अर्थ मंत्रालय
ऑपरेशन "वीड आऊट": डीआरआय अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयाच्या मुंबई शाखेने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुमारे 42 किलो वजनाचा उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा (weed) जप्त केला असून त्याची अंदाजे किंमत 42 कोटी रुपये आहे; या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे
महसूल गुप्तचर संचालनालयाने गेल्या तीन दिवसात 100 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ केले जप्त
Posted On:
04 NOV 2025 9:26PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 नोव्हेंबर 2025
ऑपरेशन "वीड आऊट" अंतर्गत महसूल गुप्तचर संचालनालयाने केलेल्या कारवाईत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बँकॉकहून येणाऱ्या दोन प्रवाशांकडून 42.34 किलो वजनाचा उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला असून अवैध बाजारात त्याची किंमत सुमारे 42 कोटी रुपये इतकी आहे.
प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी या दोन प्रवाशांच्या आगमनानंतर लगेचच त्यांना अटक केली आणि त्यांच्या सामानाची कसून तपासणी केली. या तपासणीत नूडल्स आणि बिस्किटांची 21 पाकिटे आढळून आली. यामध्ये नेहमीच्या अन्नपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये हुशारीने लपवलेला हायड्रोपोनिक गांजा आढळला. एनडीपीएस फील्ड किटने तपास केल्यानंतर यात अमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले.
नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस (एनडीपीएस) कायदा, 1985,मधील तरतुदींनुसार 42.34 किलो वजनाचा हा अवैध पदार्थ जप्त करण्यात आला आणि दोन्ही प्रवाशांना अटक करण्यात आली.
या कारवाईमुळे महसूल गुप्तचर संचालनालयाने तीन दिवसांमध्ये दुसरे मोठे अंमली पदार्थांचे जाळे पकडण्यात यश मिळवले आहे, याआधी शुक्रवारी 31.10.2025 रोजी सुमारे 47 कोटी रुपये किंमतीचे 4.7 किलो कोकेन जप्त केले होते आणि वाहक, वित्तपुरवठादार, हँडलर आणि वितरकासह एकूण पाच जणांना अटक केली होती. या सर्व कारवायांनंतर गेल्या तीन दिवसांत एकत्रितपणे सुमारे 100 कोटी रुपये किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून भारताच्या पश्चिमी भागातून सुनियोजित ड्रग रॅकेट चालवण्याच्या प्रयत्नांना उधळून लावण्यात संचालनालयाला यश आले आहे.
याशिवाय, ऑपरेशन "वीड आऊट" अंतर्गत डीआरआयने भारतातील विविध विमानतळांवर एकूण 292.9 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.
अंमली पदार्थांच्या तस्करीच्या वाढत्या प्रमाणात विशेषतः अन्न पॅकेट्स आणि वस्तूंचा ड्रग्ज लपवण्यासाठी वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला असून भारतीय नागरिकांना वाहक म्हणून वापरण्यात येत असल्याने संचालनालय कायम दक्ष आहे.
अंमली पदार्थांची तस्करी वेळीच रोखून, आंतरराष्ट्रीय तस्करी नेटवर्क नष्ट करून आणि नागरिकांचे आरोग्य, कल्याण आणि सुरक्षितता जपून, नशामुक्त भारत निर्माण करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर डीआरआय ठाम आहे.



शैलेश पाटील/भक्ती सोनटक्के/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2186487)
Visitor Counter : 7