राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी उत्तराखंड विधानसभेला केले संबोधित
विधानमंडळे ही आपल्या संसदीय व्यवस्थेचे महत्वाचे आधारस्तंभ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
Posted On:
03 NOV 2025 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 नोव्हेंबर 2025
राष्ट्रपती, द्रौपदी मुर्मू यांनी आज (3 नोव्हेंबर 2025) उत्तराखंड राज्याच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने डेहराडून इथं, उत्तराखंडच्या विधानसभेला संबोधित केले.

विधानमंडळे ही आपल्या संसदीय व्यवस्थेचे महत्वाचे आधारस्तंभ आहेत असे त्यांनी सांगितले. राज्यघटनाकारांनी संसदीय व्यवस्थेचा अवलंब करत, सातत्यपूर्ण उत्तरदायित्वाला अधिक महत्त्व दिले असल्याचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते असे त्या म्हणाल्या. जनतेप्रती उत्तरदायित्वातील सातत्य ही संसदीय व्यवस्थेची ताकद आणि आव्हानही आहे असे त्या म्हणाल्या.

लोकप्रतिनिधी हे जनता आणि सरकार यांच्यातील सर्वात महत्त्वाचा दुवा आहेत. मतदारसंघातील लोकांसोबत जोडले जाण्याची आणि तळागाळात जाऊन सेवा करण्याची संधी मिळणे म्हणजे मोठे भाग्य आहे असे त्या म्हणाल्या. आमदारांनी जर जनतेच्या समस्या सोडवण्यात सक्रिय सहभाग घेतला आणि त्यांच्या कल्याणासाठी काम केले, तर जनता आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्यातील विश्वासाचे बंध अतूट होतील असे त्या म्हणाल्या.

उत्तराखंड विधानसभेच्या सदस्यांनी संपूर्ण समर्पण भावनेने विकास आणि लोककल्याणाची कामे करावीत असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. ही कामे पक्षीय राजकारणापलीकडची आहेत ही बाबही त्यांनी अधोरेखित केली. समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी अतिशय संवेदनशीलतेने कामे करावीत असा सल्लाही त्यांनी दिला. युवा पिढीला प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देण्याला प्राधान्य दिले पाहीजे अशी सूचनाही त्यांनी यानिमित्ताने केली.

राष्ट्रपती म्हणाल्या की, राज्यघटनेच्या कलम 44 अंतर्गत, आपल्या राज्यघटनाकारांनी सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहितेची तरतूद केली आहे असे त्यांनी सांगितले. संवैधानिक तरतुदींना अनुसरून समान नागरी संहिता विधेयक लागू केल्याबद्दल त्यांनी उत्तराखंड विधानसभेच्या सदस्यांची प्रंशंसाही केली.
उत्तराखंडला विपुल नैसर्गिक संपदा आणि सौंदर्याचे वरदान लाभले आहे. राज्याने विकासाच्या मार्गावर वाटचाल करताना,निसर्गाच्या या देणगीचे जतन संवर्धनही केले पाहीजे असे त्या म्हणाल्या.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2185874)
Visitor Counter : 10