अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यानच्या भूतानच्या अधिकृत दौऱ्यासाठी रवाना

प्रविष्टि तिथि: 30 OCT 2025 4:22PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑक्‍टोबर 2025

 

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 या कालावधीत भूतानच्या अधिकृत दौऱ्यात अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागातील भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील.

आज आपल्या अधिकृत दौऱ्याचा प्रारंभ करताना, केंद्रीय अर्थमंत्री 1765 मध्ये स्थापन झालेल्या आणि प्रगत बौद्ध अभ्यासात गुंतलेल्या 100 हून अधिक भिक्षूंचे निवासस्थान असलेल्या ऐतिहासिक सांगचेन चोईखोर मठाला भेट देतील.

या भेटीचा एक भाग म्हणून, अर्थ मंत्री भारत सरकारच्या सहाय्याने राबविल्या जाणाऱ्या अनेक प्रमुख प्रकल्पांना भेट देतील आणि त्यांचा आढावा घेतील. यामध्ये कुरिचु जलविद्युत प्रकल्प आणि पॉवरहाऊस, ग्यालसुंग अकादमी, सांगचेन चोईखोर मठ आणि पुनाखा झोंग यांचा समावेश आहे.

केंद्रीय अर्थमंत्री भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि भूतानचे पंतप्रधान दाशो त्शेरिंग तोबगे यांची भेट घेणार आहेत. तसेच त्या भूतानचे अर्थमंत्री लेकी दोरजी यांच्याशी द्विपक्षीय बैठकही घेणार आहेत. या बैठकीत भारत-भूतान आर्थिक आणि वित्तीय सहकार्य अधिक मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा होणार आहे.

अधिकृत कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, सीतारामन प्रमुख विकासात्मक उपक्रमांवरील सादरीकरणांना उपस्थित राहतील, ज्यात पुढील कार्यक्रमांचा समावेश आहे:

  • भुतानच्या ऊर्जा क्षेत्रावर द्रक ग्रीन पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (डीजीपीसी) यांचे सादरीकरण;
  • भूतानचा 21 व्या शतकासाठी आर्थिक मार्गदर्शक आराखडा;
  • द्रक पीएनबी आणि बँक ऑफ भूतान यांच्या माध्यमातून भूतानमधील बँकिंग/वित्तीय क्षेत्रावरील सादरीकरण; आणि
  • गेलफू माइंडफुलनेस सिटी प्रकल्प

यासोबतच अर्थमंत्री कॉटेज अँड स्मॉल इंडस्ट्रीज (सीएसआय) मार्केटला देखील भेट देतील, जिथे त्या भारताच्या युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) वापरून व्यवहार प्रत्यक्ष पाहतील, ज्यातून दोन्ही राष्ट्रांमधील वाढती डिजिटल आणि आर्थिक जोडणी प्रतिबिंबित होते.

केंद्रीय अर्थमंत्री आपल्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात, भूतानमधील - ‘पुनाखा झोंग’( किल्लेवजा मठ) या जगात दुसऱ्या क्रमांकाच्या प्राचीन तसेच दुसऱ्या सर्वात मोठ्या झोंग’ला भेट देतील.  पुनाखा झोंगकडे जाताना त्या भूतानच्या शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि त्यांच्या शेती पद्धती, आव्हाने तसेच संधी समजून घेतील.

 

* * *

शैलेश पाटील/श्रद्धा मुखेडकर/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2184194) आगंतुक पटल : 28
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , Punjabi , Gujarati , Tamil , Malayalam