महिला आणि बालविकास मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डेहराडूनमध्ये आठव्या राष्ट्रीय पोषण मास 2025 चा समारोप: देशभरात पोषण आणि सक्षमीकरणाचा उत्सव साजरा

Posted On: 17 OCT 2025 9:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 ऑक्टोबर  2025

चांगले पोषण विकास, संधी आणि लवचिकता वाढवते. लाखो अंगणवाडी सेविका, लोक समुदायाचे  सदस्य आणि कुटुंबांच्या सक्रीय सहभागासह, आठव्या राष्ट्रीय पोषण मास 2025 ने महिला आणि बालकांचे आरोग्य आणि सक्षमीकरणाप्रति असलेली भारताची सामूहिक वचनबद्धता प्रदर्शित केली. 

उत्तराखंडमधील डेहराडून येथील हिमालयन सांस्कृतिक केंद्रात आज आठव्या राष्ट्रीय पोषण मास  2025 चा समारोप समारंभ पार पडला. पोषण जागरूकता आणि कृतीसाठी समर्पित महिनाभर चाललेले हे देशव्यापी जनआंदोलन संपन्न झाले.

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री, अन्नपूर्णा देवी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित करताना, ‘पोषण मास’ दरम्यान केलेल्या सक्रीय प्रयत्नांबद्दल सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे अभिनंदन केले. पोषण ही एक दिवसाची मोहीम नसून निरोगी जीवन आणि समृद्ध समाज निर्माण करण्याच्या दिशेने एक निरंतर प्रवास आहे, जिथे प्रत्येक मूल निरोगी असेल, प्रत्येक माता सक्षम असेल आणि प्रत्येक कुटुंबाचे चांगले पोषण होईल, यावर त्यांनी भर दिला.

यंदाच्या पोषण मास 2025 मध्ये सहा संकल्पनांवर आधारित 14 कोटींहून अधिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले: मुलांमधील लठ्ठपणाची समस्या हाताळणे, ‘पोषण भी पढाई भी’ च्या माध्यमातून बालकांची काळजी आणि शिक्षण (ईसीसीई), शिशु आणि लहान मुलांच्या आहार (IYCF) पद्धतींना बळकटी देणे, पोषणामध्ये पुरुषांचा सहभाग वाढवणे (मेन स्ट्रीमिंग), स्थानिक खाद्यपदार्थांना प्रोत्साहन देणे (व्होकल फॉर लोकल) आणि सुधारित सेवा वितरणासाठी अभिसरण आणि डिजिटायझेशन वाढवणे.

कुटुंब आणि बालकांच्या पोषणामध्ये पुरुषांची महत्त्वाची भूमिका ओळखून, पोषण मास अंतर्गत आयोजित कार्यक्रमात प्रथमच " मेन स्ट्रीमिंग" हा एक प्रमुख विषय म्हणून सादर करण्यात आला. देशभरात, या संकल्पने अंतर्गत 1.5 कोटींहून अधिक उपक्रम आयोजित करण्यात आले, यात वडील, मुलांची काळजी घेणारे पुरुष आणि लोक समुदायातील नेते यांचा समावेश होता. सामायिक जबाबदारी आणि लिंग-समावेशक पोषण पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.

इतर महत्वाच्या क्षेत्रांमध्ये संकल्पनांवर आधारित उपक्रमही मोठ्या स्तरावर आयोजित करण्यात आले. उर्वरित पाच संकल्पनांवर देशभरात 14 कोटींहून अधिक उपक्रमांची नोंद झाली, यात बालपणातील लठ्ठपणाच्या समस्येवरील 2.55 कोटी, अभिसरण आणि डिजिटायझेशनवर 3.2 कोटी, आयवायसीएफ पद्धतींवर 2.26 कोटी, ईसीसीई आणि पोषण भी पढाई भी वर 2.19 कोटी, आणि पारंपरिक आणि स्थानिक पातळीवर उत्पादन झालेल्या पौष्टिक अन्न पदार्थांच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या व्होकल फॉर लोकल उपक्रमांवरील 1.2 कोटी उपक्रमांचा समावेश होता. या व्यापक उपक्रमांनी पोषण जन आंदोलनाच्या एकात्मिक, समुदाय-प्रणित भावनेला बळकटी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 17 सप्टेंबर 2025 रोजी मध्य प्रदेशातील धार येथे 'स्वस्थ नारी, सशक्त परिवार', या व्यापक संकल्पने अंतर्गत, आठव्या राष्ट्रीय पोषण मास चा शुभारंभ झाला होता. पोषण मास, महिलांचे आरोग्य आणि कुटुंब सक्षमीकरण भारताच्या पोषण धोरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे अधोरेखित करतो.

 

 


शैलेश पाटील/राजश्री आगाशे/प्रिती मालंडकर

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 2180605) Visitor Counter : 8