युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
माय भारत'ने पार केला दोन कोटी नोंदणीचा टप्पा
माय भारत युवा भारताच्या हृदयाचे स्पंदन असून त्यांना राष्ट्र उभारणीसाठी योगदान देण्याची प्रेरणा देत असल्याचे केंद्रीय मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांचे प्रतिपादन
Posted On:
28 OCT 2025 7:38PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2025
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने युवा सहभागाचा महत्वाकांक्षी उपक्रम असलेल्या 'मेरा युवा भारत' (माय भारत) अंतर्गत 2 कोटींहून अधिक नोंदणी साध्य करत मोठा टप्पा गाठला आहे. हा ऐतिहासिक टप्पा विकसित भारत @2047 च्या दिशेने देशाच्या सामूहिक प्रवासात भारतातील युवा वर्गाचा वाढता उत्साह आणि सहभाग प्रतिबिंबित करतो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय एकता दिनी सुरू केलेला माय भारत हा उपक्रम भारताच्या सर्वात मोठ्या युवा-केंद्रित डिजिटल परिसंस्थांपैकी एक म्हणून वेगाने विकसित झाला आहे. 15 ते 29 वर्षे वयोगटातील तरुणांसाठी तंत्रज्ञानावर आधारित, वन-स्टॉप सोल्यूशन म्हणून डिझाइन केलेले हे व्यासपीठ, भारताच्या ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील तरुण नागरिकांना एकमेकांशी जोडते आणि त्यांना शिकण्यासाठी, सेवा करण्यासाठी आणि राष्ट्र उभारणीच्या विविध संधींमधून नेतृत्व करण्यासाठी सक्षम बनवते.
केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा आणि कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले: “2 कोटी नोंदणीचा टप्पा ओलांडणे हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. यामधून राष्ट्र उभारणीत सहभागी होण्याचा भारतातील तरुणांचा उत्साह, ऊर्जा आणि दृढनिश्चय प्रतिबिंबित होतो. माय भारत, युवा भारताच्या हृदयाचे स्पंदन बनले असून, या ठिकाणी उत्साह आणि संधी, तसेच सेवा आणि उद्दिष्ट एकत्र येतात.”
युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा निखिल खडसे म्हणाल्या, माय भारत आपल्या तरुणांना आकांक्षांना कृतीमध्ये परिवर्तित करण्यासाठी सहाय्य करत आहे. प्रत्येक नवीन नोंदणी, एक प्रबळ, आत्मविश्वासपूर्ण आणि स्वावलंबी राष्ट्र घडवण्यासाठी पुढे आलेल्या युवा भारतीयाचे प्रतिनिधित्व करते."
आपल्या स्थापनेपासूनच ‘माय भारत’ ही युवकांच्या सहभागाची एक ऊर्जामय परिसंस्था म्हणून उदयाला आली आहे. व्हॉलंटियर फॉर भारत आणि एक्सपिरिअन्शियल लर्निंग प्रोग्राम (ईएलपी) यासारख्या उपक्रमांनी तरुणांना स्वतःमध्ये नेतृत्व गुण आणि रोजगारक्षमता यासारखी कौशल्ये विकसित करण्याबरोबरच समाजासाठी अर्थपूर्ण योगदान द्यायला सक्षम बनवले आहे.
या व्यासपीठाची पब्लिक प्रोफाइल आणि सीव्ही बिल्डर यासारखी नवोन्मेशी वैशिष्ट्ये तरुणांना आपली कामगिरी प्रदर्शित करण्यासाठी, समवयस्कांशी संपर्क साधण्यासाठी आणि विकासाच्या नवीन संधी शोधण्यासाठी सक्षम बनवतात. अलीकडेच सादर केलेल्या क्विझ आणि निबंध मॉड्यूल्समुळे भागीदार संस्थांनी आयोजित केलेल्या ज्ञान-आधारित आणि सर्जनशील उपक्रमांमध्ये सहभाग वाढला आहे.
माय भारत हे विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग, विकसित भारत युवा कनेक्ट, विकसित भारत पदयात्रा आणि नशा मुक्त युवा यांसारख्या राष्ट्रीय युवा कार्यक्रमांचे केंद्र बनले असून, यामध्ये लाखो युवा भारतीय उत्साहाने सहभागी झाले आहेत.
14.5 लाखांहून अधिक स्वयंसेवेच्या संधी निर्माण करून, माय भारत 16,000 पेक्षा जास्त युवा क्लब सदस्यांच्या आणि 60,000 पेक्षा जास्त संस्थात्मक भागीदारांच्या विशाल नेटवर्कला जोडते. यात सरकारी विभाग, शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्था यांचा समावेश आहे. रिलायन्स आणि इतर कॉर्पोरेट भागीदारांसारख्या प्रमुख संस्थांच्या सहकार्यामुळे प्रभावी कार्यक्रम आणि बूटकॅम्प तयार करण्यामध्ये सहाय्य झाले असून, ते तरुणांच्या उर्जेला नागरी आणि समाजिक उपक्रमांशी जोडते.
* * *
निलिमा चितळे/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2183504)
Visitor Counter : 7