वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
आर्थिक आणि व्यापारी भागीदारी मजबूत करण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल जर्मनीला भेट देणार
Posted On:
22 OCT 2025 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर 2025
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल 23 ऑक्टोबर 2025 पासून बर्लिन (जर्मनी) येथे अधिकृत भेटीवर जाणार आहेत. ही भेट भारताचे जर्मनीशी असलेले संबंध वृद्धिंगत करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. 2025 हे वर्ष भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीची 25 वर्ष साजरे करणारे वर्ष असल्याने ही भेट द्विपक्षीय संबंधांची खोली, लवचिकता आणि दीर्घकालीन ताकद अधोरेखित करण्याच्या दृष्टीने विशेष महत्वाची आहे.
मंत्री गोयल यांच्या बैठका दोन्ही देशांमधील वरिष्ठ सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील आघाडीचे उद्योजक आणि व्यावसायिक संघटनांच्या उच्च पदस्थ अश्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आखण्यात आल्या आहेत.
या भेटीदरम्यान केंद्रीय मंत्री जर्मन आर्थिक व्यवहार आणि ऊर्जा मंत्री कॅथरीना रीशे आणि जर्मनीच्या जी7 आणि जी20 शेर्पा यांच्या संघीय चॅन्सेलरी येथील आर्थिक आणि वित्तीय धोरण सल्लागार डॉ. लेविन होले यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय बैठका घेतील. बैठकीदरम्यान भारत-जर्मन आर्थिक गतिमान भागीदारी अधिक मजबूत करणे आणि व्यापार आणि गुंतवणूक सहकार्य वाढविण्यासाठी नवीन मार्ग शोधणे यावर चर्चा होईल.
बर्लिन भेटीचा एक भाग म्हणून, गोयल तिसऱ्या बर्लिन ग्लोबल डायलॉग (BGD) मध्ये वक्ते म्हणून सहभागी होतील. ही एक वार्षिक शिखर परिषद आहे. या अंतर्गत जागतिक अर्थव्यवस्थेला आकार देणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी व्यवसाय, सरकार आणि शैक्षणिक क्षेत्रातील नेते एकत्र येतात.
या भेटीचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आघाडीच्या जर्मन कंपन्यांच्या सीईओंसोबत वैयक्तिक बैठकांची विशेष मालिका असणार आहे. या संवादांमुळे सहकार्य, गुंतवणूक सुलभ करण्यासाठी आणि विशेषतः शाश्वतता, नवोन्मेष आणि प्रगत उत्पादनाशी संबंधित क्षेत्रांमध्ये, व्यवसाय-ते-व्यवसाय संबंध मजबूत करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होईल.
ही भेट भारत आणि त्याच्या युरोपीय भागीदारांमधील धोरणात्मक प्राधान्यांच्या सखोल संरेखनाचे प्रतिबिंबित करते. या भेटीचा उद्देश उच्च-स्तरीय वचनबद्धतेचे रूपांतर शाश्वत आर्थिक भागीदारीमध्ये करणे हे आहे, जेणेकरून नवोन्मेष, लवचिकता आणि सामायिक वाढीला चालना देता येऊ शकेल.
* * *
सुषमा काणे/हेमांगी कुलकर्णी/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2181576)
Visitor Counter : 15