राष्ट्रपती कार्यालय
संयुक्त राष्ट्र सैन्य पुरवठादार देशांच्या सैन्यप्रमुख परिषदेतील प्रतिनिधींनी घेतली राष्ट्रपतींची भेट
शांतता रक्षकांच्या भूमिकेचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून कौतुक; भारताच्या योगदानाचा केला उल्लेख
Posted On:
16 OCT 2025 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2025
संयुक्त राष्ट्र सैन्य पुरवठादार देशांच्या सैन्यप्रमुख परिषदेत सहभागी झालेल्या सैन्यप्रमुख/उप-सैन्यप्रमुखांनी, त्यांच्या कुटुंबीयांसह, आज राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली.
सहभागी झालेल्या प्रतिनिधींना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, ते आपापल्या देशांच्या सर्वोत्तम मूल्यांचे आणि नीतिमत्तेचे गौरवशाली प्रतिनिधी आहेत. ते शाश्वत शांतता आणि समृद्धीच्या दिशेने आपल्या राष्ट्रांचा अनुभव, कौशल्य आणि दृढनिश्चय एकत्र घेऊन आले आहेत.
जगभरात 71 विविध मोहिमांमध्ये संयुक्त राष्ट्रांचे शांतता सैनिक तैनात करण्यात आले आहेत, असे राष्ट्रपतींनी नमूद केले. या मोहिमांचा उद्देश निष्पाप लोकांचे, विशेषतः महिला, मुले आणि वृद्धांचे दुःख कमी करणे हा आहे. जगाच्या दुर्गम आणि दूरच्या कोपऱ्यांमध्ये तैनात असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैनिकांनी अनुकरणीय धैर्य आणि करुणा दाखवली आहे, असे त्या म्हणाल्या.
जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताचा बहुपक्षीयतेवर आणि संयुक्त राष्ट्र सनदेच्या तत्त्वांचे पालन करण्यावर दृढ विश्वास आहे असे राष्ट्रपतींनी सांगितले. स्थापनेपासूनच संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये एक अविचल योगदानकर्ता असल्याचा भारताला अभिमान आहे. आमच्या शांतता सैनिकांनी जगभरातील काही अत्यंत आव्हानात्मक मोहिमांमध्ये उत्कृष्ट सेवा बजावली आहे. शांतता रक्षणाच्या प्रवासात भारताने लैंगिक समावेशाच्या (gender inclusion) बाबतीत उल्लेखनीय प्रगती केली आहे, असेही त्यांनी सांगितले. महिला शांतता सैनिकांनी स्थानिक समुदायांना सक्षम केले आहे आणि विश्वास वाढवला आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.
राष्ट्रपती म्हणाल्या की, शांतता रक्षणाच्या उदात्त कार्यासाठी शूर महिला आणि पुरुषांचे योगदान देणारे देश म्हणून सैन्य पुरवठादार देशांना अधिक प्रभावी आवाज उठवण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या आराखड्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन त्यांनी केले. आपण स्थानिक भागधारकांसह अधिक सक्रिय सहभागासाठी देखील काम केले पाहिजे. यामुळे जिथे शांतता लादली जाणार नाही, तर सहभागात्मक प्रक्रियेतून (participative processes) जोपासली असे वातावरण तयार होण्यास मदत होईल, असे त्या म्हणाल्या.
संयुक्त राष्ट्र सैन्य पुरवठादार देशांची सैन्यप्रमुख परिषद आणि समान उद्दिष्ट आणि लक्ष असलेले इतर कार्यक्रम नवीन कल्पना, सखोल सहकार्य आणि चिरस्थायी मैत्रीला प्रोत्साहन देतील, असा विश्वास राष्ट्रपतींनी व्यक्त केला.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी इथे क्लिक करा.



गोपाळ चिपलकट्टी/निखिलेश चित्रे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2180153)
Visitor Counter : 13