच्या कायद्यांचा वापर करण्यावर आमचा भर कायम राहील. या सगळ्याच्या केंद्रस्थानी मानवकेंद्रितता आहे; संभाव्य हानीच्या समस्या टाळत असताना एआयने  मानवतेची सेवा करावी आणि लोकांना त्यांच्या आयुष्यात लाभ मिळेल, हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे,” इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान सचिव एस. कृष्णन यावेळी म्हणाले.त्यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले.

भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्राध्यापक अजय कुमार सूद म्हणाले, "या संरचनेचा जो भाव आहे त्याची व्याख्या करणारा हा मार्गदर्शक सिद्धांत अतिशय  साधासोपा आहे आणि तो आहे ‘कोणाचीही हानी करू नका’. "समितीने व्यापक विचारमंथन करून अहवालाचा मसुदा तयार केला, जो सार्वजनिक विचारविनिमयासाठी खुला करण्यात आला आहे अशी माहिती एनआयसीचे महासंचालक अभिषेक सिंग यांनी दिली. मिळालेले अभिप्राय  सर्व क्षेत्रांमध्ये असलेल्या भक्कम सहभागाचे स्पष्ट संकेत आहेत, असे त्यांनी सांगितले. एआयचा झपाट्याने विकास होत असल्याने, या सूचनांचे पुनरावलोकन करण्यासाठी आणि अंतिम मार्गदर्शक तत्वे परिपूर्ण  करण्यासाठी दुसरी समिती स्थापन करण्यात आली. नवोन्मेषाला चालना देणाऱ्या आणि एआय अर्थव्यवस्थेला  बळकट करणाऱ्या सुरक्षित, विश्वासार्ह आणि जबाबदार परिसंस्थेला प्रोत्साहन देत असताना, एआय सुलभ, परवडणारी  आणि सर्वसमावेशक  राहील यावर भारत सरकारचे लक्ष केंद्रित आहे. आयआयटी मद्रासचे प्राध्यापक बलरामन् रवींद्रन यांच्या अध्यक्षतेखालील एका उच्च स्तरीय समितीने ही मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत.

धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योगांना सुरक्षित, जबाबदार आणि समावेशक एआयचा अंगिकार करता यावा याकरिता अधिक जास्त प्रमाणात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी एक पायाभूत संदर्भ म्हणून या मार्गदर्शक तत्वांकडे पाहिले जात आहे. हा अहवाल http://indiaai.gov.in/ येथे किंवा येथे उपलब्ध आहे.


 

 

 

निलीमा चितळे/शैलेश पाटील/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2186685) Visitor Counter : 8