राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारतीय पोलिस सेवेतील परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 27 OCT 2025 5:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2025

भारतीय पोलिस सेवेतील 77 RR (2024 तुकडी) च्या परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांनी आज (27,ऑक्टोबर 2025) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.

परिवीक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, भारत ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. आपल्या आर्थिक विकासाला शाश्वतता  आणि गती देण्यासाठी आपल्याला मोठ्या  प्रमाणात सार्वजनिक आणि खाजगी गुंतवणूक आवश्यक आहे. कोणत्याही राज्यात किंवा प्रदेशात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था ही एक आवश्यक पूर्वअट आहे यावर त्यांनी भर दिला. गुंतवणूक आणि विकासाला चालना देण्यासाठी आर्थिक प्रोत्साहनांइतकेच प्रभावी कायदा आणि सुव्यवस्था देखील महत्त्वाची  आहे असे त्यांनी सांगितले. तरुण अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली भविष्यासाठी सज्ज असलेले पोलिस दल विकसित भारताच्या उभारणीत  महत्त्वाची भूमिका बजावेल.

राष्ट्रपती म्हणाल्या की तरुण अधिकारी सत्ता आणि अधिकाराच्या पदांवर विराजमान असतात. म्हणून त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की अधिकारासोबत जबाबदारीही येते.  त्यांच्या कृती आणि वर्तनावर नेहमीच जनतेचे बारीक लक्ष असेल असे त्या म्हणाल्या.  त्यांनी काय नैतिक आहे आणि काय हितावह आहे  ते निवडणे  लक्षात ठेवले पाहिजे. आपत्कालीन परिस्थिती हाताळतानाही न्याय्य आणि निष्पक्ष प्रक्रियांचे पालन केले पाहिजे. त्या म्हणाल्या की त्यांना कायदे आणि व्यवस्थांमधून बरेच अधिकार मिळत असले तरी, खरा अधिकार त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक सचोटीने येईल. नैतिक अधिकारामुळे त्यांना सर्वांचा आदर आणि विश्वास मिळेल यावर त्यांनी भर दिला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, पोलीस अधिकाऱ्यांना जवळजवळ नेहमीच गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना सामोरे जावे लागत असते.  याचा त्यांच्यावर असंवेदनशील परिणाम होऊ शकतो आणि त्यांच्यातील सहृदयता  कमी होऊ शकते. त्यांनी अधिकाऱ्यांना आवाहन केले की, एक प्रभावी अधिकारी बनताना त्यांनी स्वतःचे करुणामय मन अबाधित ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.

राष्ट्रपतींनी अधोरेखित केले की तंत्रज्ञानाने कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या  क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणला आहे. सुमारे दहा वर्षांपूर्वी, 'डिजिटल अटक' ही संज्ञा समजणे अशक्य झाले असते. आज, ती नागरिकांसाठी सर्वात भयावह धोक्यांपैकी एक आहे. भारताकडे सर्वात मोठा आणि वेगाने वाढणारा एआय वापरकर्ता-बेस आहे. याचा कायदा आणि सुव्यवस्था राखण्यावरही परिणाम होणार आहे. या तंत्रज्ञानाचा चुकीच्या हेतूने वापर करणाऱ्यांच्या तुलनेत आयपीएस अधिकाऱ्यांनी एआयसह नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात अनेक पावले पुढे असायला हवे असे त्या म्हणाल्या . 

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

निलीमा चितळे/सुषमा काणे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2182961) Visitor Counter : 15