युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
2047 पर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी तंदुरूस्ती ठरणार महत्त्वाची गुरुकिल्ली : राष्ट्रीय तंदुरूस्ती आणि सुस्वास्थ्य परिषदेत केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांचे प्रतिपादन
केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी तंदुरूस्ती, आर्थिक प्रगती आणि युवा क्षमतेचा परस्पर संबंध केला अधोरेखित
राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे यांचे फिट इंडियासाठी सामूहिक प्रयत्नांचे आवाहन
रोहित शेट्टी, हरभजन सिंग आणि सायना नेहवाल आणि इतर प्रतिष्ठित मान्यवरांचा राष्ट्रीय तंदुरूस्ती आणि सुस्वास्थ्य परिषदेत, फिट इंडिया आयकॉन म्हणून गौरव
Posted On:
01 NOV 2025 8:40PM by PIB Mumbai
मुंबईतील द ट्रायडंट इथे आज राष्ट्रीय तंदुरूस्ती आणि सुस्वास्थ्य परिषद 2025 संपन्न झाली. या परिषदेत केंद्रीय युवा आणि क्रीडा तसेच कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या हस्ते नवनियुक्त फिट इंडिया आयकॉन आणि बॉलिवूडमधील चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाचा सदस्य क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल यांचा गौरव केला गेला. या परिषदेच्या माध्यमातून फिट इंडिया मिशन अंतर्गत देशात वाढत असलेल्या तंदुरूस्ती आणि सुस्वास्थ्य चळवळीचा उत्सव साजरा करण्यात आला. त्यामुळे ही परिषद तंदुरूस्त आणि विकसित भारत घडवण्याच्या दिशेमे एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे.

यावेळी केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे देखील उपस्थित होत्या. यांच्या हस्ते अभिनेत्री सायमी खेर, फिटनेस प्रशिक्षक शिवोहम् आणि वृंदा भट्ट यांना, त्यांनी समाजात आरोग्य आणि सुस्वास्थ्य वाढवण्यासाठी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन, फिट इंडिया आयकॉन म्हणून सन्मानित केले गेले. यासोबतच फिट इंडिया चॅम्पियन करण टक्कर, विश्वास नांगरे पाटील आणि कृष्ण प्रकाश यांच्यासह अंकुर गर्ग यांनाही, नागरिकांना तंदुरूस्तीला जीवनशैलीचा भाग बनवण्यासाठी प्रेरित करण्याकरता त्यांनी सातत्यपूर्णतेने केलेल्या प्रयत्नांचा सन्मान म्हणून, त्यांचा केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मांडविया यांनी फिट इंडिया ॲम्बेसेडर म्हणून गौरव केला गेला.

यावेळी केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उपस्थितांना संबोधित केले. जर आपण तंदुरूस्तीचे महत्त्व समजून घेतले नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न साकारणे शक्य होणार नाही असे ते म्हणाले. आता काळ बदलला आहे. पूर्वी लोक पायी प्रवास करायचे आणि दूरच्या ठिकाणी जाण्यासाठी सायकलचा वापर करायचे. त्यामुळे तंदुरूस्ती सहज साध्य व्हायची. मात्र आजच्या डिजिटल जगात आपण अगदी कमी हालचाल करतो आणि तंदुरूस्तीकडे लक्ष देत नाही. आपण ही सवय मोडण्यासाठी मार्ग शोधले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले.

केवळ मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाने तंदुरूस्तीला प्राधान्य दिले, तरच आपण एक राष्ट्र म्हणून अधिक वेगाने प्रगती करू शकू असे डॉ. मनसुख मांडविया यांनी सांगितले. जगात इतर कोणतीही अर्थव्यवस्था वार्षिक 8% दराने वाढत नाही आहे. आणि आपल्या देशातील 65% लोकसंख्या 35 वर्षांखालील आहे. अशावेळी तंदुरूस्तीमुळे भारताच्या प्रगतीला प्रचंड बळ मिळू शकते ही बाब त्यांनी अधोरेखित केली.

तंदुरूस्ती केवळ आरोग्यापुरते मर्यादित नाही, तर ती उद्योगक्षेत्रासाठीही अविभाज्य असल्याचे त्यांनी सांगितले. आज क्रीडा विषयक वस्तुमालाची बाजारपेठ मोठी झाली आहे. क्रीडा क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे, अशावेळी आपण क्रीडा विज्ञान विकसित केले आणि भारतात पोषण पूरक आहार तसेच तंदुरूस्ती उपकरणांची निर्मिती केली, तर क्रीडा तंदुरूस्ती उद्योग क्षेत्राला त्याचा प्रचंड फायदा होईल असेही त्यांनी सांगितले.
राज्यमंत्री रक्षा खडसे यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. आज भारत क्रीडाक्षेत्रातले उदयोन्मुख राष्ट्र बनले आहे. तंदुरूस्तीच्या क्षेत्रात आज अमर्याद संधी आहेत. अशावेळी या क्षेत्राशी संबंधित संपूर्ण परिसंस्थेचे एकात्मिकीकरण झाले, तर आपण फिट इंडिया घडवू शकतो असे त्या म्हणाल्या. संडे ऑन सायकल सारखे उपक्रम छोटे असले, तरी त्यांची दीर्घकालीन परिणामकारकता मोठी आहे असे त्या म्हणाल्या. भारताची सर्वांगीण प्रगती ही शारीरिक आणि मानसिक प्रगतीशी थेट जोडलेली असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते रोहित शेट्टी यांनीही उपस्थितांसोबत संवाद साधला. सामाज माध्यमांवर पुरेसे ज्ञान नसलेल्या हेल्थ इन्फ्लुएन्सर्स कडून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या सल्ल्यांपासून सावधगिरी बाळगण्याचा सल्ला त्यांनी दिला. ही एक भीतीदायक परिस्थिती असून, नव्या पिढीला जर अल्पावधीत शरीर कमावयचे असेल, तर त्यांनी फारच सावधगिरी बाळगली पाहिजे अशी सूचना त्यांनी केली.

ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवाल यांनीही उपस्थितांसोबत संवाद साधला. तंदुरूस्ती ही क्रीडा संस्कृतीशी जोडलेली आहे. चीन आणि जपान, जागतिक स्पर्धांमध्ये मिळवत असलेले उत्कृष्ट यश हे त्यांच्या तंदुरूस्ती विषयक संस्कृतीचा परिणाम आहे असे त्यांनी सांगितले. आता भारतातही याबद्दलची मानसिकता बदलत आहे. आपल्याकडे प्रचंड प्रतिभा आहे, पण यशासाठी कोणताही मधला मार्ग नसतो याची जाणिव त्यांनी करून दिली. पालकांनीही हे वास्तव समजून घेत, संयम बाळगावा असे आवाहन त्यांनी केले. आधी तंदुरूस्तीकडे लक्ष द्यावे, मग कठोर परिश्रमानंतर उत्कृष्टता आपोआप साध्य करता येईल असा सल्ला त्यांनी दिला. मुलांपासून मोबाईल फोन दूर ठेवण्याचे आणि याबाबत मुलांसोबत कडक शिस्तीचे धोरण वाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.

विश्वचषक विजेत्या क्रिकेट संघाचा सदस्य क्रिकेटपटू हरभजन सिंग यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. भारतीय क्रिकेट संघात तंदुरूस्तीचे महत्त्व अधिक वाढवण्याचे मोठे श्रेय विराट कोहलीला जाते असे त्यांनी नमूद केले. आपल्याकडे आधीपासूनच प्रतिभा होती, पण आता भारतीय क्रिकेटपटू तंदुरूस्तीच्या बाबतीतही उत्कृष्ट आहेत असे त्यांनी सांगितले. ते आता झेल सोडत नाहीत आणि त्याने फरकही पडतो ही बाब त्यांनी अधोरेखित केली. योग्य आहार, योग्य विश्रांती आणि योग्य प्रकारे व्यायाम केल्यावर फरक नक्की दिसून येईल असा सल्ला त्यांनी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंदुरूस्तीला प्राधान्य दिल्याबद्दल, तसेच यासाठी क्रीडा मंत्रालय करत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुकही केले.

या परिषदेच्या निमित्ताने तंदुरूस्ती संस्कृती आणि तंदुरूस्ती उद्योगाशी संबंधीत चर्चेची दोन सत्रेही आयोजित केली होती. यात या क्षेत्राशी संबंधित भागधारक आणि तज्ञ सहभागी झाले होते. या सर्वांनी एकमताने तंदुरूस्ती संस्कृतीची सुरुवात लहान वयातच व्हायला हवी आणि मुलांना मोबाईल फोनच्या व्यसनापासून दूर ठेवण्यात पालकांची मोठी भूमिका बजावायला हवी यावर सहमती व्यक्त केली. सर्व तज्ज्ञांनी बनावट पोषणपूरक पदार्थ, कमी वेळेत स्नायू कमावण्याबाबतचे चुकीचे सल्ले आणि जंक फूड विकणाऱ्या फूड ॲप्सपासून सावध राहण्याचा सल्लाही दिला.
फिट इंडिया चळवळीबद्दल
29 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते फिट इंडिया चळवळीचा प्रारंभ करण्यात आला होता. तंदुरूस्तीला दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवणे आणि शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय जीवनशैलीकडे वाटचाल करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
या अभियानाची प्रमुख उद्दिष्ट्ये :
- तंदुरूस्तीला सोपे, आनंददायी आणि सर्वांसाठी उपलब्ध बनवणे.
- शारीरिक सक्रीयतेशी संबंधित विविध उपक्रमांच्या माध्यमातून तंदुरूस्तीविषयी जनजागृती करणे.
- स्थानिक आणि पारंपरिक क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देणे.
- तंदुरूस्तीचा संदेश प्रत्येक शाळा, महाविद्यालय, ग्रामपंचायत आणि गावापर्यंत पोहोचवणे.
- नागरिकांना त्यांचे तंदुरूस्तीविषयक अनुभव सामायिक करण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि यासंबंधीच्या जनजागृतीसाठी व्यासपीठे उपलब्ध करून देणे
***
सोनल तुपे/तुषार पवार/परशुराम कोर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 2185387)
Visitor Counter : 20