नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन: लोगो डिझाइन स्पर्धेसाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे देशातल्या सर्जनशीलतेला आवाहन; विजेत्याला एक लाख रुपयांचे बक्षीस!


लोगोतून भारताची हरित हायड्रोजन महत्त्वाकांक्षा, आत्मनिर्भरता आणि बहु-क्षेत्रीय क्षमता व्यक्त व्हावी; प्रवेशिका 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत खुल्या

Posted On: 23 OCT 2025 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर  2025

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनचा उद्देश हरित हायड्रोजन परिसंस्था प्रस्थापित करण्यासाठी एक सर्वसमावेशक कृती योजना प्रदान करणे आणि या उदयोन्मुख क्षेत्रातील संधी आणि आव्हानांना पद्धतशीर प्रतिसाद देणे हा आहे. या मिशनमुळे अर्थव्यवस्थेचे लक्षणीय अ-कार्बनीकरण होईल, जीवाश्म इंधनाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि भारत हरित हायड्रोजनमध्ये तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे नेतृत्व स्वीकारण्यास सक्षम होईल.”

हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आणि भारतीय व जागतिक दृष्टिकोनातून मिशनचे महत्त्व ओळखून, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने एक सर्वसमावेशक दृष्टिकोन स्वीकारला आहे. मंत्रालयाने वयोमर्यादा न ठेवता भारतीय नागरिकांना राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या लोगो डिझाइन स्पर्धेत सहभागी होऊन "भारतला हरित हायड्रोजन आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हजचे उत्पादन, वापर आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवणे" या मिशनच्या उद्दिष्टांशी त्यांच्या आकांक्षांचा मेळ घालण्याचे आवाहन केले आहे.

डिझाइनमधून मिशनचा गाभा व्यक्त झाला पाहिजे. तो म्हणजे हरित हायड्रोजनचे उत्पादन, वापर आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनण्याची आपली महत्त्वाकांक्षा, तसेच लोगोमधून या क्षेत्राचे उदयोन्मुख स्वरूप, आत्मनिर्भरता, गुंतवणुकीच्या संधी आणि पोलाद, वाहतूक, खते, शिपिंग, पेट्रोकेमिकल्स यासह अनेक क्षेत्रांमध्ये हरित हायड्रोजनची उपयुक्तता दिसली पाहिजे.

स्पर्धेचे तपशील आणि बक्षिसे

सहभागींनी लोगो फक्त JPEG किंवा PNG किंवा PDF स्वरूपात अपलोड करावा. लोगो किमान 300 DPI सह उच्च रिझोल्यूशनमध्ये असावा. लोगोचा आकार 15 सेंमी X 20 सेंमी असावा. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची अंतर्गत समिती सर्जनशीलता, मौलिकता, रचना, तांत्रिक उत्कृष्टता, साधेपणा, कलात्मक योग्यता, दृष्य परिणाम आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनशी त्याची सुसंगतता या घटकांच्या आधारे प्रवेशिकांचे परीक्षण करेल.

विजेत्या प्रवेशिकेला 1,00,000/- रुपयांचे रोख बक्षीस आणि राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशनच्या मिशन डायरेक्टरकडून ओळख प्रमाणपत्र दिले जाईल. 10 उपविजेत्यांना प्रत्येकी 5000 रूपयांचे बक्षीस दिले जाईल. विजेत्याला नवी दिल्लीला येण्या-जाण्यासाठीच्या देशांतर्गत इकॉनॉमी क्लास विमान प्रवासाचा खर्च परतावा दिला जाईल.

प्रवेशिका सादर करण्याची अंतिम तारीख 05-नोव्हेंबर-2025 आहे. सहभागी https://www.mygov.in/task/logo-design-contest-national-green-hydrogen-mission/ या लिंकवर थेट लॉग इन करून नोंदणी करू शकतील आणि आपल्या प्रवेशिका सादर करू शकतील.


शैलेश पाटील/‍निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2181961) Visitor Counter : 6