पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषदेत पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मराठी अनुवाद

प्रविष्टि तिथि: 21 OCT 2024 1:16PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2024

 

एनडीटीव्ही जागतिक शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो. या परिषदेत तुम्ही विविध विषयांवर चर्चा कराल आणि विविध क्षेत्रातील जागतिक नेते देखील त्यांचे विचार मांडतील.

मित्रांनो,

आपण मागील 4-5 वर्षांचा विचार केला तर, बहुतेकवेळा एकाच विषयावर चर्चा होताना दिसते, ती  म्हणजे : चिंता - भविष्याबद्दलची चिंता. कोरोना महामारीच्या दरम्यान, या जगाला भेडसावणाऱ्या साथीचा सामना कसा करायचा याबद्दल चिंता होती. कोविडचा प्रसार जसजसा वाढत गेला तसतशा जागतिक अर्थव्यवस्थेपुढील  चिंता वाढल्या. महामारीमुळे महागाई, बेरोजगारी आणि हवामान बदलांबद्दलच्या चिंता वाढल्या. त्यानंतर, सुरू झालेल्या युद्धांमुळे या चिंता अधिक तीव्र झाल्या. जागतिक पुरवठा साखळीतील व्यत्यय आणि निष्पाप जीवांच्या नुकसानाबद्दल चिंता निर्माण झाली. हा त्रास, संघर्ष आणि ताणतणाव हे जागतिक शिखर परिषदा आणि चर्चासत्रांचे विषय बनले. आणि आज, जेव्हा या चर्चेचा केंद्रबिंदू प्रामुख्याने चिंतांवर असतो, तेव्हा भारतात कोणत्या प्रकारची विचारधारा दिसत आहे? हा एक आश्चर्यकारक विरोधाभास आहे. येथे, आपण भारतीय शतक ('द इंडियन सेंच्युरी') याबद्दल बोलत आहोत. जागतिक अशांततेच्या या  काळात, भारत आशेचा किरण बनला आहे. जग चिंतांनी ग्रासलेले असताना, भारत जगाला आशा  दाखवत आहे. आणि असे नाही, की जागतिक परिस्थितीचा आपल्यावर परिणाम होत नाही - तो होत आहे. भारतालाही आव्हानांचा सामना करावा लागतो, परंतु येथे सकारात्मकतेची भावना आहे, जी आपण सर्वांना जाणवते.  म्हणूनच 'द इंडियन सेंच्युरी' ची सर्वत्र चर्चा  आहे.

मित्रांनो,

आज भारत प्रत्येक क्षेत्रात ज्या वेगाने आणि प्रमाणात प्रगती करत आहे; ती अभूतपूर्व आहे.भारताची गती आणि व्याप्ती अतुलनीय आहे. आमच्या सरकारने तिसऱ्या कार्यकाळातील सुमारे 125 दिवस पूर्ण केले आहेत. या 125 दिवसांचे अनुभव मी तुमच्यासोबत सामायिक करेन. 125 दिवसांत, गरिबांसाठी 3 कोटी नवीन पक्की घरे मंजूर करण्यात आली आहेत.125 दिवसांत, आम्ही  9  लाख कोटी रुपयांचे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू केले आहेत. 125 दिवसांत, आम्ही 15 नवीन वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत आणि 8 नवीन विमानतळांचे  काम सुरू झाले आहे. याच 125 दिवसांत, आम्ही तरुणांसाठी 2 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 21,000 कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत आणि 70 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत आरोग्यसेवेची व्यवस्था केली आहे. भारतात सुरू असलेल्या कामाची व्याप्ती पहा - 125 दिवसांत, 5 लाख घरांमध्ये छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत. 'एक पेड माँ के नाम' (आईच्या नावाने एक झाड) मोहिमेअंतर्गत 90 कोटींहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. इतकेच नाही तर, आम्ही 125 दिवसांत 12 नवीन औद्योगिक विभागांना मंजुरी दिली आहे.या 125 दिवसांत, आपला सेन्सेक्स आणि निफ्टी 6 ते 7 टक्क्यांनी वाढला आहे. आपला परकीय चलन साठा 650 अब्ज अमेरिकन डॉलर्सवरून 700 अब्ज अमेरिकन डॉलर्सच्या पुढे गेला आहे. भारताच्या कामगिरीची ही यादी फार मोठी आहे आणि मी फक्त गेल्या 125 दिवसांबद्दल बोलत आहे.या 125 दिवसांत भारतात झालेल्या जागतिक परीषदा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत.गेल्या 125 दिवसांत भारतात कोणत्या जागतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे? दूरसंचार आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे  भविष्य यावर आंतरराष्ट्रीय संमेलने झाली, जागतिक फिनटेक महोत्सव झाला, जागतिक सेमीकंडक्टर इकोसिस्टमवर भारतात चर्चा झाली आणि अक्षय ऊर्जा आणि नागरी विमान वाहतुकीच्या भविष्यावर आंतरराष्ट्रीय परिषदाही भारतात झाल्या.

मित्रांनो

ही केवळ कार्यक्रमांची यादी नाही; तर ती भारताशी संबंधित आकांक्षांची यादी देखील आहे. ती भारताची दिशा आणि जगाच्या आशा दोन्ही अधोरेखित करते. हे असे विषय आहेत जे जगाचे भविष्य घडवतील आणि या मुद्द्यांवरील चर्चेसाठी जग आज भारताकडे वळून पहात आहे.

मित्रांनो, 

आज भारतात इतक्या मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत असताना, आमच्या तिसऱ्या कार्यकाळात आम्ही ज्या वेगाने प्रगती केली आहे त्यामुळे अनेक रेटिंग एजन्सींनी भारताच्या विकासाचे अंदाज वर्तविले आहेत. मार्क मोबियससारखे तज्ञ, जे आज येथे उपस्थित  आहेत आणि भारताच्या विकासात भरीव गुंतवणूक करतात, ते भारतातील गुंतवणूक संधींबद्दल प्रचंड उत्साही आहेत आणि हे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा ते जागतिक निधींना त्यांच्या भांडवलाच्या किमान 50 टक्के रक्कम भारताच्या भांडवली बाजारात गुंतवण्याचा सल्ला देतात, तेव्हा तो एक सशक्त संदेश असतो.

मित्रांनो,

भारत आज एक विकसनशील देश आणि एक उदयोन्मुख शक्ती आहे. गरिबीची आव्हाने आपल्याला समजतात आणि प्रगतीचा मार्ग कसा आखायचा हे आपल्याला माहिती आहे. आपले सरकार वेगाने धोरणे आखत आहे, निर्णय घेत आहे आणि नवीन सुधारणा आणत आहे. सार्वजनिक जीवनात, मी अनेक वेगवेगळ्या लोकांना भेटतो. काहीजण म्हणतात, "मोदीजी, तुम्ही सलग तीन वेळा निवडणूक जिंकला आहात, इतके काम केले आहे, मग तुम्ही अजूनही इतके अथक परिश्रम का करता? काय गरज आहे? तुम्ही भारताला पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनवली आहे, इतके टप्पे पार केले आहेत, इतके प्रलंबित असलेले निर्णय घेतले आहेत, इतक्या सुधारणा अंमलात आणल्या आहेत.तरी इतके कष्ट का करता?" असे म्हणणारे अनेक लोक मला भेटतात. पण आपण पाहिलेली स्वप्ने आणि ज्या दृढनिश्चयाने आपण पुढे जात आहोत, त्यामुळे विश्रांती घेण्यास फुरसत नाही.

गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. पण ते पुरेसे आहे का? नाही. गेल्या 10 वर्षांत जवळजवळ 12 कोटी शौचालये बांधण्यात आली आहेत आणि 16 कोटी लोकांना गॅस कनेक्शन मिळाले आहेत. ते पुरेसे नाही का? गेल्या 10 वर्षांत 350  हून अधिक नवीन वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात आली आहेत आणि 15 हून अधिक एम्स संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत. ते पुरेसे नाही का? गेल्या 10 वर्षांत, भारतात 150,000 हून अधिक स्टार्ट-अप्स स्थापन झाले आहेत आणि 8 कोटी तरुणांनी त्यांचे उपक्रम सुरू करण्यासाठी मुद्रा कर्ज घेतले आहे. प्रगतीची भूक भागली आहे का? ते पुरेसे नाही का? माझे उत्तर आहे: नाही, ते पुरेसे नाही. आज, भारत जगातील सर्वात तरुणांचा देश  आहे. ही तरुण राष्ट्रीय क्षमता आपल्याला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते आणि त्यासाठी आपल्याला बरेच काही करायचे आहे आणि ते वेगाने करावे लागेल.

मित्रांनो,

तुम्हाला भारताच्या विचारसरणीत आणि दृष्टिकोनात झालेला बदल नक्कीच लक्षात आला असेल. साधारणपणे सरकार त्यांच्या कामाची तुलना मागील सरकारशी करतात,पारंपारिकपणे आणि समजून घेण्यासाठी, मला त्यात काहीही चुकीचे वाटत नाही. ते त्यांच्या प्रगतीचे मोजमाप "पूर्वी काय होते आणि आता आपल्याकडे काय आहे?" असे विचारून करतात. यामुळे काही समाधान मिळते, कारण त्यांना वाटते की त्यांनी मागील सरकारांपेक्षा चांगले काम केले आहे. अनेक सरकारे स्वतःची तुलना गेल्या 10-15 वर्षांशी करतात आणि हेच त्यांच्या यशाचे मापदंड समजतात. आम्ही देखील पूर्वी या मार्गावरूनच चालायचो. ते खूप स्वाभाविक आहे. पण आता, हा मार्ग आम्हाला समाधान देत नाही. आता, आम्ही काल आणि आजची तुलना करण्यावर अवलंबून राहत नाही. यशासाठी आमचा मापदंड आता आम्ही काय साध्य केले आहे यावर नाही. आमचे लक्ष आता आम्हाला कुठे जायचे आहे, आम्हाला किती पुढे जायचे आहे, किती शिल्लक आहे आणि आम्ही तिथे कधी पोहोचणार आहोत यावर आहे. हा नवीन दृष्टिकोन संपूर्ण सरकारी यंत्रणेसह माझे काम चालवतो.

आता, भारत एका दूरदृष्टीने, मुसंडी मारत प्रगतीकडे पहात वाटचाल करत आहे. 2047 पर्यंतचा 'विकसित भारत'  संकल्प ही मानसिकता प्रतिबिंबित करतो. आता आपल्याला 'विकसित भारत' हा संकल्प साध्य करण्यासाठी आपण किती पुढे आलो आहोत, आपल्याला आणखी किती काम करायचे आहे आणि आपल्याला कोणत्या वेगाने आणि प्रमाणात काम करावे लागेल याचे मूल्यांकन करण्याची आवश्यकता आहे. हा केवळ लक्ष्य निश्चित करून घेतलेला सरकारी निर्णय नाही - आज, भारतातील 140 कोटी लोक 'विकसित भारत'च्या या संकल्पाचा भाग आहेत आणि ते स्वतः तो पूर्ण करत आहेत.ही केवळ जनसहभागाची मोहीम नाही तर भारताच्या आत्मविश्वासाची चळवळ आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा सरकारने 'विकसित भारत' साठी तयार केलेल्या रुपरेषेवर (व्हिजन डॉक्युमेंटवर) काम सुरू केले तेव्हा लाखो लोकांनी त्यांच्या सूचना पाठवल्या. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये यावर चर्चा आणि वादविवाद झाले.सरकार आणि सामाजिक संघटनांनी चर्चासत्रे आयोजित केली. जनतेकडून मिळालेल्या सूचनांच्या आधारे, भारताने पुढील 25 वर्षांसाठी आपले ध्येय निश्चित केले आहे. 'विकसित भारत' वरील चर्चा आता आपल्या चेतनेचा भाग बनल्या आहेत. 'जनशक्ती' (लोकशक्ती) द्वारे 'राष्ट्र शक्ती' (राष्ट्रीय शक्ती) उभारण्याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे असे मला वाटते.

मित्रांनो,

आज, भारताला आणखी एक मोठा फायदा आहे, जो या शतकाला ‘भारताचे शतक’ बनवण्यासाठी महत्त्वाचा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआयचे) युग आहे. जगाचे वर्तमान आणि भविष्य एआयशी जोडलेले आहे. परंतु भारताला एआय पॉवरचा दुहेरी फायदा आहे. आता, तुम्ही विचार करत असाल की, “जगात फक्त एकच एआय आहे, मग मोदींना हे दुहेरी एआय कुठून मिळाले?” जगाच्या दृष्टीने, एआय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजेंस, परंतु आपल्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजेंस व्यतिरिक्त आणखी एक एआय आहे - एस्पिरेशनल भारत (आकांक्षी भारत) जेव्हा एस्पिरेशनल भारताची (आकांक्षी भारताची)शक्ती आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी(कृत्रिम बुद्धिमत्तेशी) जोडली जाते तेव्हा विकासाचा वेग स्वाभाविकपणे वाढतो.

मित्रांनो,

आमच्यासाठी, एआय हे केवळ तंत्रज्ञान नाही; ते भारताच्या तरुणांसाठी संधींचे एक नवीन प्रवेशद्वार आहे. या वर्षी, भारताने भारत एआय मिशन सुरू केले. आरोग्यसेवा असो, शिक्षण असो किंवा स्टार्ट-अप असो, भारत प्रत्येक क्षेत्रात एआयचा वापर वाढवत आहे. आम्ही जगाला  चांगले एआय उपाय प्रदान करण्यावर देखील काम करत आहोत. क्वाड (QUAD) स्तरावर, भारताने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत.भारत इतर एआय -एस्पिरेशनल भारता(आकांक्षी भारत) - बद्दलही तितकाच गंभीर आहे. मध्यमवर्गीय असो, सामान्य लोक असोत, त्यांची ईझ ऑफ लिव्हिंग (सुलभ राहणीमान)असो, त्यांचे जीवनमान साधे असो,ते लघु उद्योजक असोत, एमएसएमई असोत, तरुण असोत किंवा भारतातील महिला असोत - आम्ही सर्वांच्या आकांक्षा लक्षात घेऊन धोरणे आखत आहोत आणि निर्णय घेत आहोत.

मित्रांनो,

आकांक्षी  भारताचे आणखी एक उदाहरण म्हणजे दळणवळण व्यवस्थेत केले जाणारे उत्कृष्ट काम. आम्ही जलद वाहतूक व्यवस्था आणि सर्वसमावेशक दळणवळण यावर खूप लक्ष केंद्रित केले आहे. विकासाच्या आकांक्षा असलेल्या समाजासाठी हे आवश्यक आहे. भारतासाठी, हे आणखी महत्त्वाचे आहे. इतक्या मोठ्या देशाला, इतक्या निरनिराळ्या भौगोलिक परिस्थितीसह, त्याची क्षमता प्रत्यक्ष साकार करण्यासाठी जलद गतीने जोडले जाणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही हवाई प्रवासावर देखील लक्ष केंद्रित केले. मला आठवते जेव्हा मी पहिल्यांदा म्हटले होते की मला साध्या चपला घालणाऱ्यांसाठी हवाई प्रवास सुलभ करायचा आहे, तेव्हा प्रतिक्रिया अशी होती, "भारतात हे कसे शक्य आहे?" पण आम्ही पुढे गेलो आणि उडान योजना सुरू केली. आज, उडानला आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. उडान अंतर्गत, आम्ही दोन स्तंभांवर काम केले. पहिले, आम्ही दुय्यम स्तरावरील (टियर-2) आणि तृतीय स्तरावरील (टियर-3) शहरांमध्ये विमानतळांचे एक नवीन नेटवर्क तयार केले. दुसरे, आम्ही सर्वांसाठी हवाई प्रवास परवडणारा आणि सुलभ बनवला. आतापर्यंत, उडान अंतर्गत सुमारे 300,000 उड्डाणे झाली आहेत, ज्यामध्ये 1.5 कोटी सामान्य नागरिकांनी प्रवास केला आहे. आज, उडान अंतर्गत 600 हून अधिक मार्गांवर उड्डाणे होतात, त्यापैकी बहुतेक लहान शहरांना जोडतात. 2014 मध्ये, भारतात सुमारे 70 विमानतळ होते; आज, विमानतळांची संख्या 150 च्या पुढे गेली आहे. उडान योजनेने सामाजिक आकांक्षा विकासाला कशी चालना देते हे दाखवून दिले आहे.

मित्रांनो,

मी तुम्हाला देशातील तरुणाईशी संबंधित काही उदाहरणे देतो. आम्ही भारताच्या तरुणांना जागतिक विकासाला चालना देणारी शक्ती बनवण्यासाठी काम करत आहोत. म्हणूनच आम्ही शिक्षण, कौशल्य विकास, संशोधन आणि रोजगारावर जोरदार भर दिला आहे. गेल्या 10 वर्षात या क्षेत्रांमध्ये आम्ही केलेल्या कामाचे परिणाम दिसू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच टाइम्स हायर एज्युकेशन रँकिंग जाहीर झाले;  भारत हा संशोधन गुणवत्तेत सर्वाधिक सुधारणा केलेला असा देश आहे. गेल्या 8-9 वर्षांत, भारतीय विद्यापीठांची संख्या  30 वरून 100 पेक्षा जास्त झाली आहे. गेल्या 30 वर्षांत क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये भारताची उपस्थिती 300% पेक्षा जास्त वाढलेली दिसून आली आहे. आज, पेटंट आणि ट्रेडमार्कची संख्या सर्वकालीन उच्चांकावर आहे. भारत जगासाठी संशोधन आणि विकासाचे एक प्रमुख केंद्र बनत आहे. भारतात सुमारे 2500 कंपन्यांची संशोधन केंद्रे आहेत. भारताच्या स्टार्ट-अप परिसंस्थेतही( इकोसिस्टम) अभूतपूर्व वाढ झाली आहे.

मित्रांनो,

भारतात झालेले हे व्यापक बदल जगासाठी विश्वासाचा पाया बनत आहेत. आज, भारत अनेक क्षेत्रांमध्ये जागतिक भविष्य घडवण्यात आघाडीवर आहे. जग, संकटाच्या काळातील एक विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताकडे पाहते. कोविडचे दिवस आठवा - आवश्यक औषधे आणि लसी तयार करण्याची आपली क्षमता आपल्याला अब्जावधी डॉलर्स कमवून देऊ शकली असती, ज्याचा भारताला फायदा झाला असता, परंतु मानवतेचे नुकसान झाले असते. ही आपली नीतिमत्ता नाही. गरजेच्या वेळी आम्ही शेकडो देशांना औषधे आणि जीवनरक्षक लसी पुरवल्या. कठीण काळात भारत जगाला योगदान देऊ शकला याबद्दल मला समाधान आहे.

मित्रांनो,

भारत असे संबंध निर्माण करत नाही जे गृहीत धरले जातील. आपले संबंध विश्वास आणि विश्वासार्हतेवर आधारित आहेत आणि जगाला हे माहीत आहे. भारत हा असा देश आहे ज्याच्या प्रगतीमुळे जगाला आनंद होतो. जेव्हा भारत यशस्वी होतो तेव्हा जगाला त्याबद्दल चांगले वाटते. उदाहरणार्थ, अलीकडील चांद्रयान मोहीम घ्या. संपूर्ण जगाने ती उत्सवासारखी साजरी केली. जेव्हा भारत प्रगती करतो तेव्हा तो द्वेष किंवा मत्सराच्या भावना निर्माण करत नाही. त्याऐवजी,त्यांचा जगाला आनंद वाटतो कारण भारताच्या प्रगतीचा संपूर्ण जगाला लाभ होतो. आपल्या सर्वांना माहित आहे की भारत भूतकाळात जागतिक विकासाला चालना देणारी सकारात्मक शक्ती होती. भारताच्या कल्पना, नवोपक्रम आणि उत्पादनांनी शतकानुशतके जगावर कायमचा प्रभाव टाकला होता . परंतु नंतर काळ बदलला आणि भारताने दीर्घकाळ वसाहतवाद सहन केला, ज्यामुळे आपण मागे पडलो. औद्योगिक क्रांतीदरम्यान, भारत देखील वसाहतवादी होता, ज्यामुळे आपल्याला औद्योगिक क्रांतीचा फायदा मिळू शकला नाही. तो काळ भारताच्या हातातून निसटला, परंतु आज, हा भारताचा काळ आहे. हा उद्योग 4.0 चा काळ आहे. भारत आता गुलाम राहिलेला नाही; आपण 75 वर्षांपासून स्वतंत्र आहोत. म्हणून, आता आपण पूर्णपणे तयार आहोत.

मित्रांनो,

भारत चौथ्या औद्योगिक क्रांती (उद्योग 4.0) साठी आवश्यक कौशल्ये आणि पायाभूत सुविधांचा वेगाने विकास करत आहे. गेल्या दशकात मला अनेक जागतिक व्यासपीठांसोबत जोडून घेण्याची संधी मिळाली आहे. मी  G-20 आणि G-7 शिखर परिषदेचा भाग आहे. फक्त 10 दिवसांपूर्वी, मी  आसियान शिखर परिषदेसाठी लाओसमध्ये होतो. जवळजवळ प्रत्येक शिखर परिषदेत भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा (DPI) ची चर्चा केली जाते,हे जाणून घेण्यात तुम्हाला आनंद होईल. आज, जग भारताच्या DPI चे बारकाईने निरीक्षण करत आहे. आमचे प्रिय मित्र आणि भारताचे चाहते,  पॉल रोमर, आज आमच्यासोबत उपस्थित आहेत. मला त्यांच्याशी अनेक संकल्पनांवर तपशीलवार चर्चा करण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये अमेरिकेचाही समावेश आहे, आणि आमच्या संभाषणांमध्ये, पॉलने भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधा,आधार आणि डिजीलॉकर सारख्या नवकल्पनांची प्रशंसा केली आहे. मोठ्या शिखर परिषदेदरम्यान, लोक अनेकदा आश्चर्य व्यक्त करतात, की भारताने इतका अविश्वसनीय DPI कसा विकसित केला आहे.

मित्रांनो,

इंटरनेट युगात, भारताला अग्रक्रमाचा लाभ (फर्स्ट-मूव्हर अॅडव्हान्टेज) मिळाला नव्हता. ज्या देशांना हा लाभ मिळाला होता, तिथे खाजगी प्लॅटफॉर्म आणि नवोपक्रमांनी डिजिटल स्पेसचे नेतृत्व केले, जगात क्रांती घडवून आणली. तथापि, त्यांचे लाभ मर्यादित होते. उलट, भारताने जगासमोर एक नवीन प्रारुप सादर केले आहे. भारताने तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण केले, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांद्वारे एक नवीन मार्ग दाखवला. आज भारतात, सरकार एक प्लॅटफॉर्म तयार करते आणि त्यावर लाखो नवीन नवोपक्रम घडतात. आमची JAM कनेक्टिव्हिटी - जन धन, आधार आणि मोबाईल - सेवांच्या जलद आणि गळती-मुक्त वितरणासाठी एक उत्तम प्रणाली बनली आहे.आमच्या यूपीआयचे उदाहरण (UPI) घ्या. UPI मुळे भारतात फिनटेकने प्रचंड वाढ पाहिली आहे. दररोज, 500 दशलक्षाहून अधिक डिजटल व्यवहार होत आहेत, जे कॉर्पोरेशनद्वारे नव्हे तर आमच्या लहान दुकानदार आणि रस्त्यावरील विक्रेत्यांद्वारे केले जातात. आमचा PM गति शक्ती प्लॅटफॉर्म हे आणखी एक उदाहरण आहे. पायाभूत सुविधा प्रकल्पांदरम्यान उद्भवलेल्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही PM गति शक्ती तयार केली. आज, ते आमच्या लॉजिस्टिक्स इकोसिस्टममध्ये बदल करण्यास खूप मदत करत आहे.  त्याचप्रमाणे, आमचा ONDC प्लॅटफॉर्म ऑनलाइन रिटेलमध्ये लोकशाहीकरण आणि पारदर्शकता आणणारा एक नवोपक्रम असल्याचे सिद्ध होत आहे. भारताने दाखवून दिले आहे की डिजिटल नवोपक्रम आणि लोकशाही मूल्ये एकत्र राहू शकतात. भारताने हे दाखवून दिले आहे की तंत्रज्ञान हे नियंत्रण आणि विभाजनाचे  नाही तर समावेश, पारदर्शकता आणि सक्षमीकरणाचे साधन आहे.

मित्रांनो,

21 व्या शतकातील हा काळ मानवी इतिहासातील सर्वात कठीण काळांपैकी एक आहे. अशा काळात, मानवतेच्या चांगल्या भविष्यासाठी त्यांच्या प्रमुख गरजा म्हणजे स्थिरता, शाश्वतता आणि उपाय या आवश्यक आहेत. आणि आज भारतीय लोकांच्या अढळ पाठिंब्याने भारत या क्षेत्रांमध्ये प्रयत्न करत आहे.सहा दशकांत प्रथमच, देशातील लोकांनी सलग तिसऱ्यांदा सरकारला आपला जनादेश दिला आहे. हा स्थिरतेचा संदेश देते. अलिकडेच हरियाणामध्ये निवडणुका झाल्या आणि या निवडणुकांमध्येही भारतातील लोकांनी स्थिरतेची ही भावना बळकट केली आहे.

मित्रांनो,

हवामान बदलाचे संकट संपूर्ण मानवजातीसाठी एक महान संकट बनले आहे. या क्षेत्रातही भारत नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत आहे. जागतिक हवामान बदलात आपले योगदान कमी आहे, तरीही आपण हरित संक्रमणाला आपल्या विकासाचे इंधन बनवले आहे. आज, शाश्वतता हा  आपल्या विकास नियोजनाचा गाभा आहे. आपल्या योजना उदाहरणार्थ पंतप्रधान सूर्य घर मोफत वीज योजना, शेतात सौर पंप बसवण्याची योजना, आपली ईव्ही क्रांती किंवा इथेनॉल ब्लेंडिंग कार्यक्रम पहा - मग ते मोठे पवन ऊर्जा फार्म असोत, एलईडी लाईट मूव्हमेंट असोत, सौरऊर्जेवर चालणारे विमानतळ असोत किंवा जैववायू (बायोगॅस) प्लांटवर लक्ष केंद्रित केलेले असोत. तुम्ही आमच्या कोणत्याही कार्यक्रम किंवा योजना पहा, तुम्हाला प्रत्येक कार्यक्रम आणि योजनेत हरित भविष्य आणि हरित रोजगारांप्रती   दृढ वचनबद्धता आढळेल.

मित्रांनो,

स्थिरता आणि शाश्वततेसह, भारत आता उपायांवर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या दशकात, भारताने जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक उपायांवर काम केले आहे.  आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असो, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी युती असो, भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉर असो, जागतिक जैवइंधन आघाडी असो, योग, आयुर्वेद, मिशन लाईफ असो किंवा मिशन मिलेट्स असो - भारताने घेतलेला प्रत्येक उपक्रम जगाच्या आव्हानांवर उपाय प्रदान करत आहे.

मित्रांनो,

भारताच्या वाढत्या क्षमता जगाचे कल्याण सुनिश्चित करत आहेत याचा मला आनंद आहे. भारत जितका प्रगती करेल तितका जगाला अधिक लाभ होईल. भारताचे शतक हा केवळ भारताचा विजय नसून संपूर्ण मानवतेचा विजय व्हावा, हे आमचे ध्येय आहे. प्रत्येकाच्या प्रतिभेने प्रगती करत जाणारे शतक, प्रत्येकाच्या नवोपक्रमांनी समृद्ध  होणारे शतक, गरिबीमुक्त शतक, प्रत्येकाला प्रगतीच्या संधी देणारे शतक आणि भारताच्या प्रयत्नांमुळे जगात स्थिरता आणि शांती लाभेल असे शतक. या भावनेने, मला येथे आमंत्रित केल्याबद्दल आणि ही संधी दिल्याबद्दल मी पुन्हा एकदा एनडीटीव्हीचे आभार मानतो.  ही शिखर परिषद यशस्वी होण्यासाठी मी शुभेच्छा देतो.

खूप खूप धन्यवाद!!

 

* * *

आशिष सांगळे/संपदा पाटगावकर/दर्शना राणे

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2178948) आगंतुक पटल : 18
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Assamese , Malayalam , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada