पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील अमरेली येथे 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले
या प्रकल्पांमुळे लोकांचे राहणीमान लक्षणीयरीत्या सुधारेल आणि या प्रदेशाच्या विकासाला गती मिळेल असे पंतप्रधानांचे प्रतिपादन
Posted On:
28 OCT 2024 7:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधील अमरेली येथे 4,900 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. आजच्या या विकास प्रकल्पांमध्ये रेल्वे, रस्ते, जल विकास आणि पर्यटन क्षेत्रातील प्रकल्पांचा समावेश आहे. राज्यातील अमरेली, जामनगर, मोरबी, देवभूमी द्वारका, जुनागड, पोरबंदर, कच्छ आणि बोताड या जिल्ह्यांमधील नागरिकांना या प्रकल्पांचा लाभ मिळेल.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सणाच्या उत्साहपूर्ण वातावरणाचा उल्लेख करून, हे सण संस्कृतीचे उत्सव साजरे करतात, परंतु विकासातील सातत्त्यपूर्ण प्रगती देखील तेवढीच महत्त्वाची आहे, असे नमूद केले. त्यांनी गुजरातमधील अनेक मोठ्या प्रकल्पांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. भारतीय हवाई दलासाठी मेड इन इंडिया विमाने तयार करण्यासाठी समर्पित भारतातील पहिल्या कारखान्याचे उद्घाटन करण्यासाठी वडोदरा येथे आपण दिलेल्या भेटीचा त्यांनी उल्लेख केला. पंतप्रधानांनी आज अमरेली येथे भारत माता सरोवराचे उद्घाटन केल्याचा उल्लेख केला आणि सांगितले की, या ठिकाणी जल, रस्ते आणि रेल्वेशी संबंधित अनेक मोठ्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली आहे. ते म्हणाले की, या प्रकल्पांमुळे सौराष्ट्र आणि कच्छमधील लोकांचे जीवन सुलभ होईल, प्रादेशिक विकासाला गती मिळेल, स्थानिक शेतकरी समृद्ध होतील आणि तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. आजच्या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. सौराष्ट्रातील अमरेलीच्या भूमीने भारताला अनेक रत्ने दिली आहेत असे नमूद करून पंतप्रधान म्हणाले की, अमरेलीचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि राजकीय, असा प्रत्येक बाबतीत गौरवशाली भूतकाळ आहे. अमरेली ही श्री योगीजी महाराज आणि भोज भगत तसेच लोकगायक आणि कवी दुलाभय्या काग, कलापी यांच्यासारखे कवी, जगप्रसिद्ध जादूगार, के लाल आणि आधुनिक कवितेमधील आघाडीचे कवी रमेश पारेख यांची कर्मभूमी आहे, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की अमरेलीने गुजरातला पहिले मुख्यमंत्री, जीवराज मेहता देखील दिले आहेत. अमरेलीच्या मुलांनी देखील समाजासाठी मोठे योगदान देऊन व्यावसायिक जगात नाव कमावले आहे, असे मोदी यांनी नमूद केले. गुजरात सरकारच्या जलसंवर्धनाशी संबंधित 80/20 योजनांशी जोडलेल्या ढोलकैया कुटुंबामुळे ही परंपरा अधिक बळकट झाली, असे ते म्हणाले. गेल्या अडीच दशकांमधील सातत्त्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे बदल झाल्याचे स्पष्ट होत आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी विशेषतः गुजरात आणि सौराष्ट्रातील लोकांसाठी पाण्याचे असलेले महत्त्व अधोरेखित केले, जे दीर्घकाळ पाण्याशी संबंधित आव्हानांना तोंड देत आहेत. भूतकाळात पाणी टंचाईमुळे स्थलांतर करण्यासाठी सौराष्ट्र ओळखले जायचे, असे नमूद करून ते म्हणाले की, आज ही परिस्थिती बदलली आहे. आता नर्मदेचे पाणी खेड्यापाड्यात पोहोचले आहे. भूजल पातळीत लक्षणीय वाढ करणाऱ्या जलसंचय आणि सौनी योजनेसारख्या सरकारी उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. ते म्हणाले की, नदी खोलीकरण आणि चेक डॅम बांधून पुराची समस्या कमी करता येईल, आणि पावसाचे पाणी प्रभावीपणे साठवता येईल. त्यांनी पुढे सांगितले की, आजूबाजूच्या भागातील पिण्याच्या पाण्याशी संबंधित समस्या देखील सोडवल्या जातील, आणि त्याचा लाभ या प्रदेशातील लाखो नागरिकांना मिळेल. गेल्या दोन दशकांमध्ये गुजरातने प्रत्येक घरापर्यंत आणि शेतापर्यंत पाणी पोहोचवण्यामध्ये उल्लेखनीय करून संपूर्ण देशापुढे एक आदर्श निर्माण केल्याचे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याचे सतत प्रयत्न सुरू असून आजच्या प्रकल्पांमुळे या प्रदेशातील लाखो लोकांना आणखी लाभ मिळेल. नवदा-चावंड बल्क पाईपलाईन प्रकल्पामुळे अमरेली, बोटाड, जुनागढ, राजकोट आणि पोरबंदर यासारख्या सुमारे 1,300 गावांना आणि 35 पेक्षा जास्त शहरांना लाभ मिळेल, अशी माहिती मोदी यांनी दिली. त्यांनी सांगितले की या उपक्रमामुळे या प्रदेशांना दररोज 30 कोटी लिटर अतिरिक्त पाणीपुरवठा होईल. पासवी ग्रुप सौराष्ट्र प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या पायाभरणी समारंभाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, हा प्रकल्प तळाजा, महुवा आणि पालिताणा या तालुक्यांची पाण्याची गरज पूर्ण करेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सुमारे 100 गावांना त्याचा थेट फायदा होईल, असे ते म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, आजचे जल प्रकल्प सरकार आणि समाजाच्या सहकार्यात्मक शक्तीचे उदाहरण असून, यामध्ये लोकसहभाग केंद्रस्थानी आहे. प्रत्येक जिल्ह्यात किमान 75 अमृत सरोवरांच्या निर्मितीद्वारे भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाला जलसंधारणाच्या उपक्रमांशी जोडण्याचे यश त्यांनी अधोरेखित केले. खेड्यापाड्यात 60,000 अमृत सरोवरांचे बांधकाम करून भावी पिढ्यांसाठी वारसा मागे ठेवल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. सीएआर पाटील यांच्या नेतृत्वाखाली ‘कॅच द रेन’ मोहिमेला गती मिळत आहे, या गोष्टीची त्यांनी प्रशंसा केली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये ही मोहीम लक्षणीय प्रगती करत असून, लोकसहभागाद्वारे हजारो पुनर्भरण विहिरी बांधल्या जात आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. आपल्या वडिलोपार्जित गावांमध्ये पुनर्भरण विहिरी बांधण्यासाठी नागरिक उत्साहाने पुढे येत आहेत, याबद्दल आनंद व्यक्त करून, या उपक्रमामुळे गावे आणि शेतांमध्ये भूजल पातळी कायम राहण्याची खात्री मिळत असल्याचे मोदी म्हणाले. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती आणि पशुधनाला प्रोत्साहन देणाऱ्या शेकडो प्रकल्पांचा आज शुभारंभ झाल्याचे त्यांनी नमूद केले.
अधिक पाणी उपलब्ध झाल्यामुळे आता शेती करणे सोपे झाले आहे आणि नर्मदेच्या पाण्यामुळे अमरेली येथे तीन हंगामांमध्ये शेती करणे शक्य झाले आहे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. अमरेली जिल्हा आज कृषी क्षेत्रात अग्रेसर म्हणून उदयाला आला आहे, असे पंतप्रधान म्हणाले. कापूस, भुईमूग, तीळ आणि भरड धान्य यांसारख्या पिकांच्या लागवडीला चालना मिळत असून अमरेलीचा अभिमान असलेल्या केशर आंब्याला जीआय टॅग मिळाला आहे, असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, जीआय टॅग दर्जाचा अर्थ, जगात कुठेही विक्री होत असली तरी अमरेलीची ओळख केशर आंब्याशी जोडली गेली. नैसर्गिक शेतीचे प्रमुख केंद्र म्हणून अमरेली झपाट्याने उदयाला येत आहे, आणि हलोलमध्ये देशातील पहिले नैसर्गिक शेती विद्यापीठ उभारले जात आहे यावरही पंतप्रधानांनी भर दिला. त्यांनी पुढे सांगितले की या विद्यापीठा अंतर्गत अमरेलीला गुजरातचे पहिले नैसर्गिक शेती महाविद्यालय मिळाले. अधिकाधिक शेतकऱ्यांना पशुपालन करता यावे आणि नैसर्गिक शेतीचा लाभ मिळावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असे मोदी म्हणाले. अलिकडच्या काही वर्षांत अमरेली येथील दुग्धव्यवसाय उद्योगाची प्रचंड वाढ झाल्याचे अधोरेखित करत मोदी म्हणाले की, सरकार आणि सहकारी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळेच हे शक्य झाले. 2007 साली अमर डेअरीची स्थापना झाली, त्यावेळी 25 गावांच्या सरकारी समित्या त्याच्याशी जोडल्या गेल्या, याचा उल्लेख करून, मोदी म्हणाले की, आज अमर डेअरीशी 700 पेक्षा जास्त सहकारी संस्था जोडल्या गेल्या आहेत आणि या ठिकाणी दररोज सुमारे 1.25 लाख लिटर दूध संकलित केले जात आहे.
मधुर क्रांतीमुळे अमरेली ला ओळख मिळाल्याचे नमूद करून, मोदी म्हणाले की, मध उत्पादनामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोत उपलब्ध झाला. अमरेली येथील शेकडो शेतकऱ्यांनी मधमाशी पालनाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर मधाशी संबंधित व्यवसाय सुरू केल्याचे त्यांनी नमूद केले. वीज बिलातून मुक्तता मिळवून, आणि वीजेपासून उत्पन्न मिळवून, प्रत्येक कुटुंबासाठी वार्षिक 25,000 ते 30,000 रुपये बचत सुनिश्चित करणाऱ्या पीएम सूर्य घर योजनेचा उल्लेख करून, या योजनेची अंमलबजावणी झाल्यापासून काही महिन्यांतच गुजरातमधील घरांच्या छतांवर अंदाजे 200,000 सौर पॅनेल बसवण्यात आल्याची माहिती मोदी यांनी दिली. त्यांनी अधोरेखित केले की अमरेली जिल्हा सौरऊर्जेच्या बाबतीत वेगाने प्रगती करत आहे, त्याचे उदाहरण दुधाळा हे गाव आहे, जिथे शेकडो घरांमध्ये सौर पॅनेल बसवण्यात आले आहेत. परिणामी, गावामध्ये दरमहा सुमारे 75,000 रुपयांची वीज बचत होत असून प्रत्येक घराची वार्षिक 4,000 रुपयांची बचत होत आहे, असे ते म्हणाले. दुधाळा हे लवकरच अमरेलीतील पहिले सौर गाव बनण्याच्या दिशेने पुढे जात आहे, असे ते म्हणाले.
सौराष्ट्र हे पर्यटनासाठी एक महत्त्वाचे केंद्र असून इथे अनेक पवित्र स्थळे आणि श्रद्धास्थाने आहेत, असे नमूद करून पंतप्रधानांनी सरदार सरोवर धरण हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण बनल्याचे अधोरेखित केले. सरदार पटेल यांचा पुतळा, जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे, तो पाहण्यासाठी गेल्या वर्षी 50 लाखांहून अधिक पर्यटकांनी या ठिकाणी भेट दिल्याची माहिती त्यांनी दिली. सरदार पटेल यांच्या जयंती निमित्त या ठिकाणी दोन दिवस भेट देऊन, राष्ट्रीय एकता परेड साठी आपण उपस्थित राहिल्याची माहिती त्यांनी दिली.
येत्या काळात केर्ली रिचार्ज जलाशय हे इको-टुरिझमचे एक प्रमुख केंद्र बनेल आणि साहसी पर्यटनाला मोठी चालना मिळेल यावर पंतप्रधानांनी भर दिला. यामुळे केर्ली पक्षी अभयारण्याला जगात एक नवीन ओळख मिळेल, असेही ते म्हणाले.
गुजरातच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा उल्लेख करून, वारसा जतन करण्याबरोबरच सरकारचे विकासाला प्राधान्य असल्याचे मोदी यांनी नमूद केले. म्हणूनच, मत्स्यव्यवसाय आणि बंदरांशी संबंधित शेकडो वर्षांपासूनचा वारसा पुनरुज्जीवित केला जात आहे, असे ते म्हणाले. लोथल येथे राष्ट्रीय सागरी वारसा संकुलाच्या बांधकामाला सरकारने दिलेल्या मंजुरीची नोंद घेत, ते म्हणाले की, या निर्णयामुळे देशाला आणि जगाला भारताच्या गौरवशाली सागरी वारशाची ओळख होईल आणि प्रेरणा मिळेल. “सागराचे निळे पाणी नील क्रांतीला गती देईल, असा आमचा प्रयत्न आहे,” मोदी म्हणाले. बंदर-आधारित विकासामुळे विकसित भारताच्या संकल्पाला बळ मिळायला हवे, असे ते म्हणाले. जाफराबाद, शियालबेट येथील मच्छिमारांसाठी चांगल्या पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे, तर अमरेलीतील पिपावाव बंदराच्या आधुनिकीकरणामुळे आज हजारो लोकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या आहेत आणि 10 लाखांहून अधिक कंटेनर आणि हजारो वाहने हाताळण्याची क्षमताही निर्माण झाली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. पिपावाव बंदर आणि गुजरातमधील अशा प्रत्येक बंदराची देशाच्या इतर भागांशी असलेली जोडणी आधुनिक करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
विकसित भारताच्या उभारणीसाठी गरीबांसाठी पक्की घरे, वीज, रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि गॅस पाइपलाइन यासारख्या पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वेगाने काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सौराष्ट्रमधील पायाभूत सुविधांच्या कनेक्टिव्हिटीमधील सुधारणेमुळे औद्योगिक विकासाला लक्षणीय चालना मिळाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रो-रो फेरी सेवेच्या शुभारंभामुळे सौराष्ट्र आणि सुरत दरम्यानची कनेक्टिव्हिटी सुलभ झाली असून अलिकडच्या वर्षांत 7 लाखांहून अधिक लोकांना याचा लाभ मिळाला आहे. 1 लाखांहून अधिक गाड्या आणि 75,000 हून अधिक ट्रक आणि बसेसची वाहतूक करण्यात आली असून वेळ आणि पैशाची बचत झाली, असे ते म्हणाले.
जामनगर ते अमृतसर-भटिंडा या आर्थिक कॉरिडॉरच्या बांधकामातील जलद प्रगतीचा उल्लेख करत पंतप्रधान म्हणाले की, या प्रकल्पाचा गुजरातपासून पंजाबपर्यंतच्या सर्व राज्यांना फायदा होईल. आज झालेले रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीमुळे जामनगर आणि मोरबी सारख्या प्रमुख औद्योगिक केंद्रांबरोबरच संपर्क वाढेल, सिमेंट कारखान्यांपर्यंत पोहोच वाढेल तसेच सोमनाथ आणि द्वारका इथली तीर्थयात्रा सुलभ आणि सुविधापूर्ण होईल, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, कच्छमधील रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या विस्तारामुळे सौराष्ट्र आणि कच्छमधील पर्यटन आणि औद्योगिकीकरणाला बळकटी मिळेल.
भारताचा विकास वेगाने होत असताना, जगात भारताचा अभिमानही सतत वाढत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आज जग भारताकडे एका नव्या दृष्टीकोनातून पाहत आहे आणि भारताची क्षमता ओळखून भारताचे म्हणणे गांभीर्याने ऐकत आहे. आज प्रत्येकजण भारताच्या क्षमतांवर चर्चा करत आहे, हे लक्षात घेऊन, मोदी यांनी यामध्ये गुजरातची मोठी भूमिका असल्याचे अधोरेखित केले. ते म्हणाले की, गुजरातने जगाला भारताचे प्रत्येक शहर आणि गावात असलेल्या क्षमतेचे दर्शन घडवून आणले आहे. रशियातील ब्रिक्स परिषदेला अलिकडेच दिलेल्या भेटीचा उल्लेख करून, मोदी म्हणाले की, आज प्रत्येकाला भारताशी संबंध प्रस्थापित करायचे आहेत आणि भारतात गुंतवणूक करायची आहे. पंतप्रधानांनी जर्मनीच्या चान्सलरच्या अलिकडच्या भारत भेटीचा आणि त्यांच्या बरोबर झालेल्या अनेक करारांचाही उल्लेख केला. ते पुढे म्हणाले की, जर्मनीने आपला वार्षिक व्हिसा कोटा सध्याच्या 20 हजारांवरून 90 हजारांपर्यंत वाढवला असून, याचा फायदा भारतीय तरुणांना होईल. मोदी यांनी स्पेनच्या राष्ट्रपतींच्या आजच्या गुजरात भेटीचा आणि वडोदरा येथील वाहतूक विमान निर्मिती कारखान्याच्या स्वरूपात स्पेन ने केलेल्या मोठ्या गुंतवणुकीचाही उल्लेख केला. पुढे म्हणाले की, यामुळे गुजरातमधील हजारो लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना मिळेल, आणि त्याचबरोबर विमान निर्मितीसाठी संपूर्ण परिसंस्था विकसित होईल, ज्यामुळे लाखो नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, “जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो तेव्हा म्हणायचो की गुजरातच्या विकासातूनच देशाचा विकास होतो. विकसित गुजरात विकसित भारताचा मार्ग बळकट करेल,” असे पंतप्रधान म्हणाले. आजच्या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील, आणि खासदार परशोत्तम रुपाला आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी
पंतप्रधानांनी अमरेली मध्ये दुधाळा येथे भारत माता सरोवराचे उद्घाटन केले. हा प्रकल्प गुजरात सरकार आणि ढोलकैया फाउंडेशन यांच्यातील सहकार्याने सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल अंतर्गत विकसित करण्यात आला आहे. ढोलकैया फाउंडेशनने एका चेक डॅममध्ये सुधारणा केली. या धरणाची 4.5 कोटी लिटर पाणी सामावून घेण्याची क्षमता होती, मात्र त्याचे खोलीकरण, रुंदीकरण आणि मजबुतीकरणानंतर ही क्षमता 24.5 कोटी लिटर इतकी वाढली. या सुधारणेमुळे जवळपासच्या विहिरी आणि बोअरमधील पाण्याची पातळी वाढली असून, त्यामुळे. स्थानिक गावे आणि शेतकऱ्यांना चांगले सिंचन उपलब्ध होईल.
त्यानंतर पंतप्रधानांनी गुजरातमधील अमरेली येथे सुमारे 4,900 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांचा राज्यातील अमरेली, जामनगर, मोरबी, देवभूमी द्वारका, जुनागड, पोरबंदर, कच्छ आणि बोताड जिल्ह्यातील नागरिकांना फायदा होणार आहे.
पंतप्रधानांनी 2,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध रस्ते प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. या प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय महामार्ग 151, राष्ट्रीय महामार्ग 151ए आणि राष्ट्रीय महामार्ग 51, तसेच जुनागड बायपासच्या विविध विभागांचे चौपदरीकरण समाविष्ट आहे. जामनगर जिल्ह्यातील ध्रोल बायपास ते मोरबी जिल्ह्यातील अमरन दरम्यानच्या उर्वरित भागाच्या चौपदरी प्रकल्पाची पायाभरणीही केली जाईल.
पंतप्रधानांनी सुमारे 1,100 कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या भूज-नालिया रेल्वे गेज रूपांतरण प्रकल्पाचे लोकार्पण केले. या विस्तृत प्रकल्पात 24 मोठे पूल, 254 छोटे पूल, 3 उड्डाणपूल आणि 30 अंडरब्रिज याचा समावेश असून, कच्छ जिल्ह्याच्या सामाजिक-आर्थिक विकासात तो महत्वाची भूमिका बजावेल.
पंतप्रधानांनी अमरेली जिल्ह्यातील पाणीपुरवठा विभागाच्या 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये नावडा ते चवंड बल्क पाइपलाइनचा समावेश आहे, ज्यामुळे बोताड, अमरेली, जुनागढ, राजकोट आणि पोरबंदर जिल्ह्यातील 36 शहरे आणि 1,298 गावांमधील अंदाजे 67 लाख लाभार्थ्यांना अतिरिक्त 28 कोटी लिटर पाणी उपलब्ध होईल. भावनगर जिल्ह्यातील पासवी गट संवर्धन पाणीपुरवठा योजना टप्पा 2 ची पायाभरणीही केली जाणार असून भावनगर जिल्ह्यातील महुवा, तलाजा आणि पालिताना तालुक्यातील 95 गावांना याचा लाभ मिळेल.
पंतप्रधानांनी पोरबंदर जिल्ह्यातील मोकरसागर येथील कार्ली पुनर्भरण जलाशयाचे जागतिक दर्जाचे शाश्वत इको-टुरिझम स्थळ म्हणून रुपांतर करण्यासह पर्यटनाशी संबंधित विकास उपक्रमांची पायाभरणीही केली.
* * *
नेहा कुलकर्णी/राजश्री आगाशे/दर्शना राणे
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2178525)
Visitor Counter : 6
Read this release in:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam