रसायन आणि खते मंत्रालय
भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत
प्रविष्टि तिथि:
15 OCT 2025 9:23AM by PIB Mumbai
केंद्र सरकारच्या खते आणि रसायने मंत्रालयाच्या अंतर्गत असलेला रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभाग आणि सौदी अरेबियाच्या उद्योग आणि खनिज मंत्रालयात द्विपक्षीय बैठक झाली. या बैठकीत रसायने आणि पेट्रोकेमिकल्स विभागाच्या सचिव निवेदिता शुक्ला वर्मा यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. तर सौदी अरेबियाच्या प्रतिनिधिमंडळाचे नेतृत्त्व उद्योग आणि खनिज उपमंत्री खलील बिन इब्राहिम बिन सलामाह यांनी केले.
सौदी अरेबिया हा भारताचा चौथा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे तर भारत सौदी अरेबियाचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आहे. 2024–25 मध्ये दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापाराने 41.88 अब्ज अमेरिकी डॉलर्सचा टप्पा गाठला असून त्यामध्ये 4.5 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकी उलाढाल करणाऱ्या रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राचे योगदान 10 टक्के आहे.
या बैठकीत द्विपक्षीय सहकार्य वृद्धिंगत करणे, गुंतवणुकीला चालना देणे आणि रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात सहकार्याच्या नवीन संधींचा धांडोळा घेणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
या बैठकीत दोन्ही बाजूंनी रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रातील परस्पर पूरकतेला मान्यता दिली. पेट्रोकेमिकल्स हे सौदी अरेबियाचे बलस्थान असून भारताचे बलस्थान विशेष रसायनांमध्ये आहे. दोन्ही देशांमध्ये समन्वय वाढवण्यासाठी अधिक सहकार्य करण्यावर यावेळी सहमती झाली.
दोन्ही देशांनी रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राच्या मूल्य साखळीत सहकार्याच्या वाढत्या संधींविषयी चर्चा केली, यामध्ये पेट्रोलियम, रसायने आणि भारतातील पेट्रोकेमिकल गुंतवणूक क्षेत्र तसेच दोन्ही देशांमधील प्रमुख कंपन्यांमधील संभाव्य भागीदारी इत्यादी विषयांवर विस्तृत चर्चा झाली.
या क्षेत्रातील संशोधन आणि विकास आणि कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य करण्यावरही सहमती झाली.
यावेळी दोन्ही देशांनी रसायने आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्रात शाश्वत आणि परस्परांना लाभदायक भागीदारी करण्यासाठी तसेच भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातील धोरणात्मक आणि आर्थिक बंध अधिक दृढ करण्याची आपली वचनबद्धता दर्शवली.




***
JaydeviPujariSwami/Bhakti Sontakke/DineshYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2179269)
आगंतुक पटल : 30