पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

अखिल भारतीय पिठासीन अधिकाऱ्यांच्या सम्मेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ द्वारे दिलेला संदेश

Posted On: 27 JAN 2024 4:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 जानेवारी 2024

 

लोकसभा अध्यक्ष श्री ओम बिर्ला जी, राज्यसभेचे उपसभापती श्री हरिवंश राय जी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर, देशातील विभिन्न विधानसभेतून आलेले पिठासीन अधिकारीगण,

बंधू आणि भगिनींनो!

अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेच्या आयोजनानिमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या वेळी ही परिषद आणखीनच खास आहे. कारण ही परिषद 75 व्या प्रजासत्ताक दिनानंतर लगेच होत आहे. 26 जानेवारीलाच आपल्या देशात संविधान लागू झाले होते, म्हणजेच संविधानाला देखील 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मी सर्व देशवासीयांच्या वतीने देखील संविधान सभेच्या सर्व सदस्यांना श्रद्धापूर्वक अभिवादन करत आहे.

मित्रांनो, 

आपल्या संविधान सभेकडून पिठासीन अधिकाऱ्यांच्या या परिषदेने खुप काही शिकण्यासारखे आहे. अनेक विचार, विषय आणि मते असताना एकमत तयार करण्याची जबाबदारी संविधान सभेच्या सदस्यांवर होती. आणि ते या कसोटीवर खरे देखील उतरले. या परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व पिठासीन अधिकाऱ्यांजवळ आणखीन एक संधी आहे की ते पुन्हा एकदा संविधान सभेच्या आदर्शातून प्रेरणा घेतील. आपण सर्वांनी आपल्या कार्यकाळात देखील असे काही खास करण्याचे प्रयत्न करावेत की जे येणाऱ्या पिढ्यांसाठी ठेवा म्हणून जतन केले जाईल. 

मित्रांनो, 

यावेळी या परिषदेत विधिमंडळाची कार्य संस्कृती तसेच समित्यांना अधिक प्रभावी बनवण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचे मला सांगण्यात आले आहे. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आज ज्या प्रकारे देशातील लोक जागरूकतेने प्रत्येक लोकप्रतिनिधीची पारख करत आहेत, त्या कामी या प्रकारची समीक्षा आणि चर्चा खूपच उपयोगी ठरेल. कोणताही लोकप्रतिनिधी सदनात जसे वर्तन करतो, त्यावरूनच त्याच्या देशातील संसदीय प्रणालीचे रूप ठरवले जाते. सदनात लोकप्रतिनिधींचे वर्तन आणि सदनाचे वातावरण कायम सकारात्मक कसे राहील, सदनाची उत्पादकता कशी वाढेल, या संदर्भात या परिषदेतून मिळणाऱ्या ठोस सूचना खूपच सहाय्यकारी ठरतील. 

मित्रांनो, 

एक काळ असा होता जेव्हा सदनात जर कोणत्या सदस्याने मर्यादेचे उल्लंघन केले तर त्याच्यावर नियमानुसार कारवाई केली जात असे, अशावेळी सदनातील इतर वरिष्ठ सदस्य त्याला समजावून सांगत असत, जेणेकरून भविष्यात तो सदस्य अशी चूक पुन्हा करणार नाही आणि सदनाचे वातावरण बिघडणार नाही तसेच सदनाची मर्यादा खंडित होणार नाही. मात्र आज असे दिसून येत आहे की काही राजकीय पक्ष अशाच सदस्यांचे समर्थन करण्यासाठी उभे राहत आहेत आणि त्यांच्या चुकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत आहेत. संसद असो किंवा विधानसभा, ही स्थिती कोणत्याही सदनासाठी योग्य नाही. सदनाची मर्यादा कशी सांभाळली जाईल याबाबत या व्यासपीठावर चर्चा होणे आवश्यक आहे. 

मित्रांनो, 

आज आणखी एका परिवर्तनाचे आपण साक्षीदार बनणार आहोत. पूर्वी जर सदनातील एखाद्या सदस्यावर भ्रष्टाचाराचा आरोप लावला जात असेल तर सार्वजनिक जीवनात सर्वजण त्याच्यापासून दूर जात असत. मात्र, आज आपण न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या भ्रष्टाचाऱ्यांचे सार्वजनिक स्तरावर गुणगान होत असलेले पाहत आहोत. हा कार्यपालिकेचा अवमान आहे, हा न्यायपालिकेचा अवमान आहे, हा भारताच्या महान संविधानाचा देखील अवमान आहे. या विषयावर देखील या परिषदेत होणारी चर्चा आणि त्यातून मिळणाऱ्या ठोस सूचना भविष्यासाठी एक नवा मार्गदर्शक आराखडा तयार करण्यात मदत करतील. 

मित्रांनो, 

स्वातंत्र्याचा अमृत काळात आता देश ज्या उद्दिष्टांना साध्य करत आहे, यात प्रत्येक राज्य सरकार आणि तेथील विधानसभेची खूप मोठी भूमिका आहे. भारताची प्रगती तेव्हाच होऊ शकते जेव्हा आपल्या प्रत्येक राज्याची प्रगती होईल. आणि राज्यांची प्रगती तेव्हाच होईल जेव्हा येथील विधिमंडळ आणि कार्यपालिका एकमेकांच्या सोबतीने आपल्या विकासाची उद्दिष्टे निर्धारित करतील. विधिमंडळे आपल्या राज्याची अशी उद्दिष्टे साध्य करण्यात जितक्या सक्रियतेने सहभागी होतील तितकीच त्या राज्याची प्रगती होईल. म्हणूनच समित्यांचे सशक्तीकरण हा मुद्दा आपल्या राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी देखील महत्त्वाचा आहे. 

मित्रांनो, 

गैर जरुरी कायद्यांचा अंत करणे हा देखील एक प्रमुख विषय आहे. गेल्या दहा वर्षात केंद्र सरकारने दोन हजाराहून अधिक असे कायदे मोडीत काढले आहेत जे आपल्या व्यवस्थेला नुकसान पोहोचवत होते. हे कायदे एक प्रकारे ओझे बनले होते. न्यायव्यवस्थेच्या या सुलभीकरणामुळे सामान्य नागरिकांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि ‘इझ ऑफ लिव्हिंग’ वाढवले आहे. पिठासीन अधिकाऱ्यांच्या रूपात जर तुम्ही अशा कायद्यांचा अभ्यास करून घेतला, त्यांची एक सूची बनवली आणि आपापल्या राज्यातील सरकारांचे ध्यान आकर्षित केले, काही जागरूक विधिमंडळ सदस्यांचे ध्यान आकर्षित केले, असे केले तर कदाचित सर्वजण काम करण्यासाठी हिरीरीने पुढे येतील. त्यांच्या या कृतीचा देशातील नागरिकांच्या जीवनावर खूप मोठा सकारात्मक प्रभाव पडेल. 

मित्रांनो, 

मागच्याच वर्षी संसदेने नारीशक्ती वंदन कायदा मंजूर केल्याचे तुम्ही जाणता. या परिषदेत अशा सूचनांवर देखील चर्चा झाली पाहिजे, ज्यामुळे महिला सशक्तिकरणाचे प्रयत्न आणखी वाढतील, महिलांचे प्रतिनिधित्व आणखी वाढेल. भारतासारख्या तरुणांच्या देशात तुम्हाला समितीमध्ये युवावर्गाची भागीदारी वाढवण्यावर देखील भर दिला पाहिजे. आपल्या तरुण लोकप्रतिनिधींना सदनामध्ये आपले विचार मांडण्याची तसेच नीति निर्माणात सहभाग घेण्याची मोठ्या प्रमाणावर संधी मिळते आणि ती मिळालीच पाहिजे. 

मित्रांनो, 

2021 मध्ये तुमच्याशी चर्चा करताना मी ‘एक राष्ट्र- एक विधिमंडळ व्यासपीठ’ याबाबत बोललो होतो. आपली संसद आणि आपल्या राज्यातील विधिमंडळे आता ‘ई-विधान’ आणि ‘डिजिटल संसद’ या व्यासपीठांच्या माध्यमातून या उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी काम करत आहेत, हे समजल्यावर मला आनंद झाला. मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना मला या कार्यक्रमात आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद देतो. सर्व पिठासीन अधिकाऱ्यांना या परिषदेच्या सफल आयोजनासाठी शुभेच्छा देतो. 

खूप खूप धन्यवाद! 

 

* * *

नेहा कुलकर्णी/श्रद्धा मुखेडकर /दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2183897) Visitor Counter : 5