कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय कोळसा मंत्रालयातर्फे व्यावसायिक कोळसा खाण लिलाव प्रक्रियेच्या 14 व्या फेरीची सुरुवात होणार तसेच कोयला शक्ती आणि क्लँप पोर्टल्सचे कार्य सुरु होणार

प्रविष्टि तिथि: 28 OCT 2025 8:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 ऑक्‍टोबर 2025

 

नवी दिल्ली येथे उद्या, दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी व्यावसायिक कोळसा खाण लिलाव प्रक्रियेची 14 वी फेरी सुरु करण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालय सज्ज झाले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय कोळसा आणि खनन मंत्री जी.किशन रेड्डी उपस्थित राहणार आहेत.

भारतातील कोळसा क्षेत्रात पारदर्शकता, स्पर्धा आणि स्वावलंबन वाढवण्याच्या दृष्टीने या फेरीची सुरुवात हा एक महत्त्वाचा टप्पा समजला जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वर्ष 2020 मध्ये सुरु झालेल्या व्यावसायिक कोळसा खाणी लिलाव प्रक्रियेत कोळसा क्षेत्रातील प्रस्थापित तसेच नव्या अशा दोन्ही उद्योगांनी सातत्याने सशक्त सहभाग दर्शवला आहे. सदर प्रक्रियेने देशांतर्गत कोळसा उत्पादनाला वेग देण्यात आणि देशाच्या वाढत्या ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यात तसेच कोळशाचा विश्वसनीय पद्धतीने पुरवठा होण्याची खात्री करून घेण्यात या प्रक्रियेने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या प्रक्रियेच्या आगामी 14 व्या फेरीत ही प्रगतीशील वाटचाल अशीच सुरु राहणार असून त्यायोगे व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्यासाठी, वैविध्यपूर्ण गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी आणि या उद्योगाच्या अधिक विस्तृत सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, अत्यंत उदारमतवादी अटींवर कोळसा खाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणून, स्पर्धेला खतपाणी घालून आणि देशांतर्गत उद्योगांसाठी कोळशाची उपलब्धता वाढवत कोळसा आयातीवरील अवलंबित्व कमी करुन आणि त्यायोगे आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला पाठबळ देऊन व्यावसायिक लिलाव चौकटीने देशातील कोळसा क्षेत्रात परिवर्तन घडवून आणले आहे.

यावेळी, केंद्रीय कोळसा मंत्रालय प्रथमच लिलाव चौकटीअंतर्गत भूमिगत कोळसा गॅसिफिकेशन (युसीजी)साठी तरतुदी देऊ करत आहे. युसीजी हा भारतातील अत्यंत खोलवर असलेल्या आणि पारंपरिक पद्धतीने खनन करून मिळवणे अशक्य असलेल्या कोळशाच्या साठ्यांच्या साधनसंपत्तीचा वापर करण्यासाठीच्या धोरणात्मक उपक्रमाचे प्रतीक ठरला आहे. आयात केलेला नैसर्गिक वायू आणि कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी करतानाच हे नाविन्यपूर्ण पाऊल, गुंतवणुक, तांत्रिक प्रगती आणि संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मिती यांचे नवे मार्ग खुले करेल अशी अपेक्षा आहे.  

लिलाव प्रक्रियेच्या 14 व्या फेरीद्वारे, अनुभवी खननकर्ते, नवे प्रवेशकर्ते आणि तंत्रज्ञानाधारित उद्योग अशा सर्वांकडून समान सहभागाला आमंत्रण देत, संपूर्णपणे अन्वेषित आणि अंशतः अन्वेषित कोळसा खाणींचा नवा संच लिलावासाठी उपलब्ध करून दिला जाईल.

डिजिटल भारत संकल्पनेला पुढे नेण्यासाठी, याच कार्यक्रमात केंद्रीय कोळसा मंत्रालय क्लँप आणि कोयला शक्ती पोर्टल्स या दोन परिवर्तनशील डिजिटल मंचाच्या कार्याची देखील सुरुवात करणार आहे.

1. क्लँप पोर्टल

कोळसा भूमी अधिग्रहण, व्यवस्थापन आणि रक्कम अदा करण्यासाठीचे (क्लँप) पोर्टल हा कोळसा क्षेत्रातील भूमी अधिग्रहण, नुकसान भरपाई आणि पुनर्वसन तसेच पुनर्स्थापना (आर आणि आर) यांच्याशी संबंधित प्रक्रिया सुलभीकृत आणि डिजिटलीकृत करण्याच्या उद्देशाने विकसित केलेला एकात्मिक डिजिटल मंच आहे. जमीनविषयक नोंदींचा केंद्रीकृत माहितीकोष म्हणून काम करत हे पोर्टल कोळसा क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रमांमध्ये वास्तव वेळी माहितीचे एकत्रीकरण आणि निरीक्षण सुलभ करून देते.जमिनींच्या तपशिलांपासून नुकसानभरपाईच्या रकमा यांची सगळी माहिती अपलोड करुन संपूर्ण कार्याच्या ओघाचे डिजिटलीकरण करून हे पोर्टल प्रक्रियात्मक विलंब कमी करण्यासोबतच आणि माहितीचा अतिरेक टाळण्यासोबतच, पारदर्शकता, जबाबदारी आणि आंतर-संस्थात्मक समन्वय यांच्यात सुधारणा घडवून आणेल.

2. कोयला शक्ती डॅशबोर्ड:

कोयला शक्ती हा एक अग्रगण्य डिजिटल मंच असून सुधारित पारदर्शकता, कार्यक्षमता आणि वास्तव वेळेतील समन्वय यांच्या माध्यमातून कोळसा क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याच्या उद्देशाने त्याची रचना करण्यात आली आहे. खाण ते बाजारपेठ अशा संपूर्ण कोळसा मूल्यसाखळीचे एकत्रीकरण करून हा मंच कोळसा कंपन्या, रेल्वेसेवा, बंदरे आणि साखळीतील अंतिम वापरकर्त्यांमध्ये सुरळीत समन्वय शक्य करून देतो. एक व्यापक निर्णय-मदत प्रणालीच्या रुपात कोयला शक्ती मंच डाटा-प्रेरित प्रशासनाला चालना देत लॉजिस्टिक्सचा सर्वोत्कृष्ट वापर करून देऊन पुरवठा साखळी व्यवस्थापन अधिक बळकट करेल. सरकारने उचललेले हे परिवर्तनकारी पाऊल आत्मनिर्भर भारताच्या तत्वांशी जुळवून घेऊन भारतातील कोळसा क्षेत्राचा डिजिटल कणा म्हणून काम करेल.

भारतातील कोळसा परिसंस्थेच्या भविष्याला आकार देण्यासाठी केंद्रीय कोळसा मंत्रालयाने उद्योग क्षेत्रातील धुरीण, गुंतवणूकदार आणि भागधारकांना या महत्त्वाच्या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे.

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने भारताची वाटचाल प्रगतीपथावर असताना, मंत्रालय देखील सुधारणा करण्यात, व्यवसाय करण्यातील सुलभता वाढवण्यात आणि शाश्वत तसेच जबाबदार कोळसा खनन पर्यावरणाची जोपासना करण्यात स्वतःच्या वचनबद्धतेबाबत खंबीर आहे.

 

* * *

नेहा कुलकर्णी/संजना चिटणीस/दर्शना राणे

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2183546) आगंतुक पटल : 20
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Telugu , English , Urdu , हिन्दी , Bengali , Tamil