पंतप्रधान कार्यालय
उत्तराखंड स्थापना दिवसानिमित्त पंतप्रधानांनी केलेले भाषण
प्रविष्टि तिथि:
09 NOV 2024 12:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2024
आज उत्तराखंडच्या रौप्यमहोत्सवी वर्षाची सुरुवात होत आहे. म्हणजेच, उत्तराखंड 25 व्या वर्षात पदार्पण करत आहे. आता आपल्याला उत्तराखंडच्या उज्ज्वल भविष्यासाठी पुढील 25 वर्षांच्या प्रवासाची सुरुवात करायची आहे. यात एक आनंददायी योगायोग आहे: हा प्रवास भारताच्या अमृत काळाशी जुळत आहे, जो राष्ट्रीय विकासाला समर्पित असलेला 25 वर्षांचा महत्त्वपूर्ण कालावधी आहे. म्हणजेच विकसित भारतासाठी विकसित उत्तराखंडचे स्वप्न देश या कालावधीतच पूर्ण होताना पाहील.
उत्तराखंडचे नागरिक येत्या 25 वर्षांच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करून राज्यभर विविध कार्यक्रम आयोजित करत आहेत, याचा मला आनंद वाटतो. या कार्यक्रमांद्वारे उत्तराखंडचा गौरव साजरा केला जाईल आणि विकसित उत्तराखंडचे स्वप्न प्रत्येक रहिवाशाच्या मनात रुजेल. या महत्त्वपूर्ण प्रसंगी आणि या महत्त्वपूर्ण संकल्पासाठी मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. दोन दिवसांपूर्वीच प्रवासी उत्तराखंड संमेलन देखील यशस्वीरित्या पार पडले. मला विश्वास आहे की आपले स्थलांतरित उत्तराखंडवासी राज्याच्या विकास प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावत राहतील.
मित्रांनो,
उत्तराखंडच्या नागरिकांना आपल्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वेगळ्या राज्यासाठी दीर्घ आणि कठोर संघर्ष करावा लागला. अटलजींच्या आदरणीय नेतृत्वाखाली तसेच भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार केंद्रात सत्तेवर आले तेव्हा या संघर्षाला यश मिळाले. उत्तराखंडच्या निर्मितीला प्रेरणा देणारे स्वप्न हळूहळू प्रत्यक्षात येत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. देवभूमी उत्तराखंडने नेहमीच आपल्या सर्वांवर आणि भाजपावर अपार प्रेम आणि आपुलकीचा वर्षाव केला आहे. भाजपादेखील देवभूमीची सेवा करण्याच्या आपल्या समर्पणासह उत्तराखंडच्या अविरत विकासासाठी वचनबद्ध आहे.
मित्रांनो,
काही दिवसांपूर्वीच केदारनाथ मंदिराची कवाडे बंद झाली. काही वर्षांपूर्वी बाबा केदारनाथचे दर्शन घेतल्यानंतर आणि त्यांच्या चरणी बसल्यानंतर मी मोठ्या विश्वासाने म्हटले होते की हे दशक उत्तराखंडचे असेल. या माझ्या श्रद्धेनुसारच राज्याची वागणूक राहिली असून गेल्या काही वर्षांत माझे कथन बरोबर असल्याचे सिद्ध झाले आहे. आज उत्तराखंड विकासाचे नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे आणि तोडत आहे. गेल्या वर्षीच्या शाश्वत विकास ध्येय निर्देशांकात राज्याने प्रथम स्थान मिळवले आहे. व्यवसाय सुलभतेत आणि स्टार्टअप क्रमवारीत आघाडीवर असलेले राज्य म्हणून त्याची ओळख झाली आहे. गेल्या दीड वर्षात उत्तराखंडचा विकास दर 1.25 पटीने वाढला आहे, तर जीएसटी संकलन 14% ने वाढले आहे. 2014 मध्ये उत्तराखंडचे दरडोई उत्पन्न अंदाजे 1.25 लाख रुपये वार्षिक होते, जे आता 2.60 लाख रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे, 2014 मध्ये राज्याचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) सुमारे 1.5 लाख कोटी रुपये होते, जे आता जवळजवळ दुप्पट होऊन सुमारे 3.5 लाख कोटी रुपये झाले आहे. हे आकडे उत्तराखंडच्या तरुणांसाठी नवीन संधी निर्माण करत आहेत आणि राज्याच्या औद्योगिक विकासात प्रगती होत आहे हे दर्शवितात.
सरकारच्या प्रयत्नांमुळे उत्तराखंडमधील लोकांचे, विशेषतः आपल्या माता, बहिणी आणि मुलींचे जीवन सुकर होत आहे. 2014 पूर्वी उत्तराखंडमधील 5% पेक्षा कमी घरांना नळाचे पाणी उपलब्ध होते. आज हा आकडा 96% पेक्षा जास्त झाला आहे आणि आपण पूर्ण व्याप्ती साध्य करण्याच्या मार्गावर आहोत. त्याचप्रमाणे, 2014 पूर्वी राज्यात पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत फक्त 6,000 किमी ग्रामीण रस्ते बांधले गेले होते. आता या रस्त्यांची एकूण लांबी 20,000 किमीपेक्षा जास्त झाली आहे. डोंगरांमध्ये रस्ते बांधताना येणाऱ्या आव्हानांची आणि ती किती आवश्यक आहेत याची मला चांगली जाणीव आहे. लाखो शौचालये बांधून, प्रत्येक घरात वीजपुरवठा करून, उज्ज्वला योजनेअंतर्गत असंख्य कुटुंबांना गॅस जोडणीचे वितरण करून आणि आयुष्मान योजनेद्वारे मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध करून आमचे सरकार सर्व वयोगटातील तसेच सर्व पार्श्वभूमीच्या लोकांसाठी साथीदार म्हणून काम करत आहे.
मित्रांनो,
उत्तराखंडमध्ये आपल्याला डबल-इंजिन सरकारचे फायदे स्पष्टपणे दिसून येत आहेत. केंद्राकडून उत्तराखंडला मिळणारे आर्थिक सहाय्य जवळजवळ दुप्पट झाले आहे. या प्रशासन प्रारूपांतर्गत राज्याला एम्स सॅटेलाईट केंद्राची भेट देण्यात आली आहे. या काळात डेहराडून हे देशातील पहिले ड्रोन ॲप्लिकेशन संशोधन केंद्र देखील बनले आहे. उधम सिंह नगरमध्ये एक स्मार्ट औद्योगिक टाउनशिप स्थापन करण्याची योजना आहे. आज उत्तराखंडमध्ये केंद्र सरकारचे 2 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प राबविले जात आहेत. संचारसंपर्क सुधारण्याचे उद्दिष्ट असलेले प्रकल्प वेगाने प्रगती करत आहेत.
ऋषिकेश-कर्णप्रयाग रेल्वे प्रकल्प 2026 पर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि उत्तराखंडमधील 11 रेल्वे स्थानके अमृत स्थानके म्हणून विकसित केली जात आहेत. डेहराडून-दिल्ली एक्सप्रेसवे पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरांमधील प्रवास फक्त अडीच तासांचा होईल. थोडक्यात, उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासाचे प्रयत्न सुरू आहेत ज्यामुळे या देवभूमीचे वैभव वाढेल आणि पर्वतांपासून होणारे स्थलांतर लक्षणीयरीत्या कमी होईल.
मित्रांनो,
विकासाला चालना देतानाच वारसा जपण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध आहे. देवभूमीच्या समृद्ध संस्कृतीचा सन्मान करत केदारनाथ धामची भव्य आणि आध्यात्मिक पुनर्बांधणी सुरू आहे. बद्रीनाथ धाम येथे विकासाचे काम वेगाने सुरू आहे. मानस खंड मंदिर माला मिशनच्या पहिल्या टप्प्यात 16 प्राचीन मंदिर क्षेत्रांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. सर्वकालिक रस्त्यामुळे चार धाम यात्रा अधिक सुलभ झाली आहे. पर्वतमाला प्रकल्पांतर्गत धार्मिक आणि पर्यटन स्थळांना रोपवेने जोडले जात आहे. मी माना गावाला भेट दिली होती, जिथे मला सीमेवरील आपल्या बंधू आणि भगिनींचा अपार स्नेह अनुभवता आला.
व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाची सुरुवात माना येथूनच करण्यात आली होती, आमच्या सरकारने सीमावर्ती गावांना देशातील शेवटची नव्हे तर पहिली गावे मानली आहेत. आज या उपक्रमांतर्गत उत्तराखंडमधील सुमारे 50 गावे विकसित केली जात आहेत. या प्रयत्नांमुळे उत्तराखंडमध्ये पर्यटनाच्या संधींना नवी गती मिळाली आहे. आणि पर्यटन वाढत असताना राज्यातील तरुणांसाठी अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतात. काही आठवड्यांपूर्वी असे वृत्त आले होते की यावर्षी सुमारे 6 कोटी पर्यटक आणि यात्रेकरूंनी उत्तराखंडला भेट दिली. 2014 पूर्वी चार धाम यात्रेकरूंची विक्रमी संख्या 24 लाख होती; गेल्या वर्षी 54 लाखांहून अधिक यात्रेकरूंनी चार धामची यात्रा केली. याचा फायदा हॉटेल आणि होमस्टे मालकांपासून ते टॅक्सी चालक आणि कापड व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांना झाला आहे. गेल्या काही वर्षांत 5,000 हून अधिक होमस्टेची नोंदणी झाली आहे.
मित्रांनो,
आज उत्तराखंड असे निर्णय घेत आहे आणि धोरणे राबवत आहे जे देशासाठी एक आदर्श निर्माण करत आहेत. सखोल अभ्यासानंतर उत्तराखंडने समान नागरी संहिता लागू केली, ज्याला मी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता म्हणून संबोधतो. संपूर्ण देश आता समान नागरी संहितेची चर्चा करत आहे आणि त्याचे महत्त्व ओळखत आहे. उत्तराखंड सरकारने राज्यातील तरुणांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी फसवणूक विरोधी कायदा देखील मंजूर केला आहे. फसवणूक करणाऱ्या माफियांवर कठोर कारवाई करण्यात आली आहे आणि भरती आता पूर्ण पारदर्शकतेने आणि वेळेवर केली जाते. या क्षेत्रातील उत्तराखंडचे यश इतर राज्यांसाठी एक आदर्श बनत आहे.
मित्रांनो,
आज 9 नोव्हेंबर आहे, ही तारीख 9 या शुभ अंकाने दर्शविली जाते, जो शक्तीचे प्रतीक आहे. या खास दिवशी, मी नऊ विनंत्या करू इच्छितो - उत्तराखंडच्या लोकांना पाच आणि राज्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना आणि यात्रेकरूंना चार.
मित्रांनो,
उत्तराखंडमधील गढवाली, कुमाऊनी आणि जौनसारी या बोलीभाषा खूपच समृद्ध आहेत. त्यांचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. माझी पहिली विनंती अशी आहे की उत्तराखंडमधील लोकांनी या बोलीभाषा भावी पिढ्यांना शिकवाव्यात जेणेकरून राज्याची सांस्कृतिक ओळख टिकून राहील. उत्तराखंड हे निसर्ग आणि पर्यावरणाबद्दलच्या त्याच्या आदरासाठी प्रसिद्ध आहे. ही गौरा देवीची भूमी आहे आणि येथील प्रत्येक महिला माँ नंदाचे रूप आहे. निसर्गाचे रक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणून माझी दुसरी विनंती आहे की "एक पेड माँ के नाम" चळवळीला पाठिंबा द्यावा, मातांच्या नावाने झाडे लावावीत.
ही मोहीम देशभरात वेगाने वाढत आहे आणि उत्तराखंडचा सक्रिय सहभाग आपल्याला हवामान बदलाशी लढण्यास मदत करेल. 'नौल धारा'ची पूजा करण्याची परंपरा कायम ठेवली पाहिजे. माझी तिसरी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी नद्या आणि नौलचे संवर्धन करावे आणि जल स्वच्छतेसाठीच्या उपक्रमांना पाठिंबा द्यावा. माझी चौथी विनंती आहे की तुमच्या गावांना नियमितपणे भेट देऊन, विशेषतः निवृत्तीनंतर, तुमच्या मुळांशी जोडलेले राहा, जेणेकरून हे बंधन मजबूत राहील. माझी पाचवी विनंती आहे की तिवरी घरे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या गावातील घरांचे जतन करा. त्यांना सोडून देऊ नका; त्याऐवजी उत्पन्न मिळवण्यासाठी त्यांचे होमस्टेमध्ये रूपांतर करा.
मित्रांनो,
उत्तराखंडमध्ये पर्यटन वेगाने वाढत आहे, देशभरातील आणि जगभरातील पर्यटक येथे येत आहेत. सर्व पर्यटकांना माझ्या चार विनंत्या आहेत. पहिली, जेव्हा तुम्ही भव्य हिमालयाला भेट देता तेव्हा स्वच्छतेला प्राधान्य द्या आणि एकदा वापरता येणारे प्लास्टिक टाळण्याचे वचन द्या. दुसरी, तुमच्या प्रवास खर्चाच्या किमान 5% रक्कम स्थानिक पातळीवर बनवलेल्या उत्पादनांवर खर्च करून "व्होकल फॉर लोकल" मंत्र स्वीकारा.
तिसरे, पर्वतीय प्रांतात वाहतूक नियमांचे पालन करा, कारण सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. चौथे, धार्मिक स्थळांना भेट देण्यापूर्वी त्यांच्या रीतिरिवाज आणि नियमांबद्दल जाणून घ्या आणि त्यांचे शिष्टाचार पाळा. उत्तराखंडमधील लोकांना या संदर्भात तुम्हाला मदत करण्यास आनंद होईल. उत्तराखंडमधील लोकांसाठी असलेल्या या पाच विनंत्या आणि पर्यटकांसाठी माझी चार आवाहने देवभूमीची ओळख लक्षणीयरीत्या मजबूत करतील आणि तिच्या विकासात योगदान देतील.
मित्रांनो,
आपण उत्तराखंडला जलद प्रगतीच्या मार्गावर पुढे नेले पाहिजे. मला विश्वास आहे की आपले उत्तराखंड राष्ट्राची उद्दिष्टे साध्य करण्यात महत्त्वाची भूमिका बजावत राहील. उत्तराखंडच्या स्थापनेच्या या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त, मी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो. बाबा केदार तुम्हा सर्वांना समृद्धीचे आशीर्वाद देवो. खूप खूप धन्यवाद!
* * *
सुषमा काणे/नंदिनी मथुरे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2183587)
आगंतुक पटल : 14
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam