पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नायजेरियामधील भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 17 NOV 2024 11:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 17 नोव्‍हेंबर 2024

 

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

सुन्नु नायजेरिया। नमस्ते।

आज तुम्ही अबुजामध्ये चमत्कार केला आहे. अबुजात अद्भुत वातावरण निर्माण केले आहे. आणि हे सर्व पाहून, काल संध्याकाळपासून मी पाहतो आहे, असे वाटते, मी अबुजामध्ये नाही तर भारतातील एखाद्या शहरात आलो आहे. तुमच्यापैकी खूप जण लागोस, कानो, कडुना आणि पोर्ट हार्कोर्ट अशा विविध ठिकाणांहून अबुजा इथे आला आहात, आणि तुमच्या चेहऱ्यावरील हे तेज, तुमचा उत्साह, जितके तुम्ही इथे येण्यासाठी उत्सुक होता, तितकाच मी देखील तुम्हाला भेटण्याची वाट पाहात होतो. तुमचे हे प्रेम, हा स्नेह, ही माझ्यासाठी खूप मोठी संपत्ती आहे. तुमच्यामध्ये येणे, तुमच्यासोबत वेळ घालवणे आणि हे क्षण आयुष्यभर माझ्यासोबत राहतील.

मित्रहो,

पंतप्रधान म्हणून हा माझा पहिला नायजेरिया दौरा आहे, पण मी एकटा आलेलो नाही, मी माझ्यासोबत भारताच्या मातीचा सुगंध घेऊन आलो आहे. आणि कोटी-कोटी भारतीयांकडून तुमच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा घेऊन आलो आहे. भारताच्या प्रगतीने तुम्हाला आनंद होतो, आणि इथे तुमच्या प्रगतीवर प्रत्येक भारतवासियाची छाती अभिमानाने फुलते, फुलून किती होते… किती? माझी तर 56 होते.

मित्रहो,

मी आज आताच राष्ट्रपती टिनुबू यांचे आणि नायजेरियाच्या जनतेचे देखील विशेष आभार व्यक्त करू इच्छितो. ज्या प्रकारचं इथे स्वागत झालं आहे, ते अद्भुत आहे, आणि काही वेळापूर्वी राष्ट्रपती टिनुबू यांनी मला नायजेरियाच्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले. हा फक्त मोदींचा सन्मान नाही, हा सन्मान भारताच्या कोटी-कोटी नागरिकांचा लोकांचा आहे, आणि हा सन्मान तुम्हा सर्वांचा आहे, इथे राहणाऱ्या भारतीयांचा आहे.

मित्रहो,

मी खूपच नम्रतापूर्वक हा सन्मान तुम्हा सर्वांना समर्पित करतो.

मित्रहो,

राष्ट्रपती टिनुबू यांच्यासोबतच्या चर्चेदरम्यान ते नायजेरियाच्या प्रगतीमधील तुमच्या योगदानाची वारंवार प्रशंसा करत होते, आणि जेव्हा मी त्यांना ऐकत होतो, त्यांच्या डोळ्यांत जी चमक बघत होतो, त्या वेळी माझी मान गर्वाने उंच झाली. जसा एखादा कुटुंबाचा सदस्य कारकिर्दीत खूप मोठी उंची गाठतो आणि जसे त्याच्या आई-वडिलांना, त्यांच्या गावकऱ्यांना त्याचा अभिमान वाटतो, तशाच भावनेने मी भारलेला आहे. तुम्हा सर्वांनी नायजेरियाला केवळ आपले परिश्रम, आपली मेहनतच दिलेली नाही, तुम्हा लोकांनी नायजेरियाला आपलं हृदय देखील दिलं आहे. इथला भारतीय समुदाय नेहमीच नायजेरियाच्या प्रत्येक सुख-दुःखात सोबती राहिला आहे. नायजेरियामधील लोक, आज 40 किंवा 60 वयातील जे लोक आहेत, त्यांच्यापैकी अनेक असे मिळतील, ज्यांना कोणत्या ना कोणत्या भारतीय शिक्षकांनी शिकवलं असेल. इथे खूप सारे भारतीय डॉक्टर आहेत जे नायजेरियाच्या लोकांची सेवा करत आहेत. नायजेरियात कितीतरी भारतीयांनी आपला व्यवसाय उभा करून या देशाच्या विकास यात्रेचे भागिदार बनले आहेत. स्वातंत्र्यापूर्वीही खूप आधी किशनचंद चेलाराम जी इथे आले होते. तेव्हा हे कोणालाच वाटले नव्हते की त्यांची कंपनी नायजेरियाच्या सर्वात मोठ्या उद्योजक घराण्यांपैकी एक बनेल. आज भारताच्या अनेक कंपन्या नायजेरियाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला बळ देत आहेत. तोलाराम जींचे नूडल्स इथे घरोघरी आनंदाने खाल्ले जात आहेत. तुलसीचंद राय जींची संस्था नायजेरियातील लोकांच्या जीवनाला झळाळी देत आहेत. इथल्या लोकांसोबत भारतीय समुदाय नायजेरियाच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून वाटचाल करतो आहे. आणि हीच तर, हीच तर भारताच्या लोकांची खूप मोठी ताकत आहे, भारताच्या लोकांचे संस्कार आहेत. आपण दुसऱ्या देशात भले जाऊ, पण सर्वांच्या हिताचे आपले संस्कार विसरत नाही. आपण तर ते लोक आहोत, जे शतकांपासून आपल्या नसनसांत ते संस्कारांना घेऊन जगतो आहोत, जे संपूर्ण विश्वाला एक कुटुंब मानतात. आपल्यासाठी संपूर्ण विश्व एक कुटुंब आहे.

मित्रहो,

तुम्ही लोकांनी नायजेरियात भारतीय संस्कृतीला जो सन्मान मिळवून दिला आहे, तो सर्वत्र दिसतो. इथल्या लोकांमध्ये योग सतत लोकप्रिय होत आहे. मला वाटतं तुम्ही लोक करत नाही आहात, नायजेरियाचे लोक तर करत आहेत, या - या हाताच्या टाळीवरून कळलं आहे मला. बघा मित्रहो पैसे कमवा, नाव कमवा, जे कमवायचं आहे कमवा, पण काही वेळ योगासाठी देखील तर द्या. आणि मला कोणीतरी सांगितलं की इथल्या राष्ट्रीय दूरचित्रवाहिनीवर योग विषयक एक साप्ताहिक कार्यक्रम दाखवला जातो. तुम्ही लोक तर इथल्या वाहिन्या बघत नसणार, तुम्ही तर भारताच्या बघत असणार. तिथे किती पाणी भरलं, आज कुठे अपघात झाला. आणि इथे नायजेरियात हिंदी देखील खूप लोकप्रिय होत आहे. नायजेरियाचे तरुण, खासकरून कानोचे बरेच विद्यार्थी हिंदी शिकतात, आणि कानोमध्ये तर हिंदी प्रेमींनी दोस्ताना, दोस्ताना नावाचा एक समूह देखील बनवला, इथे उपस्थित आहे. आणि म्हणून जेव्हा इतकी जास्त मैत्री आहे, तर मग भारताच्या चित्रपटांशी मैत्री होणं देखील खूप स्वाभाविक आहे. मी आता जेवणाच्या वेळी गप्पा मारत होतो, सर्वांसोबत इथल्या लोकांशी, त्यांना भारताच्या सर्व अभिनेत्यांची नावं माहीत आहेत, सर्व चित्रपटांची नावं माहीत आहेत. उत्तर भागात लोक भारतीय कार्यक्रम बघण्यासाठी गर्दी करतात, नमस्ते वाला, हा वाला शब्द कळतो लोकांना, हा मूळात गुजराती शब्द आहे...म्हारावाला. नमस्ते वाला सारखे चित्रपट आणि पोस्टकार्ड्स … पोस्टकार्ड्स सारखी वेब मालिका इथे खूप पसंत केली जात आहे.

मित्रहो,

गांधीजी दीर्घकाळापर्यंत आफ्रिकेत राहिले होते, ते आफ्रिकेच्या लोकांच्या सुख दुःखातले सोबती झाले. गुलामीच्या त्या काळात भारत आणि नायजेरियाच्या लोकांनी स्वातंत्र्यासाठी, त्यासाठीच्या लढ्यासाठी कोणतीही तसूभरही कसर शिल्लक ठेवली नाही. आणि जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा त्याने नायजेरियाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीलाही प्रेरणा दिली. आज भारत आणि नायजेरिया संघर्षाच्या दिवसांमधले सोबती असल्याप्रमाणे एकत्र पुढे वाटचाल करत आहेत. भारत मदर ऑफ डेमोक्रेसी आहे, तर नायजेरिया आफ्रिकेची सर्वात मोठी लोकशाही आहे. आपल्या दोघांकडे लोकशाहीतील समानता आहे, आपल्या दोघांकडे विविधतेतील समानता आहे, आणि आपल्या दोन्ही देशांकडे लोकसंख्याशास्त्राची ऊर्जा आहे. भारत आणि नायजेरिया दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहेत, प्रथा परंपरा मानणारे लोक आहेत. इथे लागोसचे जगन्नाथ जी भगवान, इथे भगवान वेंकटेश्वर, गणपती दादा, कार्तिकेय मंदिर विविधतेप्रती नायजेरियाच्या सन्मानाचे प्रतीक आहेत. आणि आज जेव्हा मी तुमच्या इथे आलो आहे, तेव्हा नायजेरियाच्या सरकारचे या सगळ्याच्या निर्मितीत सहकार्य देण्यासाठी मी हिंदुस्थानवासीयांच्या वतीने आभार देखील व्यक्त करतो.

मित्रहो,

भारत जेव्हा स्वतंत्र झाला होता, तेव्हा अनेक प्रकारची आव्हाने होती. स्वातंत्र्यानंतर आपल्या पूर्वजांनी त्या समस्यांमधून बाहेर काढण्यासाठी अनेक अथक परिश्रम केले, आणि आज भारताच्या जलद प्रगतीची चर्चा संपूर्ण जगात होत आहे...होत आहे की नाही होत आहे? तुमच्या कानांपर्यंत येते की नाही येत? जे कानांवर येते ते ओठांवर येते की नाही येत? जे ओठांवर येते ते हृदयात विसावते की नाही विसावत? भारताच्या यशाचा आपल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटतो. तुम्ही सांगा, तुम्हाला देखील अभिमान वाटतो, की नाही वाटत? जेव्हा भारताचे चंद्रयान, चंद्रावर पोहोचले, तेव्हा तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटला? तुम्ही देखील त्या दिवशी डोळे विस्फारून टीव्ही  समोर बसले होतात की नाही बसले होता? जेव्हा भारताचे मंगलयान मंगळावर पोहोचले, तेव्हा तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटला? जेव्हा तुम्ही मेड इन इंडिया लढाऊ विमान तेजसला पाहता, जेव्हा तुम्ही मेड इन इंडिया विमान वाहक आयएनएस विक्रांतला पाहता, तेव्हा तुम्हाला अभिमान वाटला की नाही वाटत? आज भारत अंतराळ क्षेत्रापासून उत्पादनापर्यंत, डिजिटल तंत्रज्ञानापासून आरोग्यसेवेपर्यंत जगातील मोठ्या मोठ्या देशांशी स्पर्धा करत आहे. तुम्हा सर्वांना ठाऊक आहे, गुलामीच्या दीर्घ कालखंडाने आपली अर्थव्यवस्था उध्वस्त करून टाकली होती. आव्हानांशी लढत देत, स्वातंत्र्यानंतरच्या 60 वर्षांत, सहा दशकांत भारताच्या अर्थव्यवस्थेने एक ट्रिलियन डॉलरचा टप्पा पार केला. किती वर्षांत? विसरले? किती वर्षांत? किती दशक? सहा दशकात, किती? मी काही शिक्षक नाही, मी असेच विचारत आहे. आपण भारतीय टिकून राहिलो, आणि टाळी आता वाजवायची आहे. अशी वाजवाल का? तुम्ही टाळी तर वाजवली पण कारण तर मी आता सांगणार, सहा दशकात काय झालं ते. तुम्ही आता टाळी वाजवली, आता टाळ्या दुप्पटीने वाजवाव्या लागतील. गेल्या एका दशकात भारताने आपल्या जीडीपीमध्ये सुमारे 2 ट्रिलियन डॉलरची आणखी भर टाकली. 10 वर्षांत भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार दुप्पट झाला आहे, दुप्पट. आज भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. लक्षात राहील ना? कितवी? आणि तो दिवस दूर नाही जेव्हा भारत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनेल, जेव्हा भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेस.

मित्रहो,

आपण नेहमी ऐकतो की जे लोक आपल्या सुरक्षित वातावरणातून  बाहेर पडतात, तेच काहीतरी मोठं करू शकतात. आता ही गोष्ट तुम्हाला समजावून सांगण्याची गरज नाही कारण तुम्ही इथपर्यंत तर आलाच आहात. आज भारत आणि भारताचे युवा याच वृत्तीने पुढे वाटचाल करत आहे. म्हणून आज भारत नवनवीन क्षेत्रांमध्ये जलद गतीने प्रगती करत आहे. भारताची स्टार्टअप परिसंस्था, कदाचित तुम्ही देखील 10-15 वर्षांपूर्वी स्टार्टअप ऐकलेच नसेल. मी एकदा स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी परिषद बोलावली, तर त्यात 8-10 लोक होते जे स्टार्टअप वाले होते, बाकी सर्व तर आता काय आहे, स्टार्टअप समजून घेणारे होते. तर त्यात बंगालची एक मुलगी ती आपला अनुभव सामायिक करण्यासाठी उभी राहिली. कारण मला लोकांना समजावायचं होतं, हे कोणतं नवीन जग आहे. तर ती मुलगी, खूप शिकलेली होती, चांगल्या नोकरीची हक्कदार होती आणि well-settled होती. तिने सर्वकाही सोडून दिलं, तर तिने आपला अनुभव सांगितला, ती बंगाली होती. तर ती आपल्या गावी गेली, तिने आईला सांगितलं की आई मी तर सर्वकाही सोडून दिलं, नोकरी-बिकरी सोडून दिली. तर आई काय, तर म्हणाली काय करशील? तर म्हणाली स्टार्टअप करेन, तर म्हणाली महाविनाश. पण आज हाच आपला युवा वर्ग, सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून, नवीन भारतासाठी, नवीन उपाययोजनांवर काम करण्याचा निर्धार केला, आणि परिणाम अद्भूत अप्रितिम दिसत आहेत. आज भारतात दीड लाखाहून अधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स आहेत. ज्या स्टार्टअपचं नाव ऐकताच आई ओरडायची की महाविनाश.... तेच स्टार्टअप आज म्हणत आहे महाविकास. 10 वर्षांत भारतात 100 हून अधिक युनिकॉर्न बनले आहेत. जरा मी विस्तृतपणे सांगीतले, तर टाळ्या जास्त वाजतील. एक युनिकॉर्न म्हणजे 8 ते 10 हजार कोटी रुपयांची कंपनी. भारताच्या तरुणांनी बनवलेल्या अशा 100 पेक्षा जास्त कंपन्या आज भारताच्या स्टार्टअप संस्कृतीचा झेंडा फडकावत आहेत. आणि हे का झालं, का झालं हे सर्व? का झालं? हे यामुळेच झालं, कारण भारत आपल्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडला आहे.

मित्रहो,

मी एक आणखी उदाहरण तुम्हाला देतो. भारत सदैव आपल्या सेवा क्षेत्रासाठी ओळखला जातो. हा आपल्या अर्थव्यवस्थेचा एक मजबूत आधारस्तंभ राहिला आहे. पण आपण इतक्यावरच समाधान मानले नाही. आपण सुरक्षित वातावरणातून बाहेर पडूनन, आपण जागतिक दर्जाचे उत्पादन केंद्र बनवण्याचा निर्धार केला आहे. आम्ही उत्पादन उद्योगाला जबरदस्त प्रोत्साहन दिले. आज भारत जगातील सर्वात मोठ्या मोबाइल फोन उत्पादकांपैकी एक आहे. आज भारतात दरवर्षी 30 कोटींहून जास्त मोबाइल फोनचे उत्पादन घेतले जाते. म्हणजे नायजेरियाला जितके पाहिजेत त्यापेक्षा जास्त. सोबतच 10 वर्षांत आपली मोबाइल फोन निर्यात 75 पट, 75 पटींपेक्षा अधिक झाली आहे. याच 10 वर्षांत भारताची संरक्षण निर्यात ही जवळपास 30 पट वाढली आहे. आज आपण जगातील 100 पेक्षा जास्त देशांना संरक्षण उपकरणांची निर्यात करत आहोत.

मित्रहो,

अंतराळ उद्योगा क्षेत्रात तर भारत जी कमाल करतो आहे त्याची प्रशंसा तर जगभर होत आहे. भारताने निर्धार केला आहे, लवकरच आपण आपल्या गगनयानने भारतीयांना अंतराळात पाठवणार. भारत अवकाशात अंतराळ स्थानकही बनवणार आहे.

मित्रहो,

सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून नवोन्मेषाची कास धरण, नवीन मार्ग तयार करणे ही आज भारताची वृत्ती बनली आहे. गेल्या 10 वर्षांत भारताने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. इतक्या सगळ्या लोकांचे गरिबीतून बाहेर येणे, ही जगासाठी खूप मोठी प्रेरणा आहे. यातून प्रत्येक देशात एक आशा जागृत होते, जर भारताने केलं आहे, तर आम्ही देखील करू शकतो. आत्मविश्वासाने भारलेला भारत आज एका नवीन प्रवासाला निघाला आहे, लक्ष्य आहे - विकसित भारत बनवणे. जेव्हा आपण 2047 मध्ये, तुमच्यापैकी जे लोक म्हातारपणात निवृत्त होऊन खरोखरच चांगले आयुष्य जगायचे आहे, तर मी काम आत्तापासूनच करत आहे त्यांच्यासाठी. जेव्हा आपण 2047 मध्ये स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरी करू, तेव्हा भारत विकसित असावा, भव्य असावा यासाठी प्रत्येक भारतीय मिळून काम करत आहे. आणि यात नायजेरियात राहत असलेल्या तुम्हा सर्व लोकांचीही खूप मोठी भूमिका आहे.

मित्रहो,

आता विकास असो, शांतता असो, समृद्धी असो किंवा मग लोकशाहीची गोष्ट असो, जगासाठी भारत एक नवीन आशा म्हणून उदयाला आला आहे. तुम्हाला अनुभव आळा असेल, आता जगात तुम्ही जिथे गेला असाल, लोक तुम्हाला सन्मानाच्या नजरेने बघतात की नाही बघत? नाही खरं सांगा काय होते? तुम्ही जसे म्हणता ना इंडिया किंवा हिंदुस्थान वा भारत, ते हात सोडतच नाहीत, त्यांना वाटतं मी हात पकडून ठेवला तर काही ऊर्जा आपल्यातही येईल.

मित्रहो,

जगात कोणतीही अडचण आली, तर भारत विश्वबंधूच्या रूपात पहिला प्रतिसाद देणारा म्हणून तिथे पोहोचतो. तुम्हाला कोरोनाचा काळ आठवत असेल. त्या वेळी जगात किती हाहाकार माजला होता. प्रत्येक देश लसीसाठी चिंतीत झाला होता आणि संकटाच्या त्या काळात भारताने निर्धार केला, की जास्तीत जास्त देशांना लस दिली जाईल. हेच तर आपले संस्कार आहेत. हजारो वर्षे जुन्या आपल्या संस्कृतीने आपल्याला हीच शिकवण दिली आहे. म्हणून भारताने लसीचे उत्पादन वाढवले आणि जगातील 150 पेक्षा जास्त देशांना, हा आकडा छोटा नाहीए हा, 150 पेक्षा जास्त देशांना कोरोनाच्या काळात औषधे आणि लस पाठवल्या. नायजेरियासह आफ्रिकेच्या कितीतरी देशांमध्ये भारताच्या या प्रयत्नांमुळे हजारो-हजारो लोकांचे प्राण वाचले.

मित्रहो,

आजचा भारत सबका साथ सबका विकास या तत्वावर विश्वास ठेवतो. मी नायजेरियासह आफ्रिकेला भविष्यातील विकासाचे एक मोठे केंद्र म्हणून पाहिले आहे. गेल्या 5 वर्षांतच आम्ही आफ्रिकेत 18 नवीन दूतावास सुरु केले आहेत. गेल्या काही वर्षांत आफ्रिकेच्या आवाज जागतिक मंचावर पोहचवण्यासाठी भारताने शक्य ते सर्व प्रयत्न केले आहेत. याचं एक उत्कृष्ट उदाहरण तर तुम्ही गेल्या वर्षीच पाहिले आहे. ज्यावेळी भारताला पहिल्यांदा G20 चे राष्ट्रपतीपद मिळाले, तेव्हा आम्ही आफ्रिकन युनियनला कायमस्वरूपी सदस्य बनवण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली, आणि भारताला त्यात यश देखील मिळाले. मला आनंद आहे की G20 च्या प्रत्येक सदस्य देशाने भारताच्या या पुढाकाराचे खूप समर्थन केले. आणि भारताच्या निमंत्रणावर नायजेरियाने तिथे अतिथी देश म्हणून पूर्ण सन्मानाने हा इतिहास घडताना बघितले. राष्ट्रपती बनल्यानंतर राष्ट्रपती टिनुबू यांच्या पहिल्या दौऱ्यापैकी एक भारताचा दौरा होता. आणि G20 साठी भारतात आलेले राष्ट्रपती टिनुबू सर्वात पहिल्या पाहुण्यांपैकी एक होते.

मित्रहो,

तुमच्यापैकी खूप सारे जण नेहमी अधेमधे भारतात येत असता, सणांच्या वेळी, घरातील सुख-दुःखात तुम्ही लोक सहभागी होता. आणि यासाठी भारतातून तुमचे नातेवाईक संदेश देखील पाठवतात, फोन देखील करतात, आता मी देखील तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे, स्वतः तुमच्यात आलो आहे, तर मी देखील तुम्हाला एक विशेष निमंत्रण देऊ इच्छितो. पुढच्या वर्षी जानेवारीमध्ये भारतात अनेक उत्सव एकत्र येणार आहेत. जानेवारी महिन्यात दरवर्षी आपण 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो दिल्लीत, देशात. जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात अनिवासी भारतीय दिवस देखील साजरा केला जाणार आहे, आणि यावेळी हा अनिवासी भारतीय दिवस भगवान जगन्नाथजींच्या चरणी ओदिशाच्या भूमीवर होणार आहे. यात संपूर्ण जगातून तुमच्यासारखे सहकारी भारतात एकत्र येणार आहेत. पुढच्या वर्षी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारीपर्यंत 45 दिवस प्रयागराजमध्ये महाकुंभ देखील होणार आहे. भारतात येण्याची इतकी सारी कारणे आहेत, एकत्र आली आहेत. एक मोठाच सुखद योगायोग तुमच्यासाठी बनला आहे. तुम्ही या दरम्यान भारतात या, आपल्या मुलांना भारतात आणा आणि जे तुमचे नाइजेरियन मित्र देखील आहेत, त्यांना देखील सोबत आणा, आणि प्रयागराजपासून जवळच अयोध्या जी आहे, काशी देखील जास्त दूर नाही. कुंभसाठी आलात तर तुम्ही तिथे जाण्याचा देखील प्रयत्न करा. आणि काशीमध्ये जो नवीन विश्वनाथ भगवानांचा धाम बनला आहे, पूर्णपणे पाहण्यासारखा आहे. आणि अयोध्यामध्ये 500 वर्षांनंतर, 500 वर्षांनंतर प्रभू श्री रामांचं भव्य मंदिर बनलं आहे. तुम्ही स्वतः देखील दर्शन करा, आपल्या मुलांना देखील तिथले दर्शन घडवा, तुम्ही नक्की नियोजना करा. पहिले अनिवासी भारतीय दिवस, मग महाकुंभ आणि त्यानंतर प्रजासत्ताक दिन म्हणजे एका प्रकारे तुमच्यासाठी तर त्रिवेणी आहे. ही भारताच्या विकास आणि वारश्याशी जोडून घेण्याची खूप मोठे संधी आहे. मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही आधीही भेटी दिल्या असतील, खूप वेळा आले असाल. पण माझे शब्द लिहून ठेवा. ही भेट तुमच्या जीवनातली अनमोल आठवण बनून जाईल, तुमच्या जीवनातले, एक खूप मोठ्या आनंदाचे, सौभाग्य असेल. पुन्हा एकदा, तुम्ही सर्वांनी, कालपासून मी आलो आहे तेव्हापासून आजपर्यंत, जी स्फुर्ती, उत्साह प्रेम दाखवले आहे, इतका वेळ काढला आहे, मला तुम्हा सर्वांचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले आहे. मी तुम्हा सर्वांचा खूप-खूप आभारी आहे.

माझ्यासोबत बोला -

भारत माता की जय।

भारत माता की जय।

भारत माता की जय।

खूप-खूप धन्यवाद!

 

* * *

नेहा कुलकर्णी/तुषार पवार/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2184150) अभ्यागत कक्ष : 36