संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

'ऑपरेशन सिंदूर'ने भारत प्रत्येक आव्हान स्वीकारण्यासाठी सदैव तत्पर आहे असा संदेश जगाला दिला: नौदल कमांडर परिषदेत संरक्षण मंत्री


भारतीय नौदलाने जो प्रतिबंधात्मक पवित्रा घेतला, ज्यामुळे पाकिस्तानला आपल्या किनाऱ्याजवळ राहण्यास भाग पडले; जगाने नौदलाची परिचालन सज्जता, व्यावसायिक क्षमता आणि सामर्थ्य पाहिले: राजनाथ सिंह

"हिंद महासागर क्षेत्रातील भारतीय नौदलाची उपस्थिती मित्र राष्ट्रांसाठी दिलासादायक आणि प्रदेशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी अस्वस्थता निर्माण करणारी आहे"

"आपले नौदल भारताची आत्मनिर्भरता, नवकल्पना आणि औद्योगिक विकासात अग्रणी बनले आहे"

"सध्याची युद्धे लढण्यासाठी धोरण तयार करण्यावर आणि अत्याधुनिक उपकरणे मिळवण्यावर समान भर दिला पाहिजे"

Posted On: 23 OCT 2025 9:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2025

"ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या इच्छाशक्तीचे आणि क्षमतेचे प्रतीक होते आणि जगाला दिलेला संदेश होता की आम्ही प्रत्येक आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी नेहमीच तयार आहोत," असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 23 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीत नौदल कमांडर परिषदेला संबोधित करताना म्हणाले. भारतीय नौदलाने घेतलेल्या प्रतिबंधात्मक पवित्र्यामुळे पाकिस्तानला बंदरात किंवा आपल्या किनाऱ्याजवळ राहणे भाग पडले, असे म्हणत संरक्षण मंत्र्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले. ते म्हणाले की, या मोहिमेदरम्यान जगाने नौदलाची परिचालन सज्जता, व्यावसायिक क्षमता आणि सामर्थ्य पाहिले. त्यांनी हिंद महासागर क्षेत्रातील (IOR) भारतीय नौदलाच्या उपस्थितीला "मित्र राष्ट्रांसाठी दिलासादायक" आणि "प्रदेशात अस्थिरता निर्माण करू पाहणाऱ्यांसाठी अस्वस्थता" निर्माण करणारी बाब म्हटले.

"हिंद महासागर क्षेत्र हे समकालीन भू-राजकारणाचे केंद्र बनले आहे. ते आता निष्क्रिय राहिलेले नाही; ते स्पर्धा आणि सहकार्याचे क्षेत्र बनले आहे. भारतीय नौदलाने आपल्या बहु-आयामी क्षमतांद्वारे या प्रदेशात नेतृत्वाची भूमिका बजावली आहे. गेल्या सहा महिन्यांत, आपली जहाजे, पाणबुड्या आणि नौदल विमाने अभूतपूर्व प्रमाणात तैनात करण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त, आपल्या नौदलाने अंदाजे 335 व्यापारी जहाजांना सुरक्षित मार्ग प्रदान केला आहे, ते अंदाजे 1.2 दशलक्ष मेट्रिक टन माल आणि 5.6 अब्ज डॉलर्सच्या व्यापारासमान आहे. हा भारत आता जागतिक सागरी अर्थव्यवस्थेत एक विश्वासार्ह आणि सक्षम भागीदार बनल्याचा पुरावाच आहे, असे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षणमंत्र्यांनी आत्मनिर्भर नौदलाला आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि सामर्थ्यवान राष्ट्राचे अधिष्ठान संबोधत भारतीय नौदलाचे त्यांच्या स्वदेशी उपकरणांच्या माध्यमातून क्षमतावृद्धीसाठी आणि ‘आत्मनिर्भर भारत’ चे ध्वजवाहक म्हणून गौरवले.

ते म्हणाले, “गेल्या 10 वर्षांमध्ये नौदलाच्या भांडवली खरेदी करारांपैकी सुमारे 67 टक्के करार भारतीय उद्योगांसोबत झाले आहेत. हे सिद्ध करते की आपण आता आयातीवर पूर्णपणे अवलंबून नाही. आम्ही आपल्या स्वतःच्या प्रतिभेवर, तसेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि स्टार्ट-अप्सच्या क्षमतांवर विश्वास ठेवतो. सध्या भारतीय नौदल 194 नवकल्पना आणि स्वदेशीकरण प्रकल्पांवर काम करत आहे, जे आयडीईएक्स, टीडीएफ, स्प्रिंट  आणि मेक-इन-इंडिया यांसारख्या उपक्रमांतर्गत आहेत. या उपक्रमांमुळे नौदल केवळ तांत्रिकदृष्ट्या आत्मनिर्भर झालेले नाही, तर खाजगी उद्योग आणि तरुण नवप्रवर्तकही या मोहिमेचा भाग बनले आहेत,” असे ही त्यांनी सांगितले.

संरक्षणमंत्र्यांनी अधोरेखित केले की आजचे युद्ध तंत्रज्ञान आणि बुद्धिमत्ता-आधारित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला, स्वदेशी नवोन्मेषाला आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाला अधिक प्राधान्य देत आहे.

ते म्हणाले, “आज सागरी सज्जता केवळ जहाजे किंवा पाणबुड्यांपुरती मर्यादित नाही, ती तंत्रज्ञान-आधारित, नेटवर्क-केंद्रित आणि स्वयंचलित प्रणालींवर आधारित आहे. आपल्याला शत्रूंच्या आधुनिक तंत्रज्ञानापासून स्वतःचे संरक्षण करावे लागेल आणि या क्षेत्रात आपली क्षमता वाढवावी लागेल. आपल्याकडे आवश्यक क्षमता आणि सामर्थ्य आहे. आपण आता आपली उपकरणे आपल्या मातीतच तयार करीत आहोत.”

संरक्षणमंत्र्यांनी या गोष्टीचे कौतुक केले की ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत भारतीय नौदल केवळ संरक्षण उत्पादनातच नव्हे, तर राष्ट्रनिर्माणातही मोठे योगदान देत आहे.

ते म्हणाले, “आज आपले नौदल देशाची आत्मनिर्भरता, नवोन्मेष आणि औद्योगिक विकासाचे अग्रणी बनले आहे. प्रत्येक जहाज आणि पाणबुडी तयार झाल्यानंतर नवी नोकरी निर्माण होते; प्रत्येक इंजिनसोबत नवी कौशल्ये विकसित होतात; आणि प्रत्येक स्वदेशी प्रणालीमुळे भारताचे परावलंबित्व कमी होते. प्रोजेक्ट 17A अंतर्गत असलेल्या जहाजांमध्ये 75 टक्क्यांहून अधिक स्वदेशी घटक आहेत, ज्यामुळे एमडीएल आणि जीआरएसई सारख्या शिपयार्डमध्ये सुमारे 1.27 लाख रोजगार निर्माण झाले आहेत. हे सिद्ध करते की प्रत्येक नौदल प्रकल्प केवळ सुरक्षेशीच नव्हे, तर अर्थव्यवस्था आणि युवक रोजगाराशीही थेट जोडलेला आहे.” लघु, मध्यम आणि सूक्ष्म उद्योगांसोबत तसेच लहान गोदींसोबतच्या भारतीय नौदलाच्या सहकार्य भागीदाऱ्यांमध्ये झालेल्या महत्त्वाच्या वाढीचा दखलपूर्ण उल्लेख त्यांनी आपल्या संबोधनात केला. अलीकडेच व्होकल फॉर लोकल या दृष्टिकोनाअंतर्गत सरकाने मोठे पाऊल टाकले असून, यार्ड क्राफ्ट्सच्या बांधकामांसाठी सुमारे 315 कोटी रुपये किंमतीची कंत्राटे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. विमान वाहतूक क्षेत्रात नौदलाने आत्मनिर्भरतेसाठी अनेक नवोन्मेष साकारले असल्याचेही त्यांनी सांगितले. बहुभूमिकाधारित सागरी टेहळणी विमाने, बहुउपयोगी हेलिकॉप्टर, ट्विन-इंजिन डेक फायटर्स आणि नौदल जहाजांवरील  मानवरहित हवाई प्रणाली यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाला नवी दिशा मिळाली असल्याचे ते म्हणाळे. यामुळे महत्त्वाच्या क्षमतांच्या बाबतीतील कमतरता भरून निघत आहे, आणि त्यासोबतच आत्मनिर्भरतेलाही बळ मिळत आहे असे ते म्हणाले.

आधुनिक काळातील युद्धांचा सामना करण्यासाठी धोरण तयार करण्याइतकेच प्राधान्य अत्याधुनिक उपकरणांचा अंतर्भाव करण्यालाही दिला गेला पाहिजे ही बाब त्यांनी अधोरेखित केली. कोणतेही देश केवळ उपकरणे आणि युद्धनौकांच्या आधारे  युद्ध जिंकू शकत नसल्याचे त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानाचा आपल्याला फायदा होतो, पण त्याचवेळी भौगोलिक परिस्थिती, व्यूहभेद, अचूक वेळ आणि मानवी निर्णय हे घटक कायम धोरणात्मक आराखड्यात विचारात घेतले पाहिजेत असे त्यांनी सांगितले. ताफ्याचा आकार आणि आधुनिकीकरण महत्त्वाचे आहेच, परंतु उपलब्ध व्यासपीठांचा धोरणात्मक  उपयोग करून घेणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. नियोजन करताना चपळता आणि परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता आवश्यक असल्याचे मत त्यांनी मांडले.

अत्यंत वेगाने बदलत असलेल्या आजच्या जगाशी सुसंगत राहण्याकरता, नौदलाचे धोरण आणि विचारसरणी प्रगत असण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीनेच आपण क्षमता, लोक आणि भागीदारी या तीन क्षेत्रांमध्ये एकत्रितपणे काम केले पाहिजे असे ते म्हणाले. याअंतर्गतची क्षमता म्हणजे तंत्रज्ञान आणि सामर्थ्य, तर लोक म्हणजे खलाशी आणि त्यांचे कुटुंब, आणि भागीदारी म्हणजे उद्योग, शिक्षण क्षेत्र तसेच आंतरराष्ट्रीय सहकार्य हे घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जेव्हा या तिन्ही बाबी एकत्र येतील, त्यावेळी आपले नौदल आणखी अधिक विश्वासार्ह आणि बलशाली शक्ती म्हणून उदयाला येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश के. त्रिपाठी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. समीर व्ही. कामत आणि नौदल कमांडर देखील उपस्थित होते.

राष्ट्रीय नेतृत्व आणि नोकरशाहीसोबत गहिरा संवाद घडवून आणण्याचे व्यासपीठ म्हणून या परिषदेचे आयोजन केले जाते. या परिषदेच्या माध्यमातून भारतीय नौदलाला सध्याच्या भूराजकीय वातावरणातील बहुआयामी आव्हानांवर मात करण्याकरता योग्य दिशा आणि दृष्टीकोनही मिळतो. अशा उपक्रमांच्या माध्यमातून नौदलाचे सर्वोच्च नेतृत्व पश्चिम आणि पूर्व समुद्र किनाऱ्यावरील आपली परिचालन सज्जता, मेक इन इंडिया योजनेंतर्गत स्वदेशीकरण आणि नवोन्मेषाला चालना देणे, सरकारच्या महासागर या दृष्टिकोनाला पुढे नेणे तसेच हिंदी महासागर क्षेत्र आणि हिंद प्रशांत क्षेत्रात पसंतीचा सुरक्षा भागीदार म्हणून भारतीय नौदलाला प्रोत्साहन देण्यासंबंधीच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचे काम करत आहे.

 
शैलेश पाटील/‍निखिलेश चित्रे/गजेंद्र देवडा/तुषार पवार/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 


(Release ID: 2181991) Visitor Counter : 8