रेल्वे मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध प्रत्यक्ष व्यवस्थेचा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घेतला आढावा
                    
                    
                        
प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर घरी पोहोचवण्यासाठी 12 लाख रेल्वे कर्मचारी अहोरात्र कार्यरतः अश्विनी वैष्णव
गेल्या 20 दिवसांत, 4211 विशेष रेल्वेगाड्यांमुळे 1 कोटीहून अधिक प्रवाशांना सेवा प्रदान, सणासुदीच्या काळात गर्दी हाताळण्यासाठी 7800हून अधिक गाड्या चालवल्या जातील
एकट्या दिल्ली परिसरातून दैनंदिन सरासरी 4.25 लाख प्रवाशांसाठी सुविधा पुरवल्या जातात
रेल भवन आणि सर्व क्षेत्र आणि मंडलांमध्ये समर्पित केंद्रीकृत कक्ष, सुरळीत व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी प्रवाशांच्या प्रत्यक्ष वेळेच्या आधारावर निरीक्षण करणे
सणासुदीच्या गर्दीत प्रवाशांना सेवा देताना भारतीय रेल्वेकडून मानवी स्पर्शाचा अंतर्भाव. अखत्यारीतील क्षेत्रांव्यतिरिक्त, प्रवाशांना मोबाईल अनारक्षित तिकीट सुविधेसह अतिरिक्त तिकीट मंच, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छ स्वच्छतागृहे पुरवली जातात
सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वेच्या सुधारित व्यवस्थेचे प्रवाशांकडून कौतुक; अनारक्षित डब्यांमधूनही प्रवास आरामदायी झाल्याचे वृत्त
                    
                
                
                    Posted On:
                21 OCT 2025 8:21PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
 
केंद्रीय रेल्वेमंत्री आणि माहिती प्रसारण मंत्री आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट दिली आणि सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रत्यक्ष देऊ केलेल्या सुविधांचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, प्रवाशांना सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवण्यासाठी 12 लाख रेल्वे कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत. त्याशिवाय 1 कोटीहून अधिक प्रवाशांना याआधीच सेवा देण्यात आली आहे.

दिल्ली परिसरातून दररोज सरासरी 4.25 लाख प्रवासी बाहेर प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुरत, मुंबई, कोईम्बतूर, हैदराबाद आणि बंगळुरू सारख्या प्रमुख स्थानकांवर सातत्याने देखरेख ठेवली जात आहे आणि धावत्या रेल्वेगाड्यांचेही बारकाईने निरीक्षण केले जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांतून चोविस तास निगराणी ठेवणारे स्वतःचे केंद्रीकृत कक्ष प्रत्येक विभाग आणि क्षेत्रामध्ये आहेत.
केंद्रीय मंत्र्यांनी, संपूर्ण स्थानकाचे निरीक्षण करणाऱ्या फलाट क्रमांक 1 वरील रेल्वे सुरक्षा दलाच्या नियंत्रण कक्षालाही भेट दिली आणि प्रवाशांची संवाद साधून प्रत्यक्ष पुरवल्या जाणाऱ्या व्यवस्थेचा आढावा घेतला.  त्यांनी प्रथमोपचार कक्षाला भेट दिली आणि कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक 16वर पाटण्याला जाणाऱ्या अमृत भारत एक्स्प्रेसच्या प्रवाशांशी त्यांनी संवाद साधला. प्रवाशांनी भारतीय रेल्वेने त्यांच्यासाठी केलेल्या व्यवस्थेचे कौतुक केले आणि टाळ्या वाजवल्या. प्रवाशांच्या सोयीसाठी असलेल्या अखत्यारीतील क्षेत्राला ( प्रवासी सुविधा केंद्राला) देखील भेट दिली.

रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार, उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक अशोक कुमार वर्मा आणि इतर वरिष्ठ अधिकारीही निरीक्षणादरम्यान उपस्थित होते.
माननीय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली रेल्वे स्थानकाला भेट देण्यापूर्वी रेल भवन वॉर रूम/कार्य कक्षातून विशेष गाड्यांविषयी माहिती घेतली. प्रवाशांची सोय सुनिश्चित करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचनाही देण्यात आल्या.
सणासुदीच्या काळात प्रवासाच्या मागणीत झालेली वाढ पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे 12,011 विशेष गाड्या चालवत आहे- 2024मधील 7,724 गाड्यांच्या तुलनेत ही वाढ लक्षणीय आहे.
नियमित रेल्वे सेवांव्यतिरिक्त, भारतीय रेल्वेने 1 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर 2025 दरम्यान 4,211 विशेष रेल्वेगाड्या यशस्वीरित्या चालवल्या आहेत ज्यामुळे 1 कोटींहून अधिक प्रवाशांची सोय झाली. दिवाळी आणि छटपूजेसाठी प्रवाशांच्या संख्येतील अपेक्षित वाढ लक्षात घेता, भारतीय रेल्वे येत्या काही दिवसांमध्ये सर्वसाधारणपणे 7800 आणखी विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखत आहे.

1 ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान, 1 कोटींहून अधिक प्रवाश्यांना सेवा पुरवण्यात आली आहे. नवी दिल्ली परिसरातून, 16 ते 20 ऑक्टोबर 2025 दरम्यान 21.04 लाख प्रवाशांना सुविधा देण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत 19.71 लाख प्रवाशांच्या तुलनेत 1.33 लाख प्रवाशांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशभरात प्रवाशांच्या सुविधांना बळकटी
प्रवाशांची आराम आणि सुविधा वाढवण्यासाठी भारतीय रेल्वे व्यापक प्रयत्न करत आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर, सुरळीत प्रवासाचा अनुभव मिळण्यासाठी अखत्यारीतील क्षेत्र (प्रवासी सुविधा केंद्र), अतिरिक्त तिकीट खिडक्या, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि स्वच्छ स्वच्छतागृहांची उपलब्धता करून देत प्रवासी व्यवस्थापन सुलभ करण्यात आलं आहे.
भारतीय रेल्वेने सणासुदीच्या काळात, प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे होणाऱ्या गर्दीचे निरीक्षण करण्यासाठी कार्य कक्ष (वॉर रूम) स्थापन केली आहे. या कमांड केंद्रामुळे प्रत्यक्ष काळातील देखऱेख करणे शक्य होते आणि अधिकाऱ्यांना गर्दी, प्रवाशांच्या तक्रारी आणि संभाव्य घटनांचे निराकरण त्वरीत करण्यात परवानगी देणे शक्य होते. केंद्रीय रेल्वे, माहिती आणि प्रसारण तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली लगेचच हा उपक्रम सुरू करण्यात आला. रेल्वे संपर्कजाळ्यात सुरक्षा आणि देखरेख बळकट करणे हा त्याचा उद्देश आहे.
वैष्णव आणि रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार वेळोवेळी रेल भवनच्या कार्य कक्षाला (वॉर रूम) भेट देऊन प्रवाशांच्या हालचालींचा आढावा घेतात आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश देतात. सद्यस्थितीत, कार्य कक्ष (वॉर रूम) संपूर्ण भारतीय रेल्वे जाळ्याचे निरीक्षण करणारी प्रभावी प्रणाली ठरते आहे. रेल्वे बोर्ड, प्रादेशिक आणि विभागीय स्तरावर 80 हून अधिक कार्य कक्ष (वॉर रूम) सक्रीय आहे.

त्याचबरोबर, नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर, प्रवाशांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी सुरळीत कामकाज सुनिश्चित करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी वाढत्या सुविधा सुनिश्चित करण्यासाठी एक लहान नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
जयपूर स्थानकावर, प्रवाशांनी विशेष मोबाईल अनारक्षित तिकीट प्रणालीद्वारे थेट अखत्यारीतील क्षेत्रामध्ये तिकीटे दिली जातात. त्यामुळे प्रवाशांना सोयीस्कर आणि समाधानकारक अनुभव येतोच शिवाय स्टेशनवर सुव्यवस्था राखण्यास मदत होते.
प्रवाशांची वाढत्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी पश्चिम रेल्वेचा वडोदरा विभागही सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. 1 ऑक्टोबरपासून 30 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी त्यांच्या उत्तर प्रदेश, बिहार आणि पश्चिम बंगाल आदी ठिकाणच्या गंतव्यस्थानी वडोदरा विभागाद्वारे चालवल्या जाणाऱ्या नियमित आणि 5 विशेष गाड्यांद्वारे प्रवास केला आहे. या विभागाकडू पाच उत्सव विशेष गाड्या चालवत आहेत, ज्याच्या 70हून अधिक फेऱ्या आधीच झाल्या आहेत
प्रवाशांच्या सोयीसाठी, गर्दीच्या प्रवासात त्यांना आराम मिळावा यासाठी आज उधना रेल्वे स्थानकावर 5000 सीलबंद पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या.
तंजावूर जंक्शन येथील अलीकडेच घडलेले उदाहरण पहा, तिथे वृद्ध प्रवाशांना स्वच्छ सुविधांसह वातानुकुलित निवांत खोल्यांचा लाभ घेता आला. एवढेच नव्हे तर आडनिड्या वेळेतही विश्रांती आणि सुविधा मिळाल्या. भारतीय रेल्वेने आपल्या उत्तम प्रवासी अनुभवाच्या माध्यमातून विचारशील, सेवा केंद्रित सुविधा प्रदान करण्यावर भर दिला आहे.
अयोग्य माहितीला तोंड देणे आणि पारदर्शकता सुनिश्चित करणे
सणासुदीच्या काळात, प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सुसंघटित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी भारतीय रेल्वे सतर्क राहून काम करते आहे तसेच समाज माध्यम मंचावरून प्रसृत होणाऱ्या चुकीच्या माहितीला आळा घालण्यासाठी सक्रिय उपाययोजनही करत आहे.
काही समाज माध्यम खात्यांवरून प्रवाशांमध्ये अनावश्यक भीती निर्माण करण्यासाठी गर्दी आणि प्रवाशांची गैरसोय दर्शविणारे जुने फोटो आणि ध्वनिचित्रफिती प्रसारित केले जात आहेत. यातील बरीचशी दृश्य संदर्भाशिवाय सामाईक केली जात असल्याने ती दृश्ये अलीकडील असल्याचा समज होऊन दिशाभूल होत आहेत. अधिकृत झोनल खाती सक्रीयतेने स्पष्टीकरण जारी करत आहेत आणि अशा दिशाभूल करणाऱ्या आशयाला जुने आणि चुकीचे म्हणून चिन्हांकित करत आहेत.
गेल्या पाच दिवसांमध्ये, 40 हून अधिक दिशाभूल करणाऱ्या प्रकरणांची ओळख पटवून ते निर्दशनास आणून देण्यात आले आहेत. चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर प्राथमिक माहिती अहवाल तक्रार नोंदवण्यात आली आहे. प्रवाशांची सुरक्षितता आणि जनतेचा विश्वास अबाधित राहावा यासाठी सरकार तातडीने आणि ठोस कारवाई केली जात आहे.
अभूतपूर्व उत्सवी कार्यचालन
या वर्षीच्या सुधारित व्यवस्थेबद्दल प्रवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे. अनेकांनी आपले अनुभव सांगताना, यावेळी व्यवस्था पूर्वीपेक्षा खूप चांगली असल्याचे म्हटले आहे आणि संपूर्ण प्रवास सुरळीत आणि आरामशीर झाल्याचे म्हटले आहे.
प्रयागराज, वलसाड, विशाखापट्टणम् आणि संबलपूर स्थानकांवरील प्रवाशांनी भारतीय रेल्वेने केलेल्या व्यवस्थेविषयी समाधान व्यक्त तसंच अगदी अनारक्षित डब्यांमध्ये मिळालेल्या सुधारित सुविधा आणि व्यवस्थापनाचे कौतुक केले.
सुरळीत प्रवास सुनिश्चित करणारा समर्पित कर्मचारीवर्ग
भारतीय रेल्वेने आयुषमान प्रकल्पांतर्गत मैसूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्र. 2 वर लेडीज सर्कल इंडियाच्या सहयोगाने पहिल्या नर्सिंग खोलीचे अनावरण केले. माता आणि नवजात बाळांसाठी शांत, स्वच्छ आणि सुरक्षित स्थान प्रदान करणारी ही समर्पित सुविधा असून, प्रवासादरम्यान गोपनीय, प्रतिष्ठा आणि आराम या गोष्टी सुनिश्चित करते. वातानुकुलित, उत्तम उजेड, स्वच्छतेचे उच्च निकष राखलेल्या या नर्सिंग खोल्या, दीर्घ थांबा, रात्री उशिराच्या गाड्या किंवा सणासुदीच्या गर्दीच्या काळात मातांच्या गरजा पूर्ण करू शकतात.
कन्याकुमारी-दिब्रुगड विवेक एक्स्प्रेस सुटण्याच्या काही मिनिटांआधी, पल्लकड स्थानकावर (दक्षिण रेल्वे)फलाटावर एका 24 वर्षीय प्रवाशाच्या जबड्यावर विभागीय वैद्यकीय अधिकारी डॉ. जिथिन पी. एस. यांनी उपचार करून, वैद्यकीय तयारीचे आणि समर्पणाचे उल्लेखनीय प्रदर्शन केले. हाताने जबडा शितील करण्याची आपत्कालीन प्रक्रिया अचूक पार पाडण्यात आली त्यामुळे प्रवासी ताबडतोब बरा झाला आणि त्याला विनाविलंब आपला प्रवास सुरू ठेवता आला. समाज माध्यमांवरून या जलद प्रतिसाद हस्तक्षेपाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. त्यामध्ये भारतीय रेल्वेची 24 तासांची वैद्यकीय तयारी घटनास्थळी उपस्थित प्रशिक्षित व्यावसायिक आणि प्रमुख स्थानकांवरील आपत्कालीन काळजी घेण्याच्या पायाभूत सुविधा अधोरेखित करण्यात आल्या होत्या.
भारतीय रेल्वे प्रवाशांची सुरक्षितता, पारदर्शकता आणि सेवा उत्कृष्टता यासाठी असणाऱ्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरूच्चार करते. त्याचबरोबर प्रवाशांनी प्रवासाशी निगडीत अद्ययावत माहितीसाठी केवळ अधिकृत वाहिनी आणि सत्यापित माहितीवर अवलंबून राहाण्याचे आवाहन करते.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
* * *
नेहा कुलकर्णी/विजयालक्ष्मी साळवे-साने/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai   
 /PIBMumbai   
 /pibmumbai  
pibmumbai[at]gmail[dot]com  
/PIBMumbai   
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 2181488)
                Visitor Counter : 9