संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदल कमांडर्स परिषदेच्या दुसऱ्या आवृत्तीला 22 ऑक्टोबर 2025 पासून सुरुवात
प्रविष्टि तिथि:
21 OCT 2025 8:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2025
भारतीय नौदलाच्या द्विवार्षिक कमांडर परिषद 2025 च्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन 22 ते 24 ऑक्टोबर 2025 या तीन दिवसांच्या कालावधीत दिल्लीत केले जाणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर' आणि नौदलाचे वेगवान परिचालन आणि लढाऊ सज्जतेच्या पार्श्वभुमीवर या परिषदेचे महत्त्व अधिक असल्याचे मानले जाते. लढाऊ क्षमता, आंतरकार्यचालन आणि भारतीय लष्कर, भारतीय वायू दल आणि भारतीय तटरक्षक दल यांच्यासमवेत संयुक्त मोहिमा आदींमध्ये वृद्धी करणे यावर लक्ष केंद्रित करण्यावर नौदलाचा भर असून, ही भूमिका, हिंदी महासागर तसेच हिंद प्रशांत क्षेत्रातील संभाव्य धोके रोखणे आणि सागरी शौर्य प्रदर्शित करण्याचे त्यांचे संकल्प अधोरेखित करते. या परिषदेदरम्यान, माननीय संरक्षण मंत्री आणि मंत्रिमंडळ सचिव नौदल कमांडर्सना संबोधित करतील आणि विकसित भारत 2047 च्या लक्ष्याविषयी, तसेच व्यापक राष्ट्रीय हितसंबंधांविषयी दृष्टीकोन विशद करतील. ही परिषद राष्ट्रीय नेतृत्व आणि नोकरशाही यांच्याशी जवळून संवाद साधण्यासाठी आणि सध्याच्या भू-सामरिक वातावरणात बहुआयामी आव्हाने कमी करण्याचा नौदलाचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करते.
संरक्षण दल प्रमुख आणि हवाई दल प्रमुख देखील या परिषदेला संबोधित करतील, तसेच वरिष्ठ नौदल नेतृत्वाशी चर्चादेखील यात अंतर्भूत असतील. मोहिमांचे संयुक्त नियोजन आणि अंमलबजावणी यामध्ये समन्वय साधणे तसेच क्षमतावृद्धीसाठी स्रोतांचा वापर या उद्देशानेही संवाद साधला जाईल.
कमांडर इन चीफ सह नौदल प्रमुख, आपल्या प्राथमिक जबाबदारीचे क्षेत्र असलेल्या हिंद महासागर प्रदेशातील एकंदर सुरक्षा परिस्थितीशी निगडीत योजनांचा आढावा घेतील आणि मूल्यांकन करतील. सध्याच्या काळातील विविध मोहिमांसाठी आवश्यक नौदल कार्यचालन, प्रशिक्षण आणि आवश्यक स्रोतांची उपलब्धता यांच्याशी निगडीत बाबीदेखील चर्चेचा मुख्य विषय असतील.
भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन सक्षमीकरण, सुधारित मोहीम दळणवळण आणि डिजीटायझेशन यांचा समावेश असलेल्या नौदलाच्या पथदर्शी आराखड्यावर कमांडर चर्चा करतील.
विश्वसनीय आणि सुरक्षित वातावरणात लढाऊ उपाय आणि शाश्वत सातत्यपूर्ण कार्यचालनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, बिग डेटा आणि मशीन लर्निंगसारख्या घातक तंत्रज्ञानाचा आढावा घेण्यासाठी चर्चा करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
व्यापक पातळीवर, नौदलाचे सर्वोच्च नेतृत्व पश्चिम आणि पूर्व समुद्रकिनाऱ्यांवरील त्यांच्या कार्यचालन तयारीचा आढावा घेतील, मेक इन इंडिया योजनेअंतर्गत स्वदेशीकरण आणि नवोन्मेषाला चालना देतील, भारत सरकारच्या महासागर मोहिमेच्या (सर्व प्रदेशांच्या संरक्षणासाठी परस्पर आणि समग्र प्रगती) दृष्टीकोनाला पुढे नेतील आणि हिंद महासागर आणि हिंद-प्रशांत क्षेत्रामध्ये सुरक्षा भागीदार म्हणून भारतीय नौदलाला प्रोत्साहन देतील.
माधुरी पांगे/विजयालक्ष्मी साळवी-साने/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 2181362)
आगंतुक पटल : 27