कृषी मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते दिल्लीत राष्ट्रीय एफपीओ बैठक 2025 चे उद्घाटन


या बैठकीत 24 राज्ये आणि 140 जिल्ह्यांतील शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना, समूहाधारित व्यापारी संघटना आणि इतर संस्थांचा सहभाग

“आम्ही लवकरच एक बियाणे कायदा आणणार आहोत ज्यामध्ये शेतकऱ्यांना उत्तम दर्जाची बियाणे मिळतील हे सुनिश्चित करण्याची तरतूद असेल”: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह

“बोगस बियाणे तसेच कीटकनाशके यांना आळा घालण्यासाठी सरकार कठोर कायदा आणणार”: केंद्रीय मंत्री शिवराज सिंह

“शेतकरी उत्पादक संघटनांनी अर्थव्यवस्था बळकट करण्यात, महिलांना सक्षम करण्यात आणि स्वदेशीच्या माध्यमातून स्वावलंबी गावांना प्रोत्साहन देण्यात मदत केली पाहिजे”: केंद्रीय मंत्री चौहान

Posted On: 30 OCT 2025 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज दिल्लीत राष्ट्रीय एफपीओ बैठक 2025 चे उद्घाटन केले. देशभरातील 24 राज्ये आणि 140 जिल्ह्यांतील 500 हून अधिक प्रगतीशील शेतकरी, शेतकरी उत्पादक संघटना (एफपीओज), अंमलबजावणी संस्था  तसेच समूहाधारित व्यापारी संघटना  या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत.

यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शेतकरी, एफपीओ सदस्य तसेच सहभागी संस्थांच्या प्रयत्नांची प्रशंसा करत केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना शेतकऱ्यांमध्ये उत्पादकाच्या भूमिकेकडून उद्योजक आणि व्यापाऱ्याच्या रुपात परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहन केले जेणेकरून शेतकऱ्यांपर्यंत संपूर्ण लाभ पोहोचेल.

शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याप्रति पंतप्रधान मोदी यांच्या खंबीर वचनबद्धतेबद्दल केंद्रीय मंत्री चौहान यांनी शेतकऱ्यांतर्फे कृतज्ञता व्यक्त केली. कृषी क्षेत्र जनतेची उपजीविका आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अशा दोन्हींसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे यावर चौहान यांनी याप्रसंगी बोलताना अधिक भर दिला. ते म्हणाले, “शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आम्ही एकात्मिक शेती पद्धतीवर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. केवळ अन्नधान्यावर अवलंबून राहणे पुरेसे नसून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी इतर संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे.”

  

दरांतील तफावतीबाबत चिंता व्यक्त करताना केंद्रीय मंत्री चौहान म्हणाले की ग्राहकाने अधिक दर दिला तरीही शेतकऱ्यांना बहुतेकदा त्यांच्या शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. “ही तफावत कमी करायला हवी,” ते म्हणाले. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे मिळतील याची सुनिश्चिती करून घेण्यासाठी सरकार लवकरच एक बियाणे कायदा आणणार आहे अशी घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी यावेळी केली. ते पुढे म्हणाले की, बोगस बियाणे तसेच कीटकनाशके यांच्याविरुध्द सरकार कठोर कारवाई करत असून लवकरच या संदर्भात शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदा लागू होणार आहे.

कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मूल्यवर्धनाकडे वळण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "शेतकऱ्यांनी केवळ उत्पादक राहू नये तर शेतीच्या माध्यमातून त्यांनी उद्योजक बनले पाहिजे. प्रक्रिया आणि मूल्यवर्धन यांमुळे त्यांचे उत्पन्न वाढेल."

चौहान यांनी एफपीओना लहान शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी गांभीर्याने काम करण्याचे आणि मंत्रालयासोबत व्यावहारिक सूचना सामायिक करण्याचे आवाहन केले आणि चांगल्या सूचनांवर  योग्य ती पावले उचलली जातील असे आश्वासनही  दिले. त्यांनी एफपीओना एका वर्षाच्या आत उलाढाल वाढवावी, सदस्यत्व वाढवावे आणि सदस्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा यासाठी विश्वासार्हता आणि गुणवत्ता वाढवण्याचे  आवाहन केले.

दिल्लीतील हौज खास येथील एनसीडीसी आणि एनसीयूआय परिसरात झालेल्या उद्घाटन कार्यक्रमात कृषिमंत्र्यांनी सर्वोत्कृष्ट शेतकरी उत्पादक संघटना, सीबीबीओ आणि कार्यान्वयन संस्था यांचा,  त्यांनी शेतकरी संघटना, व्यवसाय आणि डिजिटल क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सत्कार केला.

  

विविध कृषी उत्पादनांचे भव्य प्रदर्शन

एनसीडीसी परिसरात आयोजित या प्रदर्शनात एकूण 267 एफपीओंनी तृणधान्ये, डाळी, तेलबिया, फळे, भाज्या, सेंद्रिय, प्रक्रिया केलेली आणि पारंपरिक उत्पादने प्रदर्शित केली. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी  57 स्टॉल्सना भेट दिली, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला, त्यांच्या नवोपक्रमांचे कौतुक केले आणि त्यांना तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि नवीन कल्पना स्वीकारण्यास प्रोत्साहित केले.

तंत्रविषयक सत्रे आणि तज्ज्ञमंडळ चर्चा

या कार्यक्रमात तेलबिया उत्पादन, पाण्याचा कार्यक्षम वापर, नैसर्गिक शेती, कृषी पायाभूत सुविधा निधी, मध उत्पादन, डिजिटल मार्केटिंग, एगमार्क प्रमाणपत्र आणि बियाणे उत्पादन यासारख्या विषयांवर अनेक तांत्रिक सत्रे आणि तज्ज्ञमंडळ चर्चा झाल्या. या सत्रांमध्ये कृषी तज्ज्ञ, उद्योग प्रतिनिधी आणि शेतकरी सहभागी झाले होते.

शेतकरी उद्योजकता आणि बाजार संपर्काला चालना

एफपीओ, शेतकरी, खरेदीदार आणि विक्रेते यांच्यात संवादासाठी एक समर्पित मंच तयार करण्यात आल्यामुळे  ग्रामीण उद्योजकांसाठी नवीन बाजारपेठ संधींचा मार्ग प्रशस्त झाला आहे. या परिषदेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना उत्पादक, पुरवठादार आणि भागीदार म्हणून सक्षम करणे असून समावेशक आणि नवोन्मेषी  कृषी विकासाच्या दिशेने हे एक ऐतिहासिक पाऊल आहे.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे मंत्री-शेतकरी संवादाचे एक उत्तम उदाहरण आहे. यातून  एफपीओ उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि नवीन विचारांची देवाणघेवाण झाल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना व्यापक लाभ होईल.

 

* * *

शैलेश पाटील/सोनाली काकडे/संजना चिटणीस/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184204) Visitor Counter : 16