राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या राष्ट्रपतींची पालाय येथील सेंट थॉमस महाविद्यालयाच्या अमृत महोत्सवी समारोप सोहळ्याला उपस्थिती


शिक्षणाचा प्रकाश वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग उजळतो : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

साक्षरता, शिक्षण आणि ज्ञानाच्या सामर्थ्यामुळे केरळ अनेक मानवी विकास निर्देशांकांवर अग्रणी ठरले आहे : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Posted On: 23 OCT 2025 9:57PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर  2025

भारताच्या राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांनी आज केरळमधील पालाय येथील सेंट थॉमस महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव समारोप समारंभास उपस्थिती दर्शविली.

सभेला संबोधित करताना राष्ट्रपतींनी सांगितलं की, शिक्षण हे विकास आणि प्रगतीच्या संधी शोधण्याची किल्ली आहे. सेंट थॉमस महाविद्यालयाची स्थापना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी करण्यात आली होती, हे उद्दिष्ट या संस्थेने मागील 75 वर्षांपासून यशस्वीपणे साध्य केले आहे, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

राष्ट्रपती म्हणाल्या की, सेंट थॉमस महाविद्यालयासारख्या शैक्षणिक संस्था म्हणजे व्यक्तिमत्त्व आणि भविष्य घडविणारी कार्यशाळा आहे.  सर्वांगीण शिक्षण, सामाजिक न्याय, शाश्वतता आणि सर्वसमावेशकतेच्या मूल्यांवर भर दिला असल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले. तसेच, बौद्धिक विकासाबरोबर नैतिकतेचे भान ठेवणारी संस्था म्हणून महाविद्यालयाचे विशेष योगदान त्यांनी अधोरेखित केले.

राष्ट्रपतींनी पुढे सांगितले की, 21वे शतक हे ‘ज्ञानयुग’ म्हणून ओळखले जाते. नवोन्मेषाला चालना देणारे ज्ञान समाजाला पुढे नेते आणि आत्मनिर्भर बनवते. साक्षरता, शिक्षण आणि ज्ञानाच्या सामर्थ्यामुळेच केरळ अनेक मानवी विकास निर्देशांकांवर देशातील अग्रणी राज्यांपैकी एक बनले आहे.

कोट्टायम विषयी बोलताना राष्ट्रपतिनी म्हणाल्या की, या शहराने सामाजिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचे अनेक गौरवशाली अध्याय अनुभवले आहेत. अस्पृश्यता निर्मूलनासाठीचे प्रसिद्ध ‘वैकोम सत्याग्रह’ आंदोलन शंभर वर्षांपूर्वी याच कोट्टायम येथे झाले होते. हे शहर ‘अक्षरनगरी’ म्हणून ओळखले जाते, कारण येथे साक्षरता आणि शिक्षणाचा झरा अखंड वाहत राहिला आहे. ‘साक्षर केरळम’ आंदोलनाला येथील लोकांच्या सक्रिय सहभागामुळे अधिक बळ मिळाले. पी. एन. पनिकर यांच्या वाचनालय चळवळीद्वारे शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उपक्रमामागे त्यांचा साधा पण प्रभावी संदेश होता — ‘वायिचु वलरुगा’ (वाचा आणि विकसित व्हा).

राष्ट्रपतींनी अधोरेखित केले की, शिक्षणाचा प्रकाश हा वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग उजळतो. त्यांनी सेंट थॉमस महाविद्यालयाच्या शिक्षण प्रसारातील प्रयत्नांचे कौतुक केले आणि विश्वास व्यक्त केला की ही संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देत राहील, तसेच 2047 पर्यंत ‘विकसित भारत’ घडविण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल.

राष्ट्रपतींचे भाषण वाचण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


नेहा कुलकर्णी/गजेंद्र देवडा/प्रिती मालंडकर

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2181993) Visitor Counter : 6